घरकुल योजनेचा चौथा हफ्ता मिळण्यासाठी प्रयत्न सुरू

26

🔸नगराध्यक्षा सुरेखा जिठ्ठावार यांची माहिती

✒️अशोक हाके(बिलोली,तालुका प्रतिनिधी)मो:/9970631332

कुंडलवाडी(दि.21नोव्हेंबर):-नगरपरिषदेतर्फे पंतप्रधान घरकुल योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या घरांचे बांधकाम सुरू आहेत. व काही बांधकाम पुर्णही झालेत.या योजनेतील लाभार्थ्यांना तीन हफ्ते आतापर्यंत देण्यात आले आहेत. पण योजनेतील केंद्र शासनाचा हफ्ता नगरपरिषदेस मिळाला नसल्यामुळे तो निधी लवकरात लवकर मिळवुन लाभार्थ्यांना योजनेचा चौथा हफ्ता देण्यासाठी सत्ताधारी महाविकास आघाडीचे प्रयत्न सुरू आहेत. अशी माहिती नगराध्यक्षा सुरेखा जिठ्ठावार यांनी दिली.

कुंडलवाडी नगरपरिषदेअंतर्गत पंतप्रधान घरकुल शहरी योजनेअंतर्गत १३०४ घरकुलांना मंजुरी मिळाली.प्रत्येक लाभार्थ्यांना या योजनेत घर बांधण्यासाठी २ लाख ५० हजार रूपये अनुदान दिले जाते.यात केंद्र शासनाचे १ लाख ५० रूपये व राज्य शासनाचे १ लाख रूपये असे दोन्ही मिळुन अडीच लाख इतके अनुदान आहे.घर बांधण्यासाठी या योजनेतील ३५७ लाभार्थ्यांना नगरपरिषदेने बांधकाम परवानगी दिली आहे.यातील २०८ घरकुल बांधकाम पुर्ण झाले आहेत. तर १४९ घरकुल बांधकाम प्रगतीपथावर आहेत.

योजनेच्या सुरूवातीपासुनच योजनेतील केंद्र सरकारचा निधी प्राप्त झाला नाही.आतापर्यंत लाभार्थ्यांना पहिला हफ्ता ४० हजार रुपये, दुसरा हफ्ता ४० हजार रुपये व तिसरा हफ्ता १ लाख २० हजार रुपये असे योजनेतील २ लाख रूपये लाभार्थ्यांना वितरीत करण्यात आले आहेत. लाभार्थ्यांना योजनेतील चौथा हफ्ता अद्याप न मिळाल्यामुळे लाभार्थी संभ्रमावस्थेत आहेत.याबाबत लाभार्थ्यांचा संभ्रम दुर करण्यासाठी नगराध्यक्षा सुरेखा जिठ्ठावार यांना संपर्क साधला असता ते म्हणाले,पंतप्रधान घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना आजपर्यंत तीन हफ्ते देण्यात आले आहेत. चौथा हफ्ता हा केंद्र शासनाच्या निधीतून द्यावयाचा आहे.

पण केंद्र शासनाकडून नगरपरिषदेस अद्याप निधी प्राप्त झाला नाही. हा निधी मिळविण्यासाठी सत्ताधारी महाविकास आघाडी प्रयत्नशील असुन लवकरात लवकर निधी मिळविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याची माहितीही नगराध्यक्षा सुरेखा जिठ्ठावार यांनी दिली.

याबाबत मुख्याधिकारी जी.एस.पेंटे यांना विचारणा केली असता ते म्हणाले,पंतप्रधान घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना तीन हफ्ते दिले आहेत. चौथा हफ्ता हा केंद्र शासनाच्या निधीतून द्यायचा आहे. तो निधी अद्याप नगरपरिषदेस प्राप्त झाला नाही. त्यामुळे चौथा हफ्ता लाभार्थ्यांना देण्यात आला नसल्याची प्रतिक्रिया मुख्याधिकारी जी.एस.पेंटे यांनी दिली.