शिक्षक व पदवीधर निवडणुकीच्या उमेदवाराचा प्रचार करण्याची गरज आहे का ?

30

              ▪️विचार प्रवाह▪️

सध्या महाराष्ट्रात शिक्षक व पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकांची रणधुमाळी (?) सुरु आहे किंवा रणधुमाळीचे चित्र उभे केल्या जात आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीपेक्षा शिक्षक व पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकांची पद्धत वेगळी असते. यातील मतदार हा बुद्धिजीवी वर्गातील असल्याचे बोलल्या जाते.

या दोन्ही मतदार संघात निवडणुक लढणा-या उमेदवारांकडून शैक्षणिक, सामाजिक व अन्य रचनात्मक कामाची अपेक्षा असते. महाराष्ट्रात आजपर्यंत या मतदार संघातून निवडून गेलेल्या प्रतिनिधीनी उद्देशाप्रत काम केले की नाही याचे उत्तर सर्वांकडे आहे. सध्या शिक्षक व पदवीधर मतदार संघातील निवडणुकीचा प्रचार जोमात असल्याचे चित्र उभे केले जात आहे.

वास्तविक या मतदार संघातील मतदार यांना कोणता उमेदवार योग्य आहे ? हे ओळखण्याची क्षमता (समज) असताना एवढा मोढ्या प्रमाणात गाजावाजा करीत प्रचार का करावा लागतो हे न उलगडणारे कोडेच आहेत. या निवडणुकीत प्रचार करणारे काही व्यक्ती/प्रतिनिधी हे मतदान करण्यास पात्र नाहीत. अपात्र व्यक्ती पात्र व्यक्तीला समजविण्याचा प्रकार म्हणजे विजेच्या प्रकाशात केरोसीनचा दिवा लावण्याचा प्रकार असल्याचे बोलल्या जात आहे. (केरोसीन महाग असून सध्या मिळत नाही, या विषयावर कधीतरी स्वतंत्र लेखन करता येईल)

शिक्षक व पदवीधर मतदार हा सुज्ञ वर्गातील असल्याचे समजल्या जाते. लोकसभा व विधानसभा निवडणुकीतील मतदार संख्येच्या तुलनेने या मतदार संघात संख्या कमी असते. त्यांचेकरिता निवडणुक आयोगाने सर्व उमेदवाराची माहिती ओळख असणारी माहिती उपलब्ध करून दिल्यास त्यातील योग्य (लायक) पर्याय निवडण्यास शिक्षक व पदवीधर पात्र असतील यात शंका नसावी. मात्र गेल्या अनेक निवडणुकांचा अभ्यास केल्यास त्यात राजकीय लुडबूड सुरूच असल्याचे दिसत असते.

लोकशाही पद्धतीचा चांगल्याप्रकारे अभ्यास असणा-या शिक्षक व पदवीधर मतदारांना उमेदवारांची ओळख (परिचय) सांगणारे व्यक्ती बघून बुद्धिजीवी वर्ग मनातल्या मनात हसून लुडबूड करण्या-या राजकीय पुढा-यांची टिंगलटवाळीयुक्त चर्चा करताना दिसत आहेत. (ओळख ही स्वतः निर्माण करायची असते तर परिचय हा दुस-यानी करून द्यायचा असतो, असा एक विचार प्रवाह आहे, या विषयावर सुद्धा कधीतरी स्वतंत्र लेखन करता येईल.)

खरच आज या दोन्ही मतदारांना प्रचाराची गरज असेल तर दुसरा प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे आम्ही लोकशाहीचा प्रचार व प्रसार करण्यास अपयशी ठरलो आहोत का? जर या प्रश्नाचे उत्तर सकारात्मक असेल तर स्वतंत्र आत्मचिंतन करण्याची वेळ आपल्यावर आली आहे, हे समजावे लागेल.

तसेही शालेय अभ्यासक्रमात “नागरीकशास्त्र” हा स्वतंत्र विषय असण्याची आवश्यकता असताना त्याला इतिहास विषयाला जोडल्या गेले आणि विद्यार्थी सुद्धा “नागरीकशास्त्र” चा तास म्हणजे “टाईमपास” समजून दुर्लक्ष करताना दिसतात. त्यामुळे लोकशाहीचा “टाईमपास” म्हणून उपयोग होतो का? असा प्रश्न उभा ठाकला आहे.

शिक्षक व पदवीधर निवडणुकीत कुठल्याही राजकीय पक्षाचे चिन्ह नसते. मात्र पडद्या आडून उमेदवाराला अप्रत्यक्षरित्या पक्षाचे नाव जोडल्या गेले असते. हा प्रकार मतदारासाठी धोकादायक आहे. स्वतंत्र विचारसरणी नसणारे व राजकीय पक्षाची हुजरेगिरी करणारे लोकप्रतिनिधी (व्यक्ती) सबंधित मतदारांना न्याय देतील काय ? असा एक विचारप्रवाह सुरु आहे.

असो… या निमित्याने राजकीय पक्षाच्या पुढा-यासह बुद्धिजीवी समजल्या जाणा-या मतदारांना “नागरीकशास्त्र” या विषयाचे शिकवणी वर्ग लावण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

✒️सुरेश डांगे(संपादक पुरोगामी संदेश न्युज पेपर / ई-पेपर / वेब पोर्टल )मो:-८६०५५९२८३०

email. purogamisandesh@gmail.com