मेधा ….समर्पणाचे दुसरे नाव

81

🔸१ डिसेंबर – मेधा पाटकर यांच्या ६६ व्या वाढदिवसानिमित्त हेरंबकुलकर्णी यांचा लेख

मेधा पाटकर हे एका अस्वस्थतेचे नाव आहे
मेधा पाटकर हे एका समर्पणाचे नाव आहे
मला मेधा का भावते ?
मेधाने माझ्यावर नेमके काय गारुड केले आहे ?
मनाच्या तळाशी रुतून बसलेली मेधा मला सारखी का हाकारत असते ?
ती मला माझ्या सुखवस्तू आयुष्याला अपराधीभावाची चौकट देत राहते
मेधाचा बायो डाटा तिच्या आयुष्यातील सगळे प्रसंग यावर आजपर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून अनेकदा लिहिले गेले आहे. त्यामुळे मेधाचे आयुष्य पुन्हा सांगण्यापेक्षा मेधा मला का हाकारते ? याचा आज शोध घ्यावासा वाटतो.
घरातील सामाजिक पार्श्वभूमी, कामगार चळवळीतील वडील,आजूबाजूचे सामाजिक वातावरण, घरी येणारे सगळे महत्त्वाचे कार्यकर्ते आणि विद्यार्थिदशेत शाळेतील विविध उपक्रम, महाविद्यालयातील व्यासंग फुलवणारे वातावरण, टाटा समाज विज्ञानने दिलेली संशोधकीय नजर आणि विविध सामाजिक प्रकल्पात काम करण्याची मिळालेली संधी ही जडणघडण याचा नक्कीच मेधाच्या व्यक्तिमत्त्वात वाटा आहे. हे सगळे इतरांच्या वाट्याला येत नाही असाही बचाव कुणी करेल पण ज्यांच्या वाट्याला हे आले ते मागच्या पिढीने त्याग केला आता आही सुखवस्तू होणार म्हणून सुटका करन अशी सूर्याची पिल्लेही आपण बघितलीत. मुळातच मेधाचे तीव्र उत्कट आणि संवेदनशील व्यक्तिमत्वाला या वातावरणाने पैलू पडले इतकेच. मेधाचे अभिजात व्यक्तिमत्व तिला कोणत्याही क्षेत्रात गेले असते तरी इतकेच जगप्रसिद्ध आणि वेगळा ठसा उमटवणारे ठरले असते हे नक्की.

मेधा जर कार्यकर्ती झाली नसती तर ती काय झाली असती ? ती काहीही झाली असती. ती उत्तम प्रशासक झाली असती. ती समाजशास्त्रज्ञ झाली असती, उत्तम संशोधक झाली असती. लेखिका आणि विचारवंत तर अगदी सहज झाली असती. उत्तम नर्तिका या करिअरने तिला खुणावले असते आणि आयुष्यभर फक्त कविता वाचत आणि लिहीतही ती जगू शकली असती.. उत्तम प्राध्यापक होऊन तिने पिढ्यांना प्रेरणा दिल्या असत्या.. मेधाची क्षमता ज्यांनी जवळून बघितली आहे किंवा ज्यांनी तिचे अपार कष्ट घेणे बघितले आहे ते हे अगदी सहज स्वीकारतील.
तिने तिच्यातील कलावंत आंदोलनाच्या मातीत अक्षरश: गाडून रुजवला.तिला तिच्या कवितेच्या ओळी लिहिण्यापेक्षा तिने उभ्या केलेल्या आंदोलकांच्या मोर्चातील रांगा महत्वाच्या वाटल्या. एखाद्या गाण्याच्या ताणेपेक्षा आंदोलकांनी ‘आमु आखा एक है’ ही दिलेली आरोळी महत्वाची वाटली… सारख्या अनुप्रासात धावणार्‍या ओळींपेक्षा तिला मध्यप्रदेश गुजराथ आणि महाराष्ट्रातील आंदोलने एका लयीत चालणे महत्वाचे वाटले… इतिहासाची पुस्तके वाचण्यापेक्षा इतिहास घडविणे महत्वाचे वाटले.. एखादे चित्र कॅनव्हासवर रेखाटण्यापेक्षा जीवनशाळेच्या पटावर शिक्षणाची रचना करणे त्यात रंग भरणे तिला महत्वाचे वाटत आले आहे. या अर्थाने तिने तिच्यातील कलावंत मारला की तो जमिनीत रुजवून त्यातून त्या कलावंतांचे वेगळेच प्रकटीकरण केले हा एक संशोधनाचा विषय आहे..पण ती कलावंत असल्यानेच आदिवासींची होळी ही आंदोलनाच्या प्रकटीकरणाचे एक महत्वाचे माध्यम ठरले.. जीवनशाळा हे सुंदर नाव आणि त्यातील कथा आणि अभ्यासक्रम आणि त्या शाळेचा वर्षा उत्सव साजरे करणे हे मेधालाच सुचू शकते… ‘आमु आखा एक है , ‘लढाई पढाई साथ साथ’ या अफलातून घोषणा कवितेपेक्षा कमी आहेत का ? आंदोलनाशी देशातील कलाकार जोडणे हे तिच्यातील कलावंत असल्यानेच सुचू शकते आणि उत्कटतेने अनेकदा उपोषणातून मृत्यूला शिवून येणे हे एक उत्कट कलावंतच करू शकतो..

