अमूर्त कल्पना मूर्त स्वरूपात

29

दरवर्षी मार्च महिना उजडताच विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या परीक्षांना तोंड द्यावे लागते. मग स्पर्धा परीक्षा असोत किं वर्गपरीक्षा! मात्र यंदा मार्च २०२० पासून कोरोना विषाणूच्या संसर्गाने देशात धुडगूस घातला. त्यामुळे शासनाने संपूर्ण देशात तात्काळ जमावबंदी, संचारबंदी अर्थात संपूर्ण टाळेबंदी लागू केली. जिथल्या तिथे सारे व्यवहार ठप्प पडले.

शिक्षणसंस्था, कारखाने, उद्योगधंदे, दळणवळणाची साधने, बाजारपेठा, पर्यटनस्थळे, प्रार्थनास्थळे, देवालये आदी सगळे कुलूपबंद करण्यात आली. विद्यार्थी, पाहुणे, कामगार व हातावर पोट असणारा मजूरवर्ग जिथल्या तिथे अडकून पडले होते. या साऱ्यांची कशी अन्नान्न दशा झाली, ते आपण अनुभले आहेच. तुकडाभाकर वा मूठभर अन्नासाठी फार मोठे हाल झाले. सर्वांपर्यंत अन्न पुरविण्याचा शासन, सेवाभावी संस्था व दानशूर व्यक्तींनी प्रयत्न केला. परंतु ते तोकडेच पडत होते.

या भुकमरीपायी बाहेरगावी अडकलेल्यांना स्वगावाची ओढ लागली आणि बर्‍याच लोकांनी तर हजारो कोसांचा टप्पा अहोरात्र पायपीट करून गाठलाही. काही अर्ध्यातच गचकले. आपल्या माणसांची मेल्या-वाचल्याची धड खबरबात मिळणे कठीण झाले. अडचणीत वा संकटात सांपडल्याची किंवा मृत्यू पावल्याची बातमी मिळूनही तिथवर पोहचणे, मदत करणे अथवा नुसते अंत्यदर्शन करणेही दुरापास्त झाले. मग ती व्यक्ती जवळची किंवा अतिप्रियही असु द्या ना!

आपण विद्यार्थीदशेत असताना परीक्षेच्या काळात निबंधांची पुस्तके चाळावी लागत असत. ऐनवेळी परीक्षेत आलेल्या निबंधावर खुप विचारमंथन करून रचना करावी लागायची. कधी कधी तर काही मुद्दे लिहून निबंध अर्धवटच सोडून द्यावा लागत असे. कल्पनेचा विस्तार करावा लागणारे निबंध जास्तीत जास्त विचारांती चांगल्याप्रकारे लिहिता येत असत. मात्र वेळेचे बंधन आडकाठी ठरत असे. डोक्याला विशेष ताण व ताप देणारे ते विषय असायचे. माझ्या अल्पमतीने विशेषतः ते पुढीलप्रमाणे विषय असतात..

(१) यंत्रे संपावर गेली तर.. (२) परीक्षा रद्द झाल्या तर.. (३) शाळा बंद पडल्या तर.. (४) नागरिकांना गांव आठवते तेव्हा.. (५) निसर्ग कोपला तर.. (६) पाटी फुटली अन् शाळा.. (७) देऊळीचा देव मेला.. (८) कामगारांचे हात थांबले तर.. (९) बाजारपेठा बंद पडतात तेव्हा.. (१०) माणुसकीची टंचाई भासते तेव्हा.. (११) गावाची ओढ अस्वस्थ करते तेव्हा.. इत्यादी इत्यादी. यंदा मात्र असे कल्पनाप्रधान निबंध अक्षरशः चित्रपटातील दृश्यांप्रमाणे डोळ्यासमोर तरळत आहेत. त्या केवळ कल्पनाच न उरता प्रत्यक्षात घटीत घटना ठरल्या आहेत. कल्पनांवर आधारित अख्खे निबंधच्या निबंध सत्यात परावर्तित झाले आहेत.

जवळ जवळ वर्ष पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. मात्र प्रत्यक्षात सत्य साकारलेले निबंध आता शब्दबद्ध करण्यास परीक्षाच रद्द झाली आहे. हेच मोठे दुर्भाग्य! सर्व प्रसार माध्यमांद्वारे जाहीर झाले की यंदाच्या वर्षी कोणत्याही परीक्षा घेतल्या जाणार नाहीत. सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. ही बातमी ऐकून कदाचित छोट्यांपासून मोठ्यांपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना आनंदही झाला असेल. त्यांच्या आई-वडिलांनीही सुटकेचा निःश्वास सोडला असेल.

