सर्वसामान्यांना कोरोनापासून वाचवणारी बळकट संरक्षक भिंत

50

सर्वसामान्य जनता आणि महाभयानक कोरोना विषाणू यांच्यामध्ये धैर्याने, शौर्याने, निर्भीडपणे, खंबीरपणे आणि भक्कमपणे उभ्या असणाऱ्या बळकट संरक्षक भिंतीबद्दल, त्यांच्या भावनांबद्दल, त्यांच्या संवेदनाबद्दल विचार करणार आहोत. सर्वसामान्यांना कोरोना विषाणूपासून वाचवणारी ही बळकट संरक्षक भिंत आहे आपली ‘पोलिस यंत्रणा’. कोरोनाचा प्रसार वाढू नये यासाठी दिवस-रात्र उच्चपदस्थ पोलिस अधिकाऱ्यांपासून ते सर्वसामान्य पोलीस कर्मचाऱ्यापर्यंत प्रत्येक जण अत्यंत निष्ठेने, कष्टाने, समर्पित भावनेने आणि तन्मयतेने सध्याच्या अभूतपूर्व अशा आरोग्य आणीबाणीच्या काळात काम करत आहे. पोलीस यंत्रणेच्या कामाचा सन्मान, कार्यगौरव, कार्यप्रशंसा करण्यासाठी किती ही उल्लेखनीय अलंकारिक शब्द वापरले तरी ते त्यांच्या कार्यकर्तृत्वापुढे अपुरे आहेत.

खरंतर प्रसंग कुठलाही असो. सण-उत्सव कुठलाही असो. कार्यक्रम कुठलाही असो. मोर्चा कुठलाही असो. आंदोलन कुठलेही असो. कोणत्याही प्रकारची सामाजिक घटना असो. अशा प्रत्येक ठिकाणी पोलीस बंदोबस्ताशिवाय पर्याय नसतो. सुखा दुःखाच्या प्रत्येक सामाजिक प्रसंगात सर्वसामान्य जनतेसोबत हीच ‘पोलीस यंत्रणा’ नेहमी धीरोदत्तपणे उभी राहिलेली आहे. असे अनेक प्रसंग आहेत. असा फार मोठा इतिहास आहे. हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. आजच्या दिवसांचा विचार केला; तर यापूर्वी ज्या ज्या प्रसंगांमध्ये पोलिसांनी बंदोबस्ताचे काम केले. त्यापेक्षा कितीतरी कठीण प्रसंग हा आहे. स्वतःला धोका निर्माण करणारा प्रसंग. स्वतःच्या कुटुंबांना धोका निर्माण करणारी वेळ. कार्य करत असताना अदृश्य असणाऱ्या व्हायरस रूपी संकटा सोबत तोंड देण्याची ही परिस्थिती. आत्तापर्यंतच्या परिस्थितीपेक्षा खूप वेगळी आहे. याचे सर्व पोलिस यंत्रणेला जाण आणि भान आहे.

अत्यंत संवेदनशील असे दिवस. प्रत्येक जण भीतीच्या वातावरणा मधून जात असताना एक अनामिक हुरहुर, प्रचंड मानसिक दडपण प्रत्येकाच्या मनात आहे. अदृश्य व्हायरसमुळे आपल्या शरीरावर होणाऱ्या आजाराचा हल्ला. त्यामुळे येणारी मृत्यूसमिपता म्हणून ह्रुदयाची वाढलेली धडधड. अशा सगळ्या भावनिक कोलाहलामध्ये कर्तव्य पार पाडण्याचे आव्हान. कर्तव्य पार पाडताना अनेक बेशिस्त, वेगवेगळ्या कारणाच्या निमित्ताने रस्त्यावर फिरणारे महाभाग, त्यांची वेगवेगळी कारणे. यामध्ये खऱ्या गरजू, परिस्थितीने हतबल असणाऱ्या व्यक्तींवर अन्याय होण्याची भीती.

