पदवीधरांची घोर फसवणूक ; निवडणूक आली तरच पदवीधर मतदार आठवतात – पूजा उदगट्टे

35

✒️कोल्हापूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

कोल्हापुर(दि.24नोव्हेंबर):- पश्चिम महाराष्ट्र सह राज्यातील पदवीधर मतदारसंघ निवडणुकांतील प्रश्न व आश्वासने आजपर्यंत जवळून पाहिले आहेत, सरकारने पदवीधर मतदारसंघ का व कशासाठी तयार केले ? याचा कुठेही ताळमेळ लागतोय का? आमच्यासाठी आजपर्यंत कुठल्या कल्याणकारी योजना राबविल्या? आमचे असंख्य प्रश्न अनुत्तरितच आहेत ? त्यापैकी किती सोडवले ? असा सवाल रयत शेतकरी संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा सौ.पूजा उदगट्टे यांनी केला आहे.
पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर पूजा उदगट्टे यांनी ‘ प्रसार माध्यमांशी’ बोलताना रयत शेतकरी संघटनेची भूमिका स्पष्ट केली.

याप्रसंगी त्यांनी पुढे म्हटले की : राज्यातील पदवीधर व विविध कंत्राटी पद्धतीने कामावर रुजू असणारे व तोकड्या मानधनात प्रचंड मेहनतीने काम करत असताना पदवीधरांची मात्र घोर फसवणूक केली जात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. राज्यातील पदवीधर वेळोवेळी रयत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अॅड. रवीप्रकाश उर्फ बापूसाहेब देशमुख व प्रदेश सरचिटणीस सुनील ठोसर पाटील आणि हजारो पदाधिकार्यांच्या संपर्कात राहून त्यांचे प्रश्न मांडत आलेले आहेत. पदवीधरांचे प्रश्न खूप गंभीर आहेत.

आजपर्यंत पदवीधरांच्या प्रश्नावर पदवीधरांना हक्काचा असा एकही लोकप्रतिनिधी मिळाल्याचे समाधान नाही . केवळ निवडणूक स्टंट, खोटे आमिषे, नुसत्या घोषणा, नेता,पक्ष, संघटना यांच्या बळावर निवडणुका पार पाडल्या जात आहेत. निवडणुका तोंडावर आल्या की पदवीधर बंधू-भगिनींना समाजातील,पक्षातील, नाते,पाहुणे, मित्र परिवार यांच्या जोरावर निवडणूक जिंकल्या जाते. पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत उमेदवारांपैकी राज्यात योग्य ते उमेदवार निवडून आणण्यासाठी रयत शेतकरी संघटनेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपणारा प्रतिनिधी निवडून आणण्यासाठी कोणत्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा याबाबत संघटना लवकरच भूमिका स्पष्ट करणार आहे, असे पूजा उदगट्टे यांनी म्हटले.

पदवीधर मतदारांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न होताना दिसून येत नाही . पदवीधरांनी सावध रहावे . सध्या कोरोना विषाणूंचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत असल्यामुळे आपली व कुटुंबाची, मित्र परिवाराची काळजी घेणे आवश्यक आहे . आमदारकीच्या कार्यकाळात आपण काय करू शकलो ? याचा हिशोब मागण्याचा हक्क पदवीधरांचा असून रयत शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आजपर्यंत युवक, विद्यार्थी,युवती, विविध विभागातील कंत्राटी कामगारांना मदत होईल यासाठी संघटनेचे सर्व पदाधिकारी कायम सहकार्य करणार आहेत.

कुठल्याही विषयावर कोणत्या आमदार साहेबांनी गतवेळेच्या निवडणुकीत दिलेले वचन पाळले ते सर्वप्रथम जाहीर करावे, त्यांचा रयत शेतकरी संघटनेच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात येईल . राज्यातील पदवीधरांचा फक्त राजकीय झोळी भरण्यासाठी वापर केला जात आहे, असे स्पष्ट मत सौ. पूजा उदगट्टे यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी शेवटी बोलताना मांडले.