मेधाने उभ्या केलेल्या नर्मदा बचाव आंदोलनाचा अभ्यास करताना एक नेता म्हणून मी तिला समजू पाहतो. तेव्हा तिचे वेगवेगळे रूप मला दिसू लागते. नेता म्हणून तिचे अफाट सामर्थ्य मला उमगते. स्वतंत्र्य भारतात स्वतंत्र्य आंदोलनानंतर इतके दीर्घकाळ व प्रभावी असलेले हे महत्वाचे आंदोलन ठरावे. किमान ३० वर्षे चाललेले हे आंदोलन किमान दोन पिढ्यांना हाकारते आहे. ३० वर्षे देशातील इतके प्रश्न आणि समाजमन बदलत असताना माध्यमांचे लक्ष वेधत आणि लोकांना सोबत जोडून ठेवणे हे असाधारण क्षमतेचे काम आहे. आणि सर्वात महत्वाचे हे की तिने सर्वात गरीब निरक्षर आणि बाहेरच्या जगाची काहीही माहिती नसलेल्या आदिवासींना घेऊन हे ३० वर्षे आंदोलन उभे केले आहे हे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य आहे. ती एकाचवेळी जागतिक बँकेच्या अध्यक्षाशीही बोलू शकते आणि त्याचवेळी छोट्या गावाच्या सरपंचाशीही बोलू शकते. ती अमेरिकन कॉंग्रेसच्या खासदारांसोबतही बसते आणि मध्यप्रदेशातील खेड्यातील मासेमारी करणार्‍या बांधवासोबतही नदीकाठी बसू शकते.

ती संसदभवनात आपली बाजू पटवून देवू शकते आणि एखाद्या घुंगट घेतलेल्या चुलीजवळ स्वयंपाक करणार्‍या महिलेशीही बोलू शकते हे मेधाचे सामर्थ्य आहे. आणि पुन्हा हे संघटन अशा प्रदेशातील आहे की कित्येक किलोमीटर चालल्यावर एखादे घर लागेल अशा शेकडो किलोमीटरमध्ये पसरलेल्या आदिवासींचे.. पहिल्यांदा ती हा प्रदेश बघायला आली तेव्हा सलग अडीच दिवस नुसती चालली होती. एकदा बैठकीसाठी ती सलग ४० किलोमीटर चालली होती हे समजल्यावर तर थक्क झालो. नर्मदा प्रदेशात फिरताना एकदा एक नदी ओलांडताना चांगली होडी नव्हती. तेव्हा झाडाच्या बुंध्यापासून केलेल्या डोंगीवर बसून तिने नदी ओलांडण्याचे ठरवले. ती डोंगी नदीच्या मध्येच कलंडली आणि मेधा नदीत पडली आणि वाहून जायला लागली..आजूबाजूच्या लोकांनी तिला वाचवले. इतकी टोकाची जोखीम घेऊन तिने आंदोलन उभारले आहे. मुंबईत लोकसभा मतदारसंघसुद्धा गाडीतून फिरून होतो पण इथे तीन राज्यातील बुडणारी रस्ता नसलेली २५० गावे आणि नदीला ओलांडत तर कधी काठाकाठाने जात संघटना तिने कशी बांधली असेल ? तीन राज्यातील भाषा वेगळ्या. त्या शिकून त्या लोकांना आपलेसे वाटेल अशी मांडणी करायची..हे सारे तिने कसे केले असेल ? यातल्या अपार कष्टाची जाणीव होते.