अशा अनोख्या भावना दिव्या मधून सर्व पोलिस यंत्रणेला जावे लागत आहे. नेहमीच्या बंदोबस्तात कायमस्वरूपी उन्हातानात, पावसात, वादळवाऱ्यात, थंडीत देखील रस्त्यावर राहून, कडेकोट बंदोबस्ताचे काम नित्यनियमाने आमची पोलीस यंत्रणा करत आली आहे. आमच्या देशाचे दुर्भाग्य म्हणजे याच कार्यतत्पर पोलीस यंत्रणेला कायमस्वरूपी टीकेला व बदनामीला सामोरे जावे लागत आले आहे. कायमस्वरूपी ज्या जनतेसाठी उन्हातानात, थंडीवाऱ्यात, कार्यतत्परतेने कर्तव्य पालन केले. त्यांच्या संरक्षणाचं काम केले. त्यापैकी काही असामंजस्य जनतेने त्यांना मात्र भ्रष्टाचार, बदनामी आणि टीका याचेच बक्षीस दिले.

कोरोना विषाणू विरुद्धच्या या लढाईत केवळ आपणच नाही; तर आपल्या सभोवतालची सगळेच, म्हणजे थोडक्यात हे जग वाचले पाहिजे. अशी भावना असणाऱ्या पोलिस यंत्रणेवरच काही बेशिस्त, बेजबाबदार लोकांनी हल्ले केले. त्यांना जखमी केले. काहींनी तर त्यांना अक्षरशः वाहनाखाली चिरडून टाकले. का आणि कशामुळे..? तर त्याचे कारण एकच. ही सर्व यंत्रणा कायद्याचे पालन करण्यासाठी कार्य करते. कायद्याचे उल्लंघन होऊ नये. यासाठी दिवस रात्र झटत असते. दिवस-रात्र लढत असते.

सध्याच्या काळात तर या पोलीस यंत्रणेवर प्रचंड मोठा ताण आहे. आज त्यांना कोण कोणती कामे करावी लागत आहेत. याचा विचारही आपण करू शकत नाही. आपल्याला तर केवळ एवढेच माहिती आहे पोलीस बंदोबस्त करत आहेत. पण या बंदोबस्त सोबतच अनेक कामे यांना करावी लागत आहेत. यामध्ये पळून गेलेल्या कोरोना रुग्णाचा शोध घेणे. त्यांना दवाखान्यापर्यंत पुन्हा घेऊन येणे. पुन्हा असे रुग्ण पळू नयेत म्हणून दवाखान्याला गस्त घालने. दवाखान्याला पहारा देणे. काही बेशिस्त रुग्ण उपचार करणाऱ्या आरोग्य यंत्रणे सोबत असभ्य वर्तन करत आहेत. अशा बेजबाबदार महाभागांना वठणीवर आणण्यासाठी दवाखान्याला, आरोग्य यंत्रणेला संरक्षण देणे. कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध घेतल्यानंतर जे नागरिक दवाखान्यात येण्यास तयार नाहीत त्यांना दवाखान्यात आणण्यासाठी, आरोग्य यंत्रणेला पोलिसांनाच मदत करावी लागत आहे. शहरात, सार्वजनिक ठिकाणी, बाजारपेठेत, भाजी मार्केटमध्ये गर्दी होऊ नये याकडे लक्ष द्यावे लागत आहे.

अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या दुकानांमध्ये, भाजीपाला मार्केटमध्ये व्यक्तीं व्यक्तींमध्ये सुरक्षित सामाजिक अंतर (सोशल डिस्टन्स) नियमाचे पालन केले जात आहे का ? याची पाहणी करणे. पालन होत नसल्यास त्यासाठी प्रयत्न करणे. संचार बंदी चे पालन होत आहे का ? पाहणे. या लॉकडाऊन च्या काळात विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या लोकांचे समुपदेशन करणे. त्यांना समजावून सांगणे. लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवेशिवाय इतर दुकाने उघडली जाणार नाहीत. याची खबरदारी घेणे. इतर दुकाने उघडल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करणे. प्रत्येक चौकाचौकांमध्ये बंदोबस्त ठेवणे. जिल्ह्याच्या सीमेवर दिवस-रात्र सतत चोवीस तास जागता पहारा ठेवणे.

