मानवी तर्कनिष्ट प्रज्ञेचा सौंदर्याविष्कार – बुध्दिवादी सौंदर्यशास्त्र

43

✒️लेखक:-संदीप गायकवाड(नागपूर)

मो:-९६३७३५७४००

यशवंत मनोहरांचा ‘बुध्दिवादी सौंदर्यशास्त्र’ हा ग्रंथ उच्चतम विज्ञाननिष्ट विजांचा प्रकाशमान पुंज असून जडवादी तत्वज्ञानाचा परिपाक आहे.जीवनाच्या भव्यतेतील विजिगिषवृत्तीचा सत्यपाठ असून असत्याला बेचिराक करणारा मानवीय बुध्दिचा विलक्षणीय सौंदर्यानुभव आहे.नवे साहित्यशास्त्र या ग्रंथानंतर वैचारिक तत्वज्ञानाची मांडणी करणारा ‘बुध्दिवादी सौंदर्यशास्त्र’हा “सब्बे सत्ता सुखी होन्तु” ची ऊर्जावान पेरणी करत अत्त-दीप-भवः चा मूल्यजागर आहे.हा ग्रंथ बौध्द सौंदर्यशास्त्र व आंबेडकरवादी सौंदर्यशास्त्र यांचा समन्वय रेखांखित करते.

हा ग्रंथ एकुण सहा प्रकरणात विभागला आहे.या प्रकरणातून लेखकांने भिन्न भिन्न शैलीचा प्रयोगशीलतेतून सौंदर्यशास्त्राचे बुध्दिवादी तत्वज्ञान विशद केले आहे.सौंदर्य मानवी जीवनाला नवे भावस्पर्श निर्माण करते . सौंदर्याचा संबंध मानवीय संवेदशीलता , परिर्वतन,क्रांती, नवनिर्मिती ,सृजनत्व , विद्रोहकता या समुच्च पातळीवर वाचकाला घेऊन जातो.वाचकाला सदोदीत वाचनमग्न ठेवणारा हा ग्रंथ भाषेच्या शक्तीने संपन्न बनला आहे.लेखकांनी आपल्या अनुभवक्रियेतून,तत्वनिष्टतेतून , बुध्दिप्रामाण्यवादातून , असत्याला सारून सत्यतेची उभारणी केली आहे.ह्या ग्रंथाने महात्मा जोतीराव फुले यांच्या अखंडाचे सुवर्णसिंचन केले आहे.त्यामुळे या ग्रंथाला भव्यता प्राप्त झाली आहे.

लेखक ‘सौंदर्य आणि सौंदर्यशास्त्र’ या प्रकरणात लिहितात की,समता ,बंधुता,सामाजिक न्याय,या महान जीवनमूल्यांचा आणि सौंदर्याचा कोणत्या प्रकारचा संबंध असतो ! निकष कोणते ! अनुभवाचे स्वरूप काय? यामध्ये जे सौंदर्याचे तत्वज्ञान मांडले असते त्या शास्त्राला सौंदर्यशास्त्र असे म्हणतात.जीवनामध्ये मूल्यसापेक्ष आणि मूल्यद्रोह असतो,यांचे सातत्याने भांडण होत असतात.पहिली मूल्यव्यवस्था ही मूलभूत,वास्तव आणि मानवीय संबंधी असते तर दुसरी मूल्यद्रोही जाणीव विशेषीकरणाच्या प्रवृत्तीतून आणि विवक्षित समूहातून वर्चस्वाच्या तृष्णेतून जन्माला येते . त्यामुळे आपण कोणते मूल्य स्वीकारावे ,कोणते तत्वज्ञान आत्मसाद करावे याबद्दल विवेचन करताना जे तत्वज्ञान मानवाला माणूस मानतो तेच तत्वज्ञान खरे सौंदर्यवादी आहे.जे तत्वज्ञान मानवाला असत्याकडे , अंधाराकडे , अज्ञानाकडे ,चित्तविलासाकडे,शोषणाकडे घेऊन जाणारे असते ते अवास्तव सौंदर्य असते त्याच्या विज्ञानाशी काही संबंध येत नाही. मूल्यजाणीवाविषयी लेखक म्हणतात की,”माझी संवेदशीलता आणि मूल्यभिरूची बुध्दिवादी आणि सासंस्कृतिक तोल या मूल्यव्यवस्थेत घडली असल्याने मला याच मूल्यजाणीवेचे सौंदर्यशास्त्र अभिप्रेत असने अपरिहार्य आहे.” (पा. न. ०८)असे सत्यमन व्यक्त केले आहे.

