मनी स्वच्छता अंतर्भूत : तोच खरा स्वच्छतादूत !

31

🔸स्वच्छ भारत अभियान[ भाग-१ला ]

भारताचे सांप्रत पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी साहेबांनी इ.स.२०१४ पासून दरवर्षी २ ऑक्टोबर हा दिवस ‘राष्ट्रीय स्वच्छतादिन’ म्हणून साजरा करण्याची घोषणा केली. नवी दिल्ली येथील राजघाट रस्त्याच्या स्वच्छतेचा शुभारंभ मा.पंतप्रधान साहेबांच्या उपस्थितीत करण्यात आला होता. खरे तर स्वच्छता ही एका दिवसाने साध्य होणारी गोष्ट नाही. ती वेळच्या वेळी होण्यासाठी प्रत्येकास ती सवय अंगवळणी पाडणे अत्यावश्यक आहे. जो खरोखर आपले मन शुद्ध, निर्मळ व पारदर्शक ठेवतो तोच आपल्या शरीराची, घरादाराची व इतर साऱ्या गोष्टीत स्वच्छता ठेवू शकतो. दि.२ ऑक्टोबर २०१४ ला ग्रामीण भागासाठी ‘निर्मल भारत’ अभियानाची पुनर्रचना करून ‘स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण)’ गतिमान करण्यात आले. ‘सितावरून भाताची परीक्षा’ म्हणतात. एक सित शिजला तर संपूर्ण गंजातील भात शिजलेला असतो. याच न्यायाने वं.रा.संत तुकडोजी महाराज ‘गाव दुरुस्त तर देश गुणी होईल’ हे पटवून देतात –

“ऐसा होता आचार विचार । गाव होईल न्यायभंडार ।
जागृत असता सज्जन चतुर । सेवेसाठी ।।३३।।
ऐसे जे जे गाव वागले । त्या गावाचे भाग्य उघडले ।
नाही तरी टक्केटोणपे आले । नशिबी त्याच्या ।।३४।।”
[ पवित्र ग्रामगीता : ग्रामनिर्माण पंचक : अध्याय ११ वा : ग्रामरक्षण ]

निर्मल भारत अभियानात खालीलप्रमाणे सुधारणा करून हे नवीन अभियान सुरू झाले – (१) वैयक्तिक शौचालयाची किंमत १०,००० रुपयांवरून १२,००० रुपये ठरवली आहे. (२) वैयक्तिक शौचालय उभारणीसाठी केंद्र : राज्य हिस्सा ७५:२५ तसेच ईशान्यपूर्व राज्य व जम्मू-काश्मीरसाठी ९०:१० असाच ठेवण्यात आला आहे. (३) भविष्यात इंदिरा आवास योजनेतील लाभार्थ्यांना वैयक्तिक शौचालय उभारणीची मदत इंदिरा आवास योजनेतून मिळेल. पण सद्या ती स्वच्छ भारत अभियानातून देण्यात येईल. (४) शाळांमधील शौचालय उभारणीची जबाबदारी मानव संसाधन विकास मंत्रालयाकडे तर अंगणवाडीच्या शौचालय उभारणीची जबाबदारी ही महिला व बालविकास मंत्रालयाकडे देण्यात आली आहे.

(५) लोकसहभाग व मागणी वाढावी यासाठी ‘स्वच्छतागृहांचा वापर करणे व लोकांच्या वर्तणुकीत सकारात्मक बदल करणे’ यावर सर्वाधिक भर देण्यात येत आहे. (६) योजनेचे लक्ष्य ‘निर्मल भारत’ ऐवजी ‘स्वच्छ भारत’ असे झाले आहे व योजनेचे साध्यवर्षे २०२२ ऐवजी २०१९ असे करण्यात आले आहे. झटपट यश पाहिजे असल्यास निग्रही व्हावे, अशी तथागत भगवान गौतम बुद्धांची शिकवण आहे – ‘पापकर्म करू नये. पुण्य संपादित करावे आणि आपले चित्त निर्मळ व स्वच्छ ठेवावे.’ –

“सब्ब पापस्स अकरणं कुसलस्स उपसम्पदा |
सचित्तपरियोदपनं एतं बुद्धानं सासनं |”
[ पवित्र धम्मपद ग्रंथ : पद क्र.१८३ ]