जिल्ह्याच्या बाहेरील व्यक्तीस प्रवेशास बंदी करणे. चौकाचौकात, नाक्यानाक्यावर, येणाऱ्या-जाणाऱ्या वर नियंत्रण ठेवणे. त्यांची चौकशी करणे. बेजबाबदारांवर, बेशिस्त वागणारांवर प्रथमत: समजावून सांगणे. समजावूनही लक्षात येत नसल्यास आपल्या लाठीच्या प्रसादाने वठणीवर आणणे. त्याचाही फरक न पडल्यास कायदेशीर कार्यवाही करणे. अनावश्यक घराबाहेर पडणाऱ्या वाहने जप्त करणे. अशा वाहनांवर गुन्हे नोंदवणे. अशा प्रकारची विविध कामे कोरोना विषाणू मुळे निर्माण झालेल्या आणीबाणीच्या काळात करावी लागत आहेत.

या कामासोबतच घडणाऱ्या इतर गुन्ह्यांवर देखील काम करावे लागत आहे. यामध्ये रात्री गस्त घालने, चोरी, घरफोडी, खुन, बलात्कार, आत्महत्या यासाठीसुद्धा नेहमीप्रमाणे काम करावेच लागत आहे. याशिवाय ही बरेच कामे आहेत ज्याचा आपल्याला अंदाजही नाही. केवळ काम करून भागत नाही. तर या कामासोबत अदृश्य विषाणूच्या हल्ल्याला सामोरे जावे लागत आहे. बंदोबस्त करताना, रस्त्यावर फिरताना, चौकशी करताना कोणता बाधित व्यक्ती संपर्कात येईल ? याचा काही नेम नाही. दवाखान्यात काम करताना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये. म्हणून तळपायापासून डोक्याच्या केसापर्यंत झाकून घेण्यासाठी पी पी ई किट स्वसंरक्षणासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांकडे आहे. रस्त्यावर 24 तास बंदोबस्त करणाऱ्या या पोलीस मित्रांकडे मात्र मास्क आणि सैनीटायझर वगळता इतर कोणतेच साधन नाही. आमची पोलीस यंत्रणा सक्षम, बलाढ्य, बळकट आहे यात शंकाच नाही ; पण या अदृश्य व्हायरसचा हल्ला रोखण्यासाठी त्यांच्याकडे शक्तिमान सारखी अदृश्य ताकद नाही. ते ही सर्वसामान्य माणसा सारखी हाडामांसाची माणसेच आहेत. त्यांनाही त्यांच्या जीविताची भीती आहे. त्यांच्यावरही कोरोना बाधितामुळे या विषाणूचा हल्ला होऊन संसर्ग होऊ शकतो. हे विसरून कसे चालेल…? याचा अनुभव मागील काही दिवसापासून आपण घेत आहोत. जवळजवळ आतापर्यंत कित्येक पोलिसांना कोरोना चा प्रादुर्भाव झाला आहे. काही पोलिसांचा तर बळी गेला आहे.

पोलीस यंत्रणेच्या प्रचंड जोखमीच्या कामामुळे या सर्वांना आपल्या कुटुंबापासून दूर राहावे लागत आहे. अलिप्त राहावे लागत आहे. कित्येकांनी तर आपली राहण्याची व्यवस्था घरापासून वेगळ्या ठिकाणी केली आहे. आपल्यामुळे आपल्या कुटुंबातील सदस्यांना संसर्गाचा धोका नको असे मनोमन या पोलीस वीरांना वाटत आहे. बालगोपाळांनी फुललेलं कुटुंब असूनही आज निराधार सारखी अवस्था या वीरांवर आलेली आहे. आपल्या सुखा दुखाच्या गोष्टी सुद्धा आपल्या सहकार्याशिवाय इतर कुणाला सांगण्याची सोय नाही प्रचंड मानसिक कठोरतेमधून ही सर्व मंडळी जात आहे.

