माणसात देव शोधणारा माणूस

36

आयुष्याच्या निरंतर प्रवाहात अनेक व्यक्ती आपल्याला भेटतात काही क्षणिक स्मरणात राहतात तर काही अनंत काळासाठी मनात घर करून बसतात. त्यातीलच एक व्यक्तिमत्त्व म्हणजे आमचे अण्णा डॉ. रामचंद्र दांडेकर . अण्णा आणि माझ्या परिचयास जवळपास 18 वर्षे पूर्ण झाले. या कालावधीत त्यांच्याबद्दल मला जे उमगले ते शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे.

आज प्रत्येक माणूस आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी धडपडतो आहे… त्यांना पैसा सोबतच प्रसिद्धीची हाव असते… या प्रसिद्धीसाठी तो कित्तेक प्रयास करतो ते त्याचे त्यालाच ठाऊक पण कोणतीही अभिलाषा न ठेवता निरंतर गरिब रुग्णांची सेवा करण्यात धन्यता मानणारा व्यक्ती हा निराळाच ! मान्य आहेत प्रत्येक व्यक्ती एका विशिष्ट वलयात जिवन जगत असतो. या वलयात कुटुंबाचे, सुखदुःखाचे , जबाबदारीचे, कर्तृत्वाचे, झिजण्याचे, सोसण्याचे अनेक तरंग असतात. अण्णा अनेक तरंगाचं जणू संगमच आहे, आणि यातूनच अण्णा सिद्ध होते गेले.

”रित्या हाताने जन्मा आलो
रित्या हातानेच जाणार
कर माणसा सत्कर्म काही
तेच आपल्या मागे उरणार….”

अगदी या ओळीला अण्णा तंतोतंत जगतात. देव हा मंदीरात नसून माणसातच विसावलेला आहे हे त्यांनी स्वतःच्या आचरणातून सिद्ध केले.

सामान्यापासून असामान्यापर्यंत त्यांच्या आयुष्याची वाटचाल आपणास पाहायला मिळते. वयाच्या 26 व्या वर्षी मूल तालुक्यातील सुशी या गावी वास्तव्यास आले. कालांतराने मूल या गावी स्थायिक झाले. १९५७-५८ मध्ये नागपूर येथील होमिओपॅथी महाविद्यालयात शिक्षण घेतल्यानंतर चंद्रपूर येथील होमिओपॅथीक महाविद्यालयात प्राध्यापक म्हणूनही कार्य केले. काही कालावधीनंतर त्यांनी स्वतःला समाजकार्यात वाहून घेतले. 60 वर्षापासून चंद्रपूर जिल्ह्यातील सुमारे पाच तालुक्यात सायकल प्रवास करून हजारो रुग्णांना त्यांनी जीवनदान दिले. मोबदलाची मात्र कधीच अपेक्षा केली नाही. त्यांनी स्नेहाला भाव दिला आणि कर्माला वाव दिला.

पैशाला जवळ करण्यापेक्षा हा निर्मोही माणूस माणसाला जवळ करुन खऱ्या अर्थाने देवपण जगतो. बाबा आमटे यांची कर्मभूमी असलेले सोमनाथ मूल या गावापासून ५ ते ६ किमी अंतरावर आहे. बाबा आमटेचा कर्म वसा नकळत अण्णाच्या मनात स्थिरावला आणि अव्याहत कर्म करणारा कर्मयोगी अण्णाच्या रूपाने कार्य प्रेरित झाला.जिल्ह्यात कोरूना संसर्ग फोफावत असतानाही डॉ. दांडेकर उर्फ अण्णा यांचे कार्य थांबले नाही. आज वयाचे 87 वर्ष पूर्ण झाले असतांनाही सकाळी ६.३० पासून त्यांचा सायकल प्रवास सुरू होतो तर दिवसभरात १० ते १५ किलोमीटरचा प्रवास करून आजही ते रुग्णांची सेवा करतात. अत्यंत साधी राहणी असलेल्या अण्णांनी आज पर्यंत कधीच पायात चप्पल वापरलेली नाही.

अनवानी पायाने उन्हातानात, पावसापाण्यात रुग्णसेवेसाठी निरंतर त्याची पायपीट सुरू असते. त्यांच्या वागण्या बोलण्यात कुठेही मोठेपणाचा आव दिसत नाही. ‘साधी राहणी उच्च विचारसरणी’ त्यांना तंतोतंत लागू होते. त्यांनी कोणत्याही रुग्णाला कधी पैशाची मागणी केली नाही कि कोणत्याही रुग्णाला टाळले नाही. माणुसकी धर्म पाळणारे अण्णा आणि आजचे गरिबाला लुटून खाणारे डॉक्टर… किती तफावत आहे. आजच्या डॉक्टरांनी अण्णाचा आदर्श ठेवून निदान माणुसकीला तरी जगावे असे मला मनातून वाटते. रुग्ण सेवा हीच खरी ईश्वर सेवा मानणाऱ्या अशा या महान कर्मयोग्यास आणि त्यांच्या कार्यास माझा मानाचा मुजरा.

✒️लेखिका:-सौं. प्रीती राकेश वाडीभस्मे (तडस)
लहरी नगर, मुरारका वाडी, वर्धा

▪️संकलन:-अंगद दराडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-8668682620