शिक्षकवर्गास पेपर काढणे, ते घेणे, तपासणे व निकाल तयार करणे आदी भानगडीतून सूट मिळाली म्हणून ते खुश झाले असतील. परीक्षक, पर्यवेक्षक व शिक्षणतज्ज्ञ यांनाही कटकटीतून मोकळीक मिळाल्याचा आनंद वाटला असेल. परीक्षा नाही तर अभ्यास नाही. उगीच जागरण करण्याची काय गरज? सकाळी लवकर उठण्याची कटकटच मिटली, अशा आसुरी आनंदात विद्यार्थी असतील. “अरे, अभ्यास कर. नाहीतर नाहक नापास होशील.” अशी मोठ्यांची पिरपीर नाही. मस्त खेळा, लोळत पडा! गृहकार्य, स्वाध्याय, आकडेमोड, रेखाटन, प्रयोग, निष्कर्ष, पत्र-निबंध लेखन असे कोणतेही लचांड राहिले नाही.

शाळेत जाऊन शिक्षकांचे ऐका, दिवसभर चार भिंतींच्या आत बंद रहा, वाचन व लेखन करा, या साऱ्याच नाटकांना ब्रेक लागले. का? तर शाळाच बंद पडल्या आहेत ना! “तुला नापास करीन हं, परीक्षेला बसू देणार नाही बरं!” असा गुरुजनांचा सज्जड दम नाही. कारण परीक्षा झाल्याच नाही. त्या झाल्या नाहीत म्हणून परीक्षाकेंद्रावर गडबड वा गोंधळ उडाला नाही. पेपरफुटी बंद होती. कॉपी बहाद्दरांना कॉपी करण्याचा विक्रम घडवावा लागला नाही. पास होण्यास वशीलेबाजी-भ्रष्टाचारी मार्गाचा अवलंब करावा लागला नाही.

परीक्षा आटोपल्याची धम्मालही करावी लागली नाही. आता मात्र शाळा बंदला वर्ष लोटत असल्याने सारेच आदमुसून गेले आहेत. अशी अमूर्त कल्पना मूर्त स्वरूपात अनुभवता येईल, असे कोणालाच स्वप्नातसुद्धा वाटले नसेल. यापुढे तरी अशी पाळी पुन्हा येऊ नये, अशी ते ईश्वराकडे प्रार्थना करू लागले आहेत.
कोरोनाचा सर्वात जास्त फटका बसला असेल तर तो हातावर पोट घेऊन वावरणाऱ्या मजूरवर्गाला! एवढे दिवस त्यांना जीवंत असूनही मेल्या मढ्यांचा अनुभव आला. “मेलो असतो तर सुखात गेलो असतो!” असे उद्गार नेहमी त्यांच्या तोंडातून बाहेर पडत होते.

एकामागून एक असे नैसर्गिक संकटांचे वारे शेती व्यवसायांवरही घोंगावत आहेत. मात्र शेतकरी बांधवानी धीर सोडला नाही. नेहमीप्रमाणे तो आपल्या कामात व्यस्त आहे. पिकांचे अतोनात नुकसान झाली असली तरी तो सदैव प्रयत्नरत आहे. प्रयत्नशील नाही तो बळीराजा कसला? जगातील जीवसृष्टीच्या खाद्यान्नाची तजवीज लावू न शकणारा अन्नदाता ठरूच शकत नाही. ‘शेतकरी संपावर गेला तर..’ हा कल्पनाविलास प्रत्यक्षात कदापिही उतरू नये, असे ईश्वर चरणी साकडे घालतो. असे झाले तर मानवमात्रांचे अस्तित्वच नाहीसे होऊन जाईल. मग निबंध वा प्रबंध शब्दांत मांडणारा विद्यार्थी अथवा तत्वज्ञ मागे उरणारच कसा?

✒️लेखक:-श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरुजी.
(लेखक/कवी व शैक्षणिक विचारवंत)
मु.पिसेवडधा, ता.आरमोरी, जि.गडचिरोली.(मो:-९४२३७१४८८३)
इमेल – nikodekrishnakumar@gmail.com