तिचे दुसरे वैशिष्ट्य हे वाटते की आपल्याकडे अनेक आंदोलने ही खूप ठिसूळ पायावर,भावनिक मांडणीवर असतात. त्यामुळे त्यांचा परीघ मर्यादित होतो.पण मेधाचे वैशिष्ट्य हे की तिने आंदोलनासाठी त्या प्रश्नाचा संपूर्ण अभ्यास केला. जागतिक पातळीवरील मोठ्या प्रकल्पाचे लाभ आणि हानी कशी मोजायची ? मोठे प्रकल्प फायद्याचे आहेत की लहान प्रकल्प योग्य आहेत ? असे प्रचंड वाचन करून ,चिकाटीने सर्व कागदपत्रे मिळवून त्या विषयातील व्यासंग करून विकास म्हणजे काय ? ही पर्यायी मांडणी केली. या पर्यायी मांडणीमुळे विकासाच्या कल्पनेवरच जगभर चर्चा झाली. अशा भक्कम मांडणीवर हे आंदोलन उभे राहिले. यापूर्वी बाबासाहेब आंबेडकर आणि शरद जोशी यांनी अशी व्यासंगी मांडणी करून मग आंदोलने केली होती. या अभ्यासपूर्णतेने मेधाचे आंदोलन वेगळे ठरले.

आणखी एक मुद्दा लक्षात येतो तो हा की अनेकदा आंदोलन हे त्या प्रश्नाने प्रभावित झालेल्या लोकांपर्यंतच राहते पण मेधा आणि सहकारी यांनी या प्रश्नाने बाधित असलेल्या लोकांना जोडलेच पण देशातील सर्व महत्वाचे लेखक, कलावंत ,विचारवंत यांना या आंदोलनाशी जोडून घेतले. प्रत्येक आंदोलनात देशापातळीवरील महत्वाचे लोक सहभागी झाले आणि जगातील विकसनशील देशातील आंदोलनांशी जोडून घेतले त्यामुळे या आंदोलनाची जगाने दखल घेतली. देशपातळीवरील माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल, अच्युतराव पटवर्धन, स्वामिनाथन, शिवराम कारंथ, चो रामस्वामी, कुलदीप नय्यर, अशी कितीतरी नावे सांगता येतील. बाबा आमटे तर आंदोलकच झाले होते आणि अरुंधती राय सारखी विदुषी लेखिका आंदोलनात अनेकदा सामील झाली. महाराष्ट्रातील तर सर्व प्रमुख लेखक कार्यकर्ते या आंदोलनाचे भाग होते. मेधाचे हे यश आहे की अनेकदा आंदोलन त्या भूप्रदेशापुरतेच राहते. ते स्वाभाविकही असते पण नर्मदा आंदोलनाने कक्षा ओलांडली आणि ते परदेशातही गेले. बोलक्या वर्गात गेले आणि देशातील सर्व व्यासपीठे व माध्यमावर त्याची चर्चा झाली हे या आंदोलनाचे यश ठरले.