सौंदर्य ही संकल्पना अविरत व विकसनशील हवी.नदीच्या प्रवाहासारखी खळखळणारी असावी.सममूल्य सासंस्कृतिक बरोबरी करून माणसाच्या सासंस्कृतिक व्यवहाराचे विश्व प्रगट करणारी असावी.आशयबंधाच्या रूपाने ती समन्वय साधणारी असावी .आशय आणि बंध यांचा एकजीव अस्तित्वाचा गुणसमुच्चय म्हणजे सौंदर्य ही व्याख्या लेखकांने केली आहे.सौंदर्याचा गैरवापर केला तर त्याची किंमत देशाला आणि जगाला चुकवावी लागते म्हणून सौंदर्य ही कालिक ,प्रादेशिक ,जातीतील,वर्ग,धर्म अशा दुनियेतील सर्वच अतीत अशी प्रज्ञानी नैतिकता आहे.नैतिकतेमध्ये सौंदर्य असते अनैतिकतेमध्ये सौंदर्याचा लोप पावतो म्हणून सौंदर्यवृती विषयी भाष्य करताना लेखक म्हणतात की,” साहित्यीकांना सौंदर्याच्या उजेडात जीवनातील ब-या वाईटाचे अवलोकन करावे.चांगलेही अधोरेखित करावे.वाईटही अधोरेखित करावे आणि त्यातून मूळ सौंदर्याचे स्वप्न फुलवावे.”(पा.न.१३)
सौंदर्य व सौंदर्यशास्त्र मानवीय जीवनाला नवा आमूलाग्र बदल देणारा प्रवाह असून नव्या मूल्यनिरपेक्ष मानवाच्या समाजनिर्मितीसाठी ख-या सौंदर्याची व सौंदर्यशास्त्रची गरज आहे.तेव्हाच ‘सब्बे सत्ता सुखी होन्तु’. ही विश्वबंधुत्वाची पताका विश्वामध्ये सतत फडकत राहील असे वाटते.

“बुध्दिवादी सौंदर्यशास्त्र’ या प्रकरणात लेखकांने विविध विचारवंताच्या संदर्भातून बुध्दिवादी सौंदर्यशास्त्राचे महत्व विशद केले आहे.लेखकांनी चार्वाकाचे आणि बुध्दाचे तत्वज्ञान बुध्दिवादी आहे ही मांडणी केली आहे.चार्वाकाचा तर्कनुमान आणि बुध्दाचा प्रतीत्यसमूत्पाद हा कार्यकारणभावाच्या तत्वज्ञानातूनच बुध्दिवादी सौंदर्यशास्त्र मोहरून आले आहे.ते म्हणतात की,’सौंदर्यशास्त्राची सम्यक मांडणी करता येण्यासाठी आधी सुसंगत आणि अर्थातच तर्कप्रमादरहित तत्वज्ञान संबंधित व्यक्तीजवळ हवे आणि विश्वचैतन्यवादी तत्वज्ञाने तर्काधिष्ठीत सुसंगत नसल्याने ते तत्वज्ञान म्हणून उभे राहू शकत नाही.’हा मूल्यसापेक्ष कार्यकारणभावाचा सिध्दांत मांडला आहे.ते पुढे म्हणतात की,’एका हातात मनुस्मृती आणि दुस-या हातात संविधान असा भयानक अंतर्विरोध आपल्याला शक्य होणार नाही.’ म्हणजेच साहित्यिकांनी आपल्या कलाकृतीतून सत्य जाणीवाचा अनुबंध मांडावा . संविधानात्मक विचारगर्भातून माणसाची निर्मिती करावी .जीवनवादी तत्वज्ञानातून मानवमुक्तीचा नवा समाज निर्माण होऊ शकतो.

