शिक्षक मतदार संघ निवडणुकी बाबत जिल्हाधिका-यांनी घेतली बैठक

25

✒️बाळासाहेब ढोले(विशेष प्रतिनिधी)मो:-7875157855

यवतमाळ(दि.3नोव्हेंबर):-भारत निवडणूक आयोगाच्या 2 नोव्हेंबर 2020 च्या पत्राच्या अनुषंगाने अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक 2020 चा कार्यक्रम घोषित झाला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली.

सदर निवडणूकीची प्रक्रिया गुरुवार 5 नोव्हेंबरपासून सुरू होणार असून निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा दिनांक 7 डिसेंबर आहे. या निवडणुकीकरीता यवतमाळ जिल्ह्यात एकूण नोंदणीकृत शिक्षक मतदार 7407 आहे. यात पुरुष शिक्षक मतदार 5614 तर महिला शिक्षक मतदार 1793 आहे.

तसेच जिल्ह्यात एकूण 19 मतदान केंद्र राहणार आहेत. यात यवतमाळ तालुक्यात तीन तर पुसद तालुक्यात दोन मतदान केंद्रांचा समावेश राहणार असून उर्वरीत सर्व तालुक्यात प्रत्येकी एक मतदान केंद्र राहील.

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर ही निवडणूक होत असल्याने कोव्हीड – 19 बाबत सर्व मार्गदर्शक सुचनांचे पालन करण्याचे निर्देश भारत निवडणूक आयोगाने दिले आहे. यात मास्कचा वापर, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आदी बाबींचा समावेश आहे. आदर्श आचारसंहिता जिल्ह्यात कालपासूनच लागली असून सर्वांनी आचारसंहितेचे पालन करावे, अशा सुचना जिल्हाधिका-यांनी दिल्या आहेत.

बैठकीला अपर जिल्हाधिकारी सुनील महिंद्रीकर, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) डॉ. स्नेहल कनीचे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार, पालिका प्रशासन अधिकारी हर्षल गायकवाड, डॉ. राजेंद्र भुयार आदी उपस्थित होते.