या विचारी व बुद्धिवादी वर्गाला जोडून घेतल्याने आंदोलनाची ताकद कित्येक पट वाढली. मिडिया या आंदोलनाशी सतत जोडून ठेवणे हे मोठे आव्हान होते. याचे कारण सलग 30 वर्षे सुरू असलेल्या लढ्याकडे सतत लक्ष वेधून घेणे कठीण असते. दरवर्षी पावसाळ्यात गावे बुडतात आणि दरवर्षी तुम्हाला माध्यमाचे लक्ष वेधायचे आहे. माध्यमांची त्यातील उत्सुकता पहिल्या काही वर्षात लगेच संपून जाते पण तरीही दरवर्षी आंदोलनाचे स्वरूप बदलून ते करत राहून प्रश्न चर्चेत ठेवणे हे आव्हान होते पण ते पेलले हे विशेष. आंदोलनाशी जोडलेली माध्यमे नसती तर इतक्या दूर जंगलात होणारे सक्तीचे विस्थापन अत्याचार समाजापर्यंत पोहोचलेसुद्धा नसते.

पण मेधाला केवळ नर्मदा प्रश्नापुरते समजणे ही अपुरी समज ठरेल कारण नर्मदा आंदोलंनासोबत तिने सहकार्‍यांसोबत सुरू केलेले ‘ जन आंदोलानांचा राष्ट्रीय समन्वय’ या आंदोलनाने देशपातळीवर ठिकठिकाणी लढणार्‍या आंदोलनांना जोडून घेतले आहे व देशपातळीवरील सर्व प्रमुख प्रश्नावर काम करणारी आंदोलने यात सहभागी आहेत. केरळ, पश्चिम बंगाल, तामिळनाडू ,झारखंड मधील मोठी मोठी आंदोलने गाजली. सिंगूर मधील झालेले मोठे आंदोलन याच व्यासपीठावरून झाले. महाराष्ट्रातील लवासाचा भेसूर चेहरा यांनीच उघड केला. विकासाच्या नावाखाली गरिबांना सक्तीने विस्थापित करणार्‍या सर्व दडपशाहीला विरोध करीत गरिबांचा आवाज आज हा राष्ट्रीय समन्वय काम करतो आहे आणि मेधा पाटकर देशभर या सर्व आंदोलनात सहभागी होत असतात.

मुंबईतल्या अंनधिकृत ठरवलेल्या झोपडपट्ट्यांना खंबीर पाठिंबा मेधाने दिला. सक्तीने झोपड्या तोडताना बुलडोझरपुढे निडरपणे उभी राहणारी मेधाच असते. झोपडपट्टी ही शहरी जीवनावर ओझे नाहीतर ते शहरी जगण्याचे ते अविभाज्य भाग आहे असे ती ठामपणे पटवून देते. तुमच्या उंच बिल्डिंग झाडायला माणसे, घरातील नोकर, वॉचमन, ड्रायवर हे या सर्व झोपड्यातून येतात, झोपड्या तोडल्या तर ही तुमची कामे तुम्ही करणार आहात का ? ही जाणीव ती करून देते.

विकासाच्या प्रश्नावर जगभर घडवलेली चर्चा हे मेधाचे सर्वात मोठे योगदान आहे. दिल्लीतील अनेक कार्यक्रमात तिने याबाबत उठवलेले प्रश्न अनेकांना निरुत्तर करतात. ती म्हणते की विकास हा शब्द आज राजकारणात जणू मंत्र म्हणून काम करतो आहे. एखादी अंधश्रद्धा जशी असते तशी विकासाबाबत अनेकांची अंधश्रद्धा निर्माण झाली आहे. विकासाच्या प्रक्रियेला प्रश्न विचारणे म्हणजे तुम्ही विकासाविरोधी कसे ठरू शकता ? असा प्रश्न ती विचारते. विकासाने केलेले दावे तपासणे आणि लाभ हानीचा शास्त्रीय हिशोब मांडणे याला नकारात्मक समजणे हे अत्यंत चूक आहे. त्या विकासात विस्थापित होणार्‍यांना केवळ पैसे देणे याने त्यांचे पुनर्वसन होईल कसे ? अनेक पिढ्या मासेमारी करणार्‍या निरक्षर माणसांना दुसरी कोणतीच कौशल्ये नसताना केवळ पैसे देवून शहरात आणून टाकण्यातून तो कसा जगेल ? इतका साधा विचार करणार नसाल तर कसे होईल ? पुन्हा मेधा या पुनर्वसन प्रक्रियेत भरपाई देताना झालेला भ्रष्टाचार उघड करून दाखवते आणि विषमता आणि भ्रष्टाचार या आज एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत ही मांडणी पटते. तुमच्या तथाकथित विकासासाठी तुम्ही जे अगोदरच सर्वहारा आहेत त्यांना तुम्ही उदध्वस्त करणार आणि तुमच्या विकासाचे लाभार्थी जे आहेत ते धनदांडगे आहेत. यांच्यासाठी या गरिबांनी सर्वस्व पणाला का लावायचे ? असा थेट प्रश्न या आंदोलनाने विचारले. पर्यावरण आणि जैवविविधता यांचा बळी देऊन जे होते त्याला विकास म्हणायचा का ? असा नेमका प्रश्न मेधाने या व्यवस्थेला विचारले.

