ऋणानुबंधाच्या गाठी…

32

मागच्या बऱ्याच दिवसात कोरोनाने अनेकांना घरी बसवले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता; सर्व कर्मचारी ‘वर्क फ्रॉम होम’ करत आहेत. जीवनावश्यक वस्तू ची दुकाने वगळता; व्यापारी मंडळीही घरीच आहे. 31 मे पर्यंत तर संपूर्ण भारत देशातच टाळेबंदी होती. एक जून पासून यात शिथिलता यायला सुरुवात झाली. हळूहळू सर्व काही सुरू होत आहे.

या दरम्यानचा काळ प्रत्येकाला बरेच काही शिकवून गेला. आपण आणि आपले घर, यात वाढत असलेला दुरावा. संपत असलेले संवाद. विरून जात असलेलं प्रेम. आटत असलेली माया. प्रभावहीन होत असलेली वासल्य, आपुलकीची भावना. मरत चाललेल्या संवेदना. भरकटत असलेलं जीवन. स्पर्धेच्या या युगात, धावपळीच्या या जगात, “कशासाठी जगतो आहोत आम्ही…?” याचाच पडलेला विसर.

याच काळात पती-पत्नीच्या नात्यातील कलहाने तर कळस गाठला. सात जन्माचे नाते असणारे जोडीदार. आयुष्यभर साथ-सोबत करण्याची शपथ घेऊन एकत्र आलेले. खऱ्या अर्थाने तीन महिने पूर्ण वेळ सोबत राहायला मिळाले; तर तीन महिन्यातच एकमेकांना कंटाळले. अक्षरशः भांडायला लागले. तसे पाहता हा प्रश्न सर्वसामान्य कुटुंबांमध्ये भेडसावत नाही. हा प्रश्न सुख टोचणाऱ्या लोकांना सतावतो. याहीपेक्षा धनदांडग्यांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागत असेल…? याचा अंदाजही बांधता येत नाही.

जिथे दोन वेळच्या अन्नाचा प्रश्न आहे. तिथे भांडणे नसतात. सामंजस्य असतं. परस्परांसाठी त्याग असतो. तरीही तिथं प्रश्न असतात. संध्याकाळचा कसं होणार…? पुढे काम मिळेल की नाही…? उपजीविका कशी भागवायची…? लेकरांच्या भविष्याच काय…? एक ना अनेक प्रश्न. गरजा पूर्ण करण्यासाठी, प्रश्न सोडवण्यासाठी ज्यांना वेळ पुरत नाही; त्यांच्या जीवनात अशा समस्यांना थारा नसतो. मुळात अशा फालतू समस्या त्यांच्या जीवनात उद्भवतच नाहीत. त्यांच्याकडे परस्परांबद्दल प्रेम, आदर, आपुलकी असतेच. एवढेच नाही तर एकमेकासाठी उपाशी राहण्याची तयारी असते. आलेली परिस्थिती आणि दुःख माणसाला सगळं शिकवते. पण सुख मात्र टोचायला लागतं.

दिवसेंदिवस माणूस माणसापासून दुरावला जात आहे. नात्यात दुरावा येत आहे. घरातल्या घरात माया, ममता, आपुलकी उरलेली नाही. पती-पत्नीत पाहिजे तसे सामंजस्य राहिले नाही. एकमेकांबद्दल विश्वास राहिला नाही. लेकरांना आई-बापाची ओढ राहिली नाही. नाते कोरडे पडलेत. घर मायेअभावी कुपोषित झालंय. पैशानं घरात झगमगाट आला. सगळं काही चकचकित झालं. पारदर्शक फरश्या झाल्या, प्रत्येक भिंत वॉल पुट्टीने गुळगुळीत झाली. छतावर पीओपीने शोभा आली. घराच्या एलेवेशनने घरात दिमाखदारपणा मध्ये ‘चार-चाँद’ लावले. ‘दिखावेगिरी’ दृष्ट लागण्यासारखी झाली. पण अंतरंगाचे काय…? त्यातल्या मायेच्या ओलाव्याचे काय….?

 

घर असावं घरासारखं

नकोत नुसत्या भिंती

तिथे असावा प्रेम जिव्हाळा

नकोत नुसती नाती…..

 

या घरातून पिल्लू उडावे

दिव्य घेऊन शक्ती…

 

भव्य-दिव्य दिमाखदार बंगला विकत घेता येऊ शकतो. ‘घरपण’ विकत घेता येत नाही. जिव्हाळा, वात्सल्य, मायेची ऊब बाजारात मिळत नाही. पैशाच्या तोऱ्याने घर सजवता येईल. फर्निचर घेता येईल. वस्तू घेता येतील. रंग-संगतीचे पडदे बसवता येतील. माणसांच्या मनाचं काय…? हा प्रश्न पैशाने सोडवता येत नाही. इथे माया, ममता, वात्सल्य, त्याग, जिव्हाळाच लागतो.

“ऋणानुबंधाच्या गाठी….” देव बांधत असतो. आपण केवळ निमित्तमात्र असतो. असं असलं तरी…. आयुष्यभर माणसाचा तोरा मात्र जात नाही. गडगंज श्रीमंत, उच्चविद्याविभूषित, देखना, स्वरूपवान जोडीदार निवडला याचं समाधान नसलं; तरी अहंकार मात्र निष्कारण निर्माण होतो. खरंतर हा विधात्याच्या खेळ आहे. “कुणाच्या शालूची गाठ…., कोणाच्या अंगावरल्या शालीसोबत मारायची…, हे त्याचं त्यालाच माहीत. नाहीतर प्रत्येक माणसाने अगोदर वेगवेगळे गणित जुळवलेले असतात. कोणाच्या मनासारखं होतं; तर कोणाच्या मनाविरुद्ध. कोणी आनंदात असतो तर कोणी संभ्रमात. कोणाला कोण पाहिजे असते…? हे त्याचे त्यालाच ठाऊक. पुढं कोणी सांगतो; तर कोणी सांगतही नाही. एवढं कठीण काहीच नसतं आपण गुंतागुंत वाढवतो.