कर्तव्यपरायण ते साठी आपल्या कुटुंबा पासून अलिप्त राहणे ही सोपी गोष्ट नाही. हा साधा त्याग नाही. खरंतर या त्यांच्या कार्य तत्परतेमुळे, महान कर्मयोगामुळे, त्यांच्या त्यागामुळे त्यांचा सन्मान व्हायला पाहिजे. त्यांना प्रोत्साहन मिळायला पाहिजे. काही ठिकाणी त्यांच्यावरती पुष्पवृष्टी करून त्यांचा सन्मान केला गेला. पण काही ठिकाणी मात्र त्यांच्यावरच हल्ले झाले. तर काहींनी त्यांच्या कडेच बोट दाखवले. कुठे आहे आमची पोलीस यंत्रणा? काय करतात पोलीस? असे प्रश्न विचारणाऱ्यासाठी मला असे सांगावे वाटते. रखरखत्या उन्हामध्ये आपल्याला असणाऱ्या आजारपणाची तमा न बाळगता, बंदोबस्त करणारा आमचा पोलीस मित्र आपणास दिसला नाही का ? पळून गेलेल्या कोरोना बाधितांना शोधण्यासाठी वन वन हिंडणारा आणि यामुळे आपल्यालाही संसर्ग होऊ शकतो याचा विचार न करणारा पोलीस मित्र आपणास दिसला नाही का ? रस्तोरस्ती, गल्लोगल्ली, दारोदारी माणसांना जागृत करण्यासाठी गाणे म्हणणारा, भाषण करणारा, कविता गाणारा, घसा कोरडा होईपर्यंत ओरडून-ओरडून सूचना देणारा माझा पोलीस मित्र दिसला नाही का ? बंदोबस्ताचे काम करता करता स्वतःला संसर्ग झाला आणि त्यानंतर दवाखान्यात ऍडमिट होण्यासाठी कळवळणारा माझा पोलीस मित्र दिसला नाही का ? चौकाचौकात, गल्लीबोळात गर्दीमध्ये जाऊन, गर्दी करू नका म्हणून सांगणारा माझा पोलीस मित्र दिसला नाही का ? सोशल डिस्टन्सचे पालन करा असे दुकानात दुकानात जाऊन सांगणारा पोलीस मित्र दिसला नाही का ?

जे लोक बोलतात पोलीस चौकात कशासाठी उभा राहतो ? हे आम्हाला चांगलंच माहिती आहे. चेक पोस्टवर पोलीस गाड्या का अडवतात ? ते आम्हाला चांगलेच माहित आहे. कागदपत्र मागताना पोलिस यंत्रणा त्रास देते असे वाटणाऱ्यानी थोडा विचार करा. मित्रांनो, सिग्नलवर, चौकात तुमची गाडी अडवणारा तुमच्या भाषेतील ‘पांडू’ हवलदार तुम्हाला कित्येक वेळ भेटला असेल. पण आज तुम्ही सुरक्षित राहावे म्हणून चौकाचौकात, नाक्यानाक्यावर, कमरेवर हात ठेवून, घरातून बाहेर पडू नका अशी विनंती करणारा ‘पांडुरंग’ तुम्ही पाहिला नाही का ? ज्या हातांनी लाठीचा प्रसाद दिला त्याचे क्षणचित्र टिपले असेल. पण त्याच हाताने निराधारांना आधार दिला. गरजूंना मदत केली. भुकेल्यांना अन्न दिले. तहानेने व्याकूळ झालेल्याना पाणी दिले, त्यांची तहान भागवली. त्याचे क्षणचित्र कोणी टिपले?आज खऱ्या अर्थाने या पोलिसांच्या कथा आणि व्यथा समजून घेणे हे आपलं कर्तव्य आहे.