वरील सुधारित मुद्दे विचारात घेता इ.स.२०२२ पर्यंत असलेले स्वच्छता अभियान तीन वर्षांनी कमी करून ते २०१९ असे करण्यात आले. असे का? धडाकेबाजपणे राबविले म्हणावे तर त्याचा कोणालाच मागमूस लागला नाही. त्याचा खरा उद्देशही सफल झाल्याचे चिन्ह दिसत नाही. अभियान मागील वर्षीच गुंडाळण्यात येत असल्याची कोणालाच सुतराम कल्पनाही नव्हती. आता आमचा संपूर्ण भारतदेश स्वच्छ सुंदर झाला म्हणावेच लागेल नाही का? इ.स.२०११ च्या जनगणनेनुसार ग्रामीण भागातील ३२.७०% कुटुंबांनाच शौचालयाच्या सुविधा होत्या. तर इ.स.२०१३ मधील नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशनच्या टेहळणीप्रमाणे ग्रामीण भागातील ४०.६०% कुटुंबांनाच शौचालये होती. एवढा फरक दोन वर्षात पडला. त्यानंतरच्या सात वर्षांत १००% हेतू सफल झाला म्हणावे लागेल. स्वच्छ भारत अभियानाने इ.स.२०१९ पर्यंत ‘स्वच्छ भारत’ साध्य करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते.

यासाठी ग्रामीण भागातील स्वच्छतेच्या पातळीत सुधारणा करणे व गाव-खेडे हे हागणदारीमुक्त करणे हे साधारणसे उद्दिष्ट होते. या अंतर्गत ग्रामीण भागात वैयक्तिक शौचालये, सार्वजनिक स्वच्छतागृहे, सामुदायिक स्वच्छतागृहे, शाळा व अंगणवाड्यांमध्ये शौचालये, सुका व ओला कचरा व्यवस्थापन यंत्रणा आदी उभारून कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर देण्यात येणार होता. मग, काय झालं? मात्र सर्वत्र या योजनेचा हेतू दणक्यात आपटला. पाणी कुठे मुरले? कळायला मार्गच नाही. आता तर कोरोना प्रादुर्भावात याची नितांत गरज होती. सगळ्या योजनेचा कसा बट्याबोळ झाला? हा अधिक गांभीर्याने चिंतन करण्याचा विषय ठरला आहे. कारण संतांच्या आदेशा-उपदेशाची पायमल्ली फार मोठी किंमत भरून घेत असते. संत शिरोमणी हरदेवसिंहजी महाराजांनी मानवमात्रांस समजाविले –
“सत्संग है वो ज्ञान सरोवर इस में जो नहायेगा |
सन्त वचन के हीरे मोती और जवाहर पायेगा |
सत्संग गंगा में आ कर जो गोते नित्य लगायेगा |
निर्मल होगा पावन होगा मन की मैल गँवायेगा ।”
[ सम्पुर्ण हरदेव बाणी : पद क्र.९५ ]
आपल्या महाराष्ट्रात याही पूर्वीपासून चांगल्याप्रकारे संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात येत होता. नुकताच या अभियानाला साथ देत गतवर्ष्यापर्यंत पिंपरी चिंचवडमध्ये पर्यावरणप्रेमींनी पवना नदी स्वच्छता अभियान हे ‘जलपर्णीमुक्त स्वच्छसुंदर पवनामाई अभियान’ चालविण्यात आला. पहिले पर्व इ.स.२०१७-१८ मध्ये तब्बल २१५ दिवस चालले. सदर अभियानात एकूण १४५५ ट्रक इतकी जलपर्णी पवना नदीपात्रातून बाहेर काढण्यात आली.
नाना विकाराने, उपद्व्यापाने व कलुषित भावनेने मळकटलेल्या जीवनास सुंगधी द्रव्याचे सिंचण करूनही फरक पडणार नसतोच. म्हणून जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकारामजी महाराज टाच लावतात –

“नाही निर्मळ जीवन ।
काय करील साबण ।।”

जून महिन्यात पावसाळा सुरू होत असल्याने हे अभियान स्थगित ठेवून पावसाळा संपताच ते परत चालू केले जाते.
(क्रमशः)

▪️!! नियमित वाचा पुरोगामी संदेश, वाचनाने लाभे खास संतोष !!

✒️लेखक – श्रीकृष्णदास (बापू) निरंकारी,
(संत साहित्याचे गाढे अभ्यासक)
प.पू.गुरुदेव हरदेव कृपानिवास,
मु. रामनगर वार्ड क्र.२०, गडचिरोली,
पो.ता.जि. गडचिरोली.
मो:-७४१४९८३३३९.
ईमेल – krishnadas.nirankari@gmail.com