कलात्मकता आणि आध्यात्मीकता हे माणसाला विकासापासून परावृत्त करून श्रध्दा आणि आभास यामध्ये गुंतवून ठेवतात म्हणून आपण लवकर बाहेर पडावे असा समयसुचक संदेश देतात.ते म्हणतात की,’साहित्य हे कलेच्या सौंदर्याचे तत्वज्ञान म्हणजे साहित्याचे सौंदर्यशास्त्र आणि जडवादी तत्वज्ञानाच्या पायावर उभारलेले सौंदर्यशास्त्र हे बुध्दिवादी सौंदर्यशास्त्र होय'( पा. न .२८)अशी सेंद्रियतत्वाची आदर्शमूलक मांडणी करतात . लेखकांने मर्ढेकर,कांट व क्रोचे यांची सौंदर्यशास्त्रावरील विचारसरणीला छेद देऊन बुध्द् आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्वचिंतनातून स्फुरलेल्या सौंदर्याचा स्वीकार केला आहे.

‘साहित्याची सासंस्कृतिक फलश्रुती’ या लेखात ते म्हणतात की,’साहित्य हे संवेदशीलतेच्या भूमिकेवर अवलंबून असते.जे साहित्य मानव जीवनाला जगण्याचा उन्नत मार्ग देतो तेचं साहित्य कसदार ,खरे व उत्तम असते.साहित्याचा अर्थ वा आशय विचारात न घेणा-या व्यक्तीला साहित्यासंबंधी बोलण्याचा अधिकाराच उरत नाही.’साहित्यातून नवी सम्यक संस्कृती उदयास यायला हवी .साहित्य हे परिर्वतनाचे वैज्ञानिक पंख लावून विश्व कल्याणाची जाणीव असणारे हवे.सत्य ,इष्ट आणि सौंदर्य ह्या कल्पना खोट्या आशयाने भरल़्या आहेत . त्यामुळे समाजात आमूलाग्र इष्ट परिर्वतन घडवून आणू शकल्या नाही.करंदीकराचा कलावाद सौंदर्य हा मुद्दा लेखक खोडून काढतात.सौंदर्य हा मानवी जीवनाला असुंदराला कलावंताने दिलेला विधायक पर्याय आहे.माणूसकिचा निकष म्हणजे सौंदर्याचा निकषच होय.सुसंस्कृतता म्हणजे जीवनातील प्रकाशमूल्याची मुस ! माणसाला उज्ज्वल करण्यासाठी सत्य,इष्ट आणि सौंदर्य या संकल्पनामधील विघातक आशय जाळत जाणारा आणि विधायक आशयाची परस्परोपकारक प्रस्थापना करणारा सृजनोत्सव म्हणजे संस्कृती;विशुध्द माणूस निर्माण करणे म्हणजे सौंदर्य.

“सौंदर्य हे महान जीवनमूल्य आहे.समता ,बंधुता , सामाजिक न्याय,बुध्दिवाद आणि इहवाद या गोष्टीचा सेंद्रिय मेळावा म्हणजे सौंदर्य.!”अशा गर्भजाणीवाचा उत्कट आकृतीबंध निर्माण केला आहे.फँसिस्टवृत्तीवर तुटून पडून प्रतिक्रांती विषमतेवर अमाणुषतेवर प्रहार करून नवे सौंदर्यशास्त्र मांडण्याचा प्रयत्न वाखण्याजोगा आहे.व्यक्तीत्वाला समजुतदारपणा ,करूणामय,अस्वस्थ,अंतर्मुख,सुविचारशील करणे आणि अधिकच गहन मानवत्वाशी जोडणे हीच साहित्याची सांस्कृतिक फलश्रुती आहे .हे मूलगामी संशोधन मांडून आंबेडकरवादी साहित्यातील प्रांताला समृध्द करण्याचे काम या ग्रंथाने केले आहे.जागतिक साहित्याच्या क्षेत्रामध्ये सौंदर्यवादी अनेक ग्रंथ असून त्यामधून आभासी जीवनाचे तत्वज्ञान मांडले आहेत,पण मनोहराच्या या ग्रंथाने मानवीय सौंदर्याचा अचूक वेध घेतला आहे म्हणून हा ग्रंथ नव साहित्याला संविधानसूर्य वाटतो.