‘संघर्ष आणि निर्माण’ ही तिच्या कामाची खासियत आहे.महात्मा गांधींनी हीच भूमिका मांडली. संघर्ष करताना विधायक कामाची रचना केली. छत्तीसगडच्या शंकरगुहा नियोगी यांनी याच प्रकारे आंदोलन आणि निर्माण केले. संघर्ष करताना जीवनशाळा हा मेधाचा शिक्षणातला अभिनव प्रयोग आहे. हा प्रयोग शिक्षणातल्या तज्ज्ञांना खेचून घेतो इतका आशयपूर्ण आहे.आंदोलन सुरू झाले तेव्हा लक्षात आले की या भागात शाळा सुरू नाहीत. शिक्षक शाळा भरवत नव्हते. त्याविरोधात अनेकदा तक्रारी केल्या पण काही उपयोग होईना. मुले तर शिकली पाहिजेत. तेव्हा आंदोलनाच्या वतीने शाळा सुरू केल्या. त्या भागातील १२ वी झालेले तरुण शिक्षक बनले. पण सरकारने त्या शाळा बंद करण्याचा अनेकदा प्रयत्न केला. आमच्या शाळा तिथे असताना परवानगी मिळणार नाही अशी भूमिका घेतली आणि सरकारी शाळा नीट चालाव्यात म्हणून प्रयत्नही केला नाही.त्यामुळे सतत त्रास दिला.

या शाळातील अभ्यासक्रम त्या परिसराशी जोडलेला असावा यासाठी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ कृष्णकुमार,अनिल सदगोपाल यांना दिल्लीहून निमंत्रित केले आणि शिक्षणातल्या अनेक कार्यकर्त्यांना एकत्र करून अभ्यासक्रम तयार केला व इतक्या सखोल पायावर जीवनशाळा उभ्या आहेत.या शिक्षकांना सतत प्रशिक्षण दिले जाते.महाराष्ट्रातील प्रयोगशील शाळांतील शिक्षक यांचे प्रशिक्षण करतात. हे विद्यार्थी शिकल्यावर पुढच्या शिक्षणाची सोय धुळे येथे करण्यात आली. जीवन मरणाचे संघर्ष लढताना या पर्यायी शिक्षणाची मांडणी आणि अंमलबजावणी मेधाने करून दाखवली…