ज्या कुटुंबातील पोलीस कर्तव्यावर आहेत त्या कुटुंबातील माता-भगिनींना काय वाटत असेल ? मुखी घेतलेला घास त्यांच्या तोंडात घुटमळत असेल की नाही ? माझा मुलगा, माझा पती, माझा भाऊ कसा असेल ? तो घरी परत कधी येईल ? तो सुरक्षित राहील का ? त्याला कोरोनाची बाधा तर होणार नाही ? यासारख्या असंख्य विचाराने त्यांचं मन पोखरून गेलं असेल. लॉक डाऊन मध्ये सण-उत्सवासारखे पदार्थ करून खाणाऱ्या प्रमाणे या पोलिसांच्या घरात जेवण बनवले जात असेल का ? बनवलं तर जेवण जात असेल का ? आज रखरखत्या उन्हात कर्तव्य पार पाडताना, घसा कोरडा पडला तर पाणी पिण्याची सोय तरी आहे का ? याचा विचार करा. काही संस्था, काही लोक, पोलीस मित्रासाठी जेवण, नाश्ता, चहा ,पाणी देण्याचे काम करत आहेत. हे निश्चिधतच पुण्याचे काम आहे.
ज्या पोलीस महिला भगिनी कर्तव्यावर जाताना त्यांचे तान्हे बाळ त्यांच्यापासून दूर जायला तयार नसेल; त्यावेळी त्या आई असणाऱ्या पोलीस भगिनीच्या मनाला किती यातना होत असतील ? कर्तव्य पार पाडून पुन्हा घरी परतल्यावर आपल्या बाळाला आपल्यामुळे संसर्ग होऊ नये. म्हणून त्या हिरकणीस किती काळजी घ्यावी लागत असेल. “बाबा… तुम्ही बाहेर जाऊ नका. बाहेर कोरोना आहे.” असे सांगणाऱ्या चिमुकल्याचे शब्द ऐकून, त्या बापाचा पाय घराबाहेर पडल्यानंतर लडिवाळपणे हट्ट करणारा तो चिमुकला कितीवेळा आठवत असेल.

या दुर्धर प्रसंगात संसर्ग झालेल्या पोलिसांची अवस्था, त्यांच्या कुटुंबीयांची अवस्था त्यांच्या मनाचा भावनिक कल्लोळ कसा असेल ? तुम्ही सुरक्षित रहा. घरी रहा, सुरक्षित रहा. विनाकारण घराबाहेर पडू नका. याचा टाहो फोडणाऱ्या पोलिसांना जो संसर्ग झालाय; तो केवळ जनसामान्यांचे संरक्षण करण्यामुळे. साधी साधी गोष्ट आहे. ज्या कुटुंबातल्या व्यक्तीला कोरोना झालाय, ज्या भागातल्या व्यक्तीला कोरोना झालाय, तो भाग काही ठराविक अंतरापर्यंत सील करण्यात येतो. अशा बाधित क्षेत्रात बंदोबस्तावर असणाऱ्या पोलीस मित्राचे धाडस किती असेल ? एका बाजूला कोरोना रुग्णांना त्यांचे कुटुंबीय स्वीकारायला तयार नाहीत. दुर्दैवाने मृत्यू झाल्यास त्यांच्यावर अंत्यसंस्कार करायला तयार नाहीत. अशावेळी मात्र याच कोरोना रुग्णांना मायेने, ममतेने, आपुलकीने, प्रेमाने आरोग्य यंत्रणा आणि पोलिस यंत्रणा हाताळत आहे. कंटेनमेंट झोन बाधित क्षेत्र येथे कडक संचारबंदीचे पालन होत आहे का ? या क्षेत्रात कुणी प्रवेश करू नये. या क्षेत्रातून कोणी बाहेर पडू नये. यासाठी याच बाधित क्षेत्रात बंदोबस्त करणाऱ्या पोलिसाची करावे तेवढे कौतुक कमी आहे. कारण बाधित क्षेत्रात संक्रमणाचा अधिक धोका असतो. हा धोका पत्करून निधड्या छातीने संकटाला, अदृश्य विषाणूला सामोरे जाण्याचे महान कार्य हे पोलीस मित्र करत आहेत. खरोखरच यांच्या कार्याला मानाचा मुजरा.