‘परिवर्तनवादी जीवनमूल्ये आणि वाड्ःमयीन मूल्ये ‘या प्रकरणात लेखक म्हणतात की , परिवर्तनाला माणूसकीच्या आणि साहित्यातील महत्तेची तेजःपुंज कार्यशाळा मानतात.पर्यावरणात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणले पाहिजे हा नैसर्गिक केंद्रजाणीवांचा आराखडा मांडतात.जीवन हे संघर्षातील बदलाचे सुंदर निब्बान असून,जीवन या शब्दाचा मुख्यार्थ,लक्ष्यार्थ आणि व्यंग्यार्थही परिवर्तित हाच ठरवला आहे.(पा.न.४३) स्वतःच्या अस्तित्वासाठी माणूस अविरत धडपडत असतो.मानव हाच समाजव्यवस्थेचा मुळ आदर्श आहे हे मत मानवेद्रनाथ रॉय मान्य करतात परिवर्तनाला ऊर्जेची नितांत गरज आहे.याविषयी मत व्यक्त करताना ते म्हणतात,’ऊर्जा ही नवनवोन्मेषशालीन असते ; ऊर्जाविहीनता म्हणजे कलेवरयुक्तता होय’.(पा.न.४४)
जीवनवादी तत्वज्ञानामध्ये मानसाच्या बदलाला विज्ञानवादाची गरज आहे.अवैज्ञानिक सर्व साहित्याला लेखक नकारून बुध्दिवादी सौंदर्यासाठी समानतेचा , बंधुभावाचा,मानवतेचा पुरस्कार करतात.

त्यासाठी हेमिग्वे,केशवसुत,कुसूमाग्रज,मुक्तीबोध यांचे परिवर्तनवादी विचार प्रगट करतात . साहित्यामध्ये सेंद्रिय नकाशा परिर्वतनवाद्यांच्या डोक्यात आणि नजरेत असावा लागतो . तेव्हाच आचार-विचाराचा मौलिक बदल घडून येऊ शकतो.अनादी काळापासून एक साहित्यप्रवाह माणसाला सत्यनिष्ठतेपासून परावृत्त करून असत्याची सातत्याने बाजू मांडून अमानविय,ईश्वरीय विचाराची भूमिका मांडत असल्याने खरा मानव निर्माण होत नाही.म्हणून बुध्दाचे सौंदर्यवादी मानवतावाद हाच बुध्दिवादी विचाराचा पाईक असायला हवा.भारतातील चार्वाकाचे तत्वज्ञान परिवर्तनाचा कैवार घेऊन उभा राहले आहे तसेच कणाद,कपिल यांनी सुध्दा परिवर्तनवादी विचाराला काहीप्रमाणात पांठीबा दिला.परंतु काही विचार प्रणाली वेदांच्या प्रमाणबध्दता स्वीकारणारी आहे.

ही प्रणाली विज्ञानाचा कार्यकारणभावाला विरोध करून घडणारी घटना ही अदभूत अशा ईश्वरामुळे घडते ही अवैज्ञानिक भूमिका स्वीकारल्यामुळे हे जीवनमूल्ये आणि वाड्ःमयीन मूल्यांचे परिवर्तन अस्वीकार करतात म्हणून रिचर्डसने सौंदर्य मूल्य व जीवनमूल्य हेच साहित्याचे प्रयोजन असावे असे मत व्यक्त करताना म्हणतो,”Emotions are primarily signs of attitudes & own their great prominence in the memory of art to this.For it is the attitudes evoked which are the all important part of any experience.Upon the texture and from of the intensity of the conscious experience,its thrill ,its pleasure or its poignancy which gives it value,but the organisation of its impulses for freedom and fullness of life… The aftereffects,the permanent modification in the structure of the mind,which works of art can produce,have been overlooked.No one is ever quite the same again after any experience;his possibilities have altered in some degree.And among all the agents by which the widening of the sphere of human sensibility may be brought about,the arts are the most powerful…” (नवे साहित्य शास्त्र-पा.न.६८) ही मूल्ये साहित्यिकांनी स्वीकारायला हवी तरच मूल्यगर्भ समाजाची,देशाची विश्वाची निर्मिती होऊ शकेल.

या प्रकरणात अनेक विचारवंताच्या सिध्दांताना नकार दिला असून जे विचार अपरिर्वतनिय असतात ते विचार बुध्दिवादी सौंदर्यशास्त्रत समाविष्ट होऊ शकत नाही.बुध्द धम्माचे व आंबेडकरी विचाराचे तत्वज्ञान जगाला नवे मूल्यगर्भ ऊर्जास्वल देत आहेत ,मानवातील सामाजिकरणाला हेच तत्वज्ञान यशस्वी ठरू शकते . जीवनमूल्ये व वाड्ःमयीनमूल्ये यातील अभेद्दता समजावतांनी लेखकांने लंगडा आणि आंधळा यांची गोष्ट सोदाहरण समजावून सांगितली आहे.दोन अपुर्णांकातून एक सर्जनशील पूर्णांक साकार कसा होतो हे स्पष्ट केले आहे.अनेक साहित्यिकांच्या सौंदर्यवादी भूमिकेची चिरफाड केली असून चैतन्यविलास प्रवृती ही समाजाला कशी मारक आहे ती सौंदर्यासोबत राहू शकत नाही.ते म्हणतात,”सौंदर्यशास्त्रातील भांडण मुळातले तत्वज्ञानातले आहे आणि तत्वज्ञानात सुरू असलेले भांडण मुळात प्रत्यक्ष जीवनातलेच आहे म्हणून परिवर्तनवाद्दांचे सौंदर्यशास्त्र’सब्बे सत्ता सुखी होन्तु’या जडवादी- भौतिकवादी तत्वज्ञानावरच असावे.”(पा.न.८१) असे ते प्रतिपादित करतात.

मूल्यशास्त्र आणि सौंदर्य या प्रकरणात मूल्यामधील सौंदर्याचे नेमके कोणते स्थान आहे याचे विवेचन केले आहे.’ सकलाचे सकलहित अचूकपणे मोजून देणारी प्रमाणबध्दता म्हणजे मूल्य!अशी व्याख्या केली आहे.मानवी जीवनाची प्रकृती आणि मानवी मन याचा अन्योन्य संबंध असून नकारातूनच नव्या क्षितीजाचा उदय होतो व विकासाचा मार्ग सचतो .विषमता पेरणा-या साहित्यप्रकाराला समतेच्या सज्जनत्वतेच्या संघर्षातून म्हणजेच विद्रोहातून परिवर्तनमूल्य देऊ शकतो.म्हणूनबुध्दाचा विद्रोह हा मानवाचा सब्बं अनिच्चंसाठी उपयोगाचा आहे. काही मूल्ये हे वर्गनिष्ठ असतात ते स्वतःचा उदोउदो करून इतर समाजघटकाला कमी लेखतात .ही मूल्ये आज उफाळून आली आहे.संविधानिक व्यवस्थेला समाप्त करून वैदिक विचारसरणीची मनुव्यवस्था निर्माण करण्याच्या मार्गावर असल्याने हे मूल्ये देशाला घातक आहेत.

त्यासाठी सर्वांनी परिवर्तनवादी मूल्यांचा स्वीकार करावा असे लेखकाने मत व्यक्त केले आहे.बुध्दाच्या नीतीतत्वाच्या विचारप्रक्रियेतून समतेचं नवीन नंदनवन निर्माण करता येते . बुध्द् हा जगातील महान दार्शनिक तत्वज्ञानी असून मानवीय समाजाला मूल्यनिष्ठ बनविण्यासाठी ज्ञानाचा मार्ग निवडतो . लेखक म्हणतात की,सौंदर्यशास्त्र बुध्दिवादी असणे अपरिहार्य आहे ते सम्यक माणुसकीचे सौंदर्यशास्त्र असने अपरिहार्य आहे.कारण “हे सौंदर्यशास्त्र बौध्द सौंदर्यशास्त्र आहे आणि हे आंबेडकरवादी सौंदर्यशास्त्र आहे.हे सौंदर्यशास्त्र संपुर्ण शोषणयंत्रणा उद्धवस्त करुन शकते आणि क्रांतीकारक माणूस जीवनाचे सतत पुनर्निर्माण करणारा माणूस जन्माला घालू शकते.हेच सौंदर्यशास्त्र सब्बे सत्ता सुखी होन्तु’ समाज घडविणारे सैनिक निर्माण करू शकते.”(पा.न.११२)