या जीवनशाळांच्या वर्षाउत्सवाला निमंत्रण आले. त्यामुळे मेधा समजायला मदत झाली. मेधा समजायला मेधासोबत फिरावे लागते तेव्हा ती काय रसायन आहे ,ती कशाची बनली आहे हे उमजते. तिच्यापुढे आपल्या मानवी मर्यादा थिट्या पडतात तेव्हा तिचे सामर्थ्य लक्षात येते. तो अनुभव मी घेतलाय. असाच एकदा वर्षाउत्सवाला बोलावलं म्हणून मी गेलो होतो. सलग दोन दिवस सोबत राहिल्यावर जेव्हा थकायला झालं आणि हे प्रकरण आवाक्याबाहेर आहे ही खात्री पटून गुपचुप तिला सोडून निघून आलो. एकतर त्या नर्मदा घाटीत रस्तेच नाहीत. सगळी उंचसखल रचना .त्यामुळे धक्के खात जीप चाललेली. त्यात रात्रभर मेधा न झोपता सलग बोलते आहे. सोबत आलेल्या लोकांना प्रश्न समजून सांगते आहे. मध्येच जीप थांबवून रस्त्यावरच्या परिचितांशी बोलते आहे. गाडी थांबली की सर्वांच्या अगोदर उतरून सर्वात पुढे. इतकी दमली असूनही,जीवनशाळेकडे जायला एका मोठ्या होडीतुन जाताना सगळे गप्प बसलेले तेव्हा ही उठून नर्मदेचे गाणे सुरू करते व इतरांना टाळ्या वाजवून म्हणायला लावणार ..आजही मेधाने म्हटलेले ते गाणे कानात आहे.

‘ रेवा, मा थारो पाणी निर्मल ‘. होडी किनार्‍याला लागताच जीवनशाळेची मुले धावत धावत समोर येतात .त्या मुलांना बघताच मेधा सगळे श्रम विसरते आणि घोषणा द्यायला सुरुवात करते ‘ अमू आखा एक है “ ती म्हणते “जीवनशाळा की क्या है बात” मुले जोराने ओरडतात “ लढाई पढाई साथ साथ “ आणि अशी ही मिरवणूक त्या जीवनशाळेकडे चालू लागते. या शाळेच्या वर्षा उत्सवासाठी तिने आमच्यासारख्या अनेकांना निमंत्रण दिले आहे. त्या उत्सवात ती मुलांसोबत लहान मूल झाली आहे. जागतिक बँकेला जाब विचारणारी मेधा हीच का ? असा प्रश्न पडतोय मला. तिथला उत्सव संपल्यावर ती रात्रभर प्रवास केलेल्या आम्हाला विश्रांती घेऊ देत नाहीये. रात्री आंदोलनाची एक मोठी सभा आहे तिथे घेऊन गेली आणि तिथला जोश पुन्हा वेगळाच आहे. सकाळी मुलांसमोर मूल झालेली ती आता सरकारवर वीज होऊन कोसळते आहे.दोन दिवसांच्या जागरणाचा ताण कुठेही नाही..

तिथली सभा मध्यरात्री संपल्यावर दुसर्‍या दिवशी सकाळी १५ ऑगस्टचे झेंडावंद्न. ते उत्साहाने झाले की गावकर्‍यांसोबत बैठका. बैठका सुरू झाल्यावर मुंबईतून फोन येतो. अनधिकृत झोपड्या तोडत आहेत. मेधा त्या बैठका थांबवून मुंबईकडे निघाली. तीन दिवसातला हा अफाट प्रवास आणि स्टॅमिना बघितला की ती अमानवी वाटू लागते.. आपण खूप क्षुद्र आहोत. आपल्या मर्यादा आपल्याला ठळकपणे जाणवतात. मेधा समजायला एकदा तिच्यासोबत एक दिवस राहायला हवे. तिच्यातील उत्कटता, तिच्यातील उत्स्फूर्तता, सर्वस्व झोकून देणारी वृत्ती हे सारे खूप अपवादाने दिसणारे आहे. स्वत:ला वगळून सतत गरिबांचा विचार करणारी मेधा ही एकमेवाद्वितीय आहे आणि आत्मकेंद्री जगाला नकळत अंतर्मुख करणारी आहे.

पण इतके हे प्रेरणादायी जगणे असताना मेधाची खिल्ली उडविणारी विकृती जेव्हा मी बघतो तेव्हा मात्र संताप होतो. एकदा घराघरात पाणी घुसल्यावर कित्येक तास पाण्यात उभी राहून आंदोलन करीत होती तेव्हा अनेकजण इतके तास पाण्यात उभे राहता येते का ? खरेