जवान गणेश पिराजी चव्हाण यांना कुरुळा ग्रामस्थांचा अखेरचा निरोप

36

✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

कंधार(दि.21ऑक्टोबर):-तालुक्यातील कुरुळा येथील बीएसएफचे जवान गणेश पिराजी चव्हाण हे मेघालय येथे सेवा बजावत होते. मागील काही दिवसापासून आजारी असल्याने त्यांच्यावर उपचार सुरु होते. आजारातून ते सावरु न शकल्याने 18 ऑक्टोंबर रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे शव मेघालय येथून हैद्राबाद येथे व हैद्राबाद येथून ते आज कुरुळा या गावी पोहचले. कुरुळा ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील नागरिकांनी त्यांना आज साश्रृनयनाने निरोप दिला.

“त्यांच्या निधनामुळे नांदेड जिल्ह्याने मातृभूमिच्यासेवेत तैनात असलेला एक जवान आपण गमविला आहे” या शब्दात जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांच्या कुटुंबियाच्या दु:खात मी सहभागी आहे, असे त्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

शासनाच्यावतीने कंधारचे उपविभागीय दंडाधिकारी पांडुरंग बोरगावकर, तहसिलदार विजय चव्हाण यांनी जवानाच्या पार्थीवाला पुष्पचक्र अर्पण केले. यावेळी मास्क व इतर सुरक्षितता घेत ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने हजेरी दिली.