‘बालसाहित्याची सौंदर्यशक्ती ‘ या लेखात ते म्हणतात,बालसाहित्यातून विद्यार्थांला नवे विज्ञानवादी विचार वाचायला मिळायला हवे . सातत्याने अमानवीय,खोट्या,स्वप्नवत अशाप्रकारच्या साहित्यातून आभासी जीवनाचे दिवास्वप्न मुले पाहतात म्हणून बालकाचे साहित्य हे नव्या परिवर्तनवादी विचाराबरोबर विज्ञानाचे कंगोरे असणारे असावे.प्रज्ञावान माणूसकीची काव्यपोर्णिमा निर्माण करणारे असावे .जडणघडणीला प्रतीत्यसमूत्पादचा संदर्भ असणारे साहित्य ख-या भारताची निर्मिती करण्यास उपायोगी ठरतील.

पण आज सा-या शिक्षण क्षेत्रात प्राचिन आणि अवास्तव असत्यांचा मसाला भरलेल्या साहित्यामुळे विद्यार्थांला ख-या ज्ञानाचा बोध होत नाही.प्रज्ञा आणि प्रतिभाचा परिपाक झालेला विद्यार्थी आपल्याला पाहायला मिळत नाही,म्हणून लेखकाला चिंता आहे. भारताचे आधुनिक भविष्य टिकवायचे असेल तर,”विज्ञानाच्या तत्वज्ञानाच्या साहित्याचा आणि समाजक्रांतीचा नवलपुर्ण गोष्टीचा खजिना द्यायला हवा.माहिती तंत्रज्ञानाचा ,महासंगणकाचा ,इटरनेटचा आणि दुरदर्शनच्या युगाला पुढल्या काळात विकासाच्या आणखी नव्या फांद्या फुटने अपरिहार्य आहे तरच विद्यार्थी हा मानवी प्रतिष्ठेला जे मारक आहे ते जाळून टाकून करुणेचे चांदणे ,मैत्रीचा सुगंध फुलालरत राहतील.बालसाहित्यातून उदबोधनाची , सौंदर्यप्रकाशनाची सौंदर्यशक्ती असायला हवी.

आज जगाला कोरोना विषाणूच्या महामारीने ग्रस्त केले असून नव्या जगाच्या उत्थांनासाठी बुध्द् हा एकमेव पर्याय जगासमोर आहे.अल्बर्ट आइन्स्टाइन बु्ध्दिज्जम विषयी म्हणतो की,”Buddhism has the characteristics of what would be expected in a cosmic religion for the future:It transcend a personal God,avoids dogmas and theology ;it covers both the natural and spiritual ; and it is based on a religious sense aspiring from the experience of all things,natural and spiritual,as a meaningful unity .If there is any religion that would cope with modern scientific needs it would be Buddhism.”(भविष्य का वैैज्ञानिक धम्म -पा.न.१४१)या विचारशीलतेचा लेखकांने ध्यास धरला असून बुध्द् तत्वज्ञानाची प्रच्युती प्रत्येक पानापानात सामावलेली आहे हे लक्षात येते.

मनोहराच्या सौंदर्यशास्त्राच्या प्रगल्भ जाणीवेतून ‘बुध्दिवादी सौंदर्यशास्त्र’हा ग्रंथ निर्माण झाला असून निरंतर चिंतनाच्या मर्मलेखनितून साकारलेला हा ग्रंथ मानवीय मनाचे , आंदोलनाचे आयामाचे सौंदर्य प्रतिबिंबित करते . बुध्द् तत्वज्ञानातील सकल कल्याणाची पौर्णिमेचे चांदणे प्रकाशित करीत आहे.वाचकाला अंर्तमुख करणारा हा सुरेख ग्रंथ असून मानवीय तर्कनिष्ट प्रज्ञेचा सौंदर्याविष्कार घडविणारा दिशादर्शक महान ग्रंथ आहे.
करीता लेखकाला पुढील सौंदर्यवादी सृजनतत्वतेला लेखनासाठी लाख लाख मंगलकामना चिंतितो!