अनेकांच्या आयुष्यातलं पहिलं प्रेम वेगळं, आणि संसार वेगळा. त्यातही पहिलं प्रेम किती…? याची संख्या नक्की सांगता येत नाही. त्यानंतरचे दुसरे प्रेम मात्र एकच…. ते म्हणजे जोडीदारावरचं. ते मनापासून जपलं की झालं. मग खऱ्या अर्थाने दोन्ही जीव संसारात रमतात. संसार फुलतो, बहरतो. पती-पत्नी एकजीव होतात. दाम्पत्याच्या नात्यापलीकडे मित्रत्वाचं नातं तयार होतं. पत्नी मध्येच प्रेयसी दिसायला लागते. तिलाही प्रियकर सापडतो. एकदा हे समजलं की; आयुष्यात हातातून सुख कधीच निसटत नाही. मग समाधान मानवं लागत नाही. ते आपोआप मिळतं. एकमेकांना समजून घेतलं. परस्परांचा आदर केला. सुखा,दु:खात साथ-सोबत केली. संकट काळात आधार दिला. पडत्या काळात बळ दिलं. एकमेकांचे मानसिक-भावनिक आधार स्तंभ झालो. म्हणजे भविष्यात कधीच प्रश्न निर्माण होत नाहीत. उलट निर्माण होणारे प्रश्न सुटायला लागतात.

पती-पत्नीच्या नात्यात मैत्रीचे बीज रुजलं; की मग संसार बहरताना ते रोप ही बहरत जातं. रोपटयाच्या वृक्ष होतो. आयुष्याच्या वाटेवर कधीतरी हाच वृक्ष ‘कल्पवृक्ष’ बनतो. वाट्टेल ते देणारा. मनातली प्रत्येक इच्छा पूर्ण करणारा. विचार करा… आपला सोबती जेव्हा खरा मित्र बनतो. त्यावेळेच्या सुखाला सीमा असेल का…? आता काही लपवायचं नाही… उलट आणखीनच उलगडत जायचं. सगळं सांगून मोकळं व्हायचं. सांगता-सांगता त्याच्याच खांद्यावर हात ठेवून; कधीतरी पुन्हा त्याच जुन्या जगात जाऊन यायचं. कुठली अपराधी भावना नाही. कोणती नवी लालसा नाही. सगळं कसं स्वच्छ; नितळ पाण्यासारखं.

साथीदारालाच मित्र बनवलं की; आयुष्यातील सगळेच प्रश्न आपोआप सुटतील. दोन पाऊल पुढे टाका. एखाद्या गोष्टीत माघार घ्या. आधी दुसऱ्याला समजून घ्या. मग स्वतःला समजून घेण्याची अपेक्षा ठेवा. बघा आयुष्य बदलते की नाही…? जेव्हा परस्परांबद्दल अतीव विश्वास निर्माण होतो. कुठल्याच परीस्थितीत माझ्या जीवनाचा साथीदार विश्वासघात करणार नाही. असं वाटलं की…. कधीतरी हाच मित्र आणि हीच मैत्रीण तुम्हाला तुमचं पहिलं प्रेम आठवायला लावते. सांगायला लावते. बोलायला लावते. आयुष्याच्या या वळणावर स्वतःचं मित्रत्व शाबूत ठेवून; तिच्यासोबत पुन्हा मैत्री जपायला लावते.

एवढं सगळं केलं की, कुणीही जुन्या जगात रमत नाही. कधीतरी तिला भेटेल, बोलेल. ही इच्छा आता राहिलेली नसते. जोडीदारानेच ती पूर्ण केलेली असते. आता मनही पहिल्या विसाव्यात विसावा घेत नाही. जुनं असलं तरी; ते जग परकं असतं. याचं जाण आणि भान आपोआप राहतं. आता गप्पा झाल्या; तरी त्या एकमेकांच्या संसाराच्या होतात. जुन्या आठवणींना आता महत्त्व राहिलेले नसते. आत्ताचे सगळे महत्त्वाचे असते. हे तेव्हाच साध्य होते….; ज्यावेळी खऱ्या अर्थानं “ऋणानुबंधाच्या गाठी….” जुळल्यानंतर; कुणावरच बंधने येत नाहीत. याउलट आपल्या मुक्त विश्वात संचार करण्यासाठी, एकमेकांना हक्काचा आणि आयुष्याचा खरा जोडीदार मिळतो…. आणि असे वागलो तरच त्या ऋणानुबंधाच्या धाग्यांना अर्थ उरतो. नाही तर त्याची बंधन व्हायला वेळ लागत नाही….

नंतर ही बंधने नकोशी वाटायला लागतात. टचके-टोमणे सुरु होतात. हेवा-दावा, द्वेष निर्माण होतो. पश्चाताप वाटायला लागतो. लुटूपुटूच्या वादाचे रूपांतर कलहात होते. कलहाने वितुष्ट निर्माण होते. यानंतर भांडण पेटते. आणि मग पती-पत्नीचे टोकाला गेलेले भांडण कुणालाच सोडवता येत नाही. यामुळे वेळीच स्वतःला आवरा, सावरा. कारण गेलेली कोणतीच वेळ परत येत नाही. आयुष्य खूप सुंदर आहे. ते सुखाने जगायला शिका…

✒️लेखक:-मयूर मधुकरराव जोशी(ग्रीन पार्क, जिंतूर. जिल्हा परभणी)मो:-9767733560,7972344128