 

गणवेशाच्या आतही असतो,
माणुसकीचा झरा.
पोलीसातील माणूस,
तुम्ही जाणून घ्या हो जरा.

 

मित्रांनो, आज या पोलिस यंत्रणेला खऱ्या अर्थाने गरज आहे ती सहानुभूतीची, आपुलकीची, शाब्बासकीची, प्रोत्साहनाची आणि “तुम्ही तुमची काळजी घ्या.” असा म्हणणाऱ्या मित्रांची. आपल्या संपर्कातील पोलीस नातेवाईक, पोलीस मित्र यांना आवर्जून संपर्क करा. त्यांना दोन शब्द प्रेमाने बोला. आवर्जून सांगा, “कर्तव्य पार पाडताना इतरांसोबत तुम्ही तुमची सुद्धा काळजी घ्या.” बघा मन भरून येईल. याच प्रेमाच्या दोन शब्दाने हे पोलीस बांधव गहिवरून जातील. दाटलेल्या कंठाने तुम्हाला धन्यवाद देतील. त्यावेळी तुम्हाला कळेल पोलीस भावनाशून्य नाही; तर अत्यंत भावनिक असतात. नक्की करून पहा आणि त्यांचे आशीर्वाद घ्या.त्यांनाही कळू द्या, बोट दाखवणारे, टीका करणारे, हल्ला करणारे लोक असतीलही काही; पण तुमची काळजी करणारे, तुमच्याविषयी आदर सन्मान असणारे, करोडो माणसे आहेत. ज्यांना जाणीव आहे की, तुम्ही आमच्यासाठी रस्त्यावर निधड्या छातीने लढत आहात. आपल्या कार्यास मनस्वी प्रणाम.

दुसऱ्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी अदृश्य शत्रू सोबत रस्त्यावर लढणाऱ्या या ‘फ्रन्टलाइन वारियर्स’ ज्यावेळी कोरोना बाधित होतो. त्यावेळी त्याच्या मनात काय वाटत असेल ? सेवा करता करता या कोरोना चा प्रसाद मिळाला आणि मी आजारी पडलो. या आजारात जे वयोवृद्ध पोलीस बंधू तळमळले असतील, तडफडले असतील त्यांच्या भावना काय असतील. प्रचंड संघर्ष करून या युद्धात कोरोना विरुद्ध हतबल होऊन जे पराजित झाले. ज्यांचा यात अंत झाला. त्यांच्या कुटुंबावर किती वाईट वेळ आली. दुःखाचा डोंगर कोसळला, आभाळच फाटलं. सक्षम पणे आधार देणारा आधारवड गेला. त्यांच्या पत्नीची, त्यांच्या लेकरांची काय अवस्था झाली असेल ? हंबरडा फोडला असेल त्यांनी. असे नको व्हायला पाहिजे होते. शेवटी नियतीच ती. तिच्या पुढे कोणाचे काय चालते. कोरोना युद्धात आमच्यासाठी लढणाऱ्या आणि शहीद झालेल्या अमर योद्ध्यांना भावपूर्ण आदरांजली! विनम्र अभिवादन!

✒️लेखक:-श्री. मयूर मधुकरराव जोशी(ग्रीन पार्क, जिंतूर. जिल्हा परभणी)मो:-9767733560,7972344128