शेतीसाठी दिवसा बारा तास वीज द्या

28

🔸पुजा उदगट्टे (रयत शेतकरी संघटना प. महाराष्ट्र अध्यक्षा) यांची मागणी

✒️पुणे(पुरोगामी संदेश नेटवर्क)

पुणे(दि.1डिसेंबर):-शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा बारा तास वीजपुरवठा करावा, आजवरचे कृषीपंपासाठी देण्यात आलेले अवास्तव देयक शासनानेच निरंक करून शेतकंऱ्यांना सोलार कृषीपंप योजनेचा लाभ द्यावा, या मागणीसाठी शेतकऱ्यांसाठी लढा देत असलेली रयत शेतकरी संघटना मैदानात उतरली आहे.

रयत शेतकरी संघटनेने ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना पुणेच्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन पाठविले. त्यात म्हटले आहे, की शेतीसाठी विद्युत पुरवठा हा सकाळी सहा ते सायंकाळी सात वाजेपर्यंत बारा तास अखंड व योग्य त्या दाबाने, नियमित मिळावा. सद्यस्थितीत शेतीसाठी विद्युत वितरण कंपनीकडून एक आठवडा रात्रपाळी व दुसरा आठवडा दिवसा आठ तास वीज दिली जाते.

रात्री शेतीला पाणी देताना जंगली जनावरांचा धोका वाढला आहे. औरंगाबाद, बीड जिल्ह्यात बिबट्यांचा धुमाकूळ सुरू असल्याने रात्री शेतात जाणे जीवघेणे ठरत आहे. पैठण तालुक्यात रात्री शेतात पिकाला पाणी देण्यास गेलेल्या बापलेकाला बिबट्याने ठार केले. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातही तीन निष्पाप शेतकरी बांधवांचा अशा घटनेत बळी गेला.

🔸शेतकऱ्यांचे अधिकारी ऐकेना

रयत शेतकरी संघटनेने नमूद केले आहे, की महावितरणकडून वीजपुरवठा लहरी पद्धतीने, अयोग्य दाबाने व दोन फेज, तीन फेज अशा विचित्र पद्धतीने होत आहे. पिकांना पाण्याची गरज असेल तेव्हा विद्युत रोहित्र निकामी झालेल असते. शेतकरी वर्गणी गोळा करतात. तरीही रोहित्र पंधरा दिवस ते महिनाभर केव्हा तरी दुरुस्त करून मिळते. यामुळे पिकांचे अतोनात नुकसान होते. महावितरण कंपनीच्या नियमानुसार रोहित्र दुरुस्तीसाठी ४८ तासांची मुदत आहे. मात्र, शेतकऱ्यांना आजवर कधीही ४८ तासात विद्युत रोहित्र मिळाले नाहीत. वेळेत दुरुस्ती न झाल्यास एका शेतकऱ्याला प्रतितास पन्नास रुपयांप्रमाणे नुकसान भरपाई आजवर मिळाल्याचे ऐकिवात नाही.

🔹रोहित्रासाठी मोजावी लागते रक्कम

रोहित्र बसविण्यासाठी शेतकऱ्यांकडून २० ते ३० हजार रुपये घेतले जातात. हे शेतकऱ्याचे आर्थिक शोषण थांबवा, अशी मागणीही रयत शेतकरी संघटनेने केली आहे. प्रत्येक जिल्ह्यात शिल्लक जनित्र (डीपी) ठेवावेत. विद्युत कर्मचाऱ्यांच्या वागण्यामुळे आजवर विद्युत तारा डोक्याला लागून किंवा तत्सम कारणांनी अनेक शेतकऱ्यांचा आणि पाळीव प्राण्यांचा बळी गेला आहे. आता प्राथमिक स्वरूपात संपूर्ण महाराष्ट्रभर सौरपंप विनाशर्त व विनाअडथळा उपलब्ध करून द्यावेत.

ज्या शेतकऱ्यांकडे विद्युत कनेक्शन आहे, अशा सर्व शेतकऱ्यांना आजपर्यंत वीजबिल मुक्त करावे, त्यांचे बिल पूर्णपणे शासनाने भरावे, सर्व शेतकऱ्यांना सौरऊर्जा कनेक्शनसाठी कोटेशन भरण्याची परवानगी द्यावी व त्वरित सौर पंप बसून मिळावा, अनुदानित सौरपंपाची मागणी जास्त असल्यामुळे पुरवठाही त्या पटीत असावा, असेही निवेदनात नमूद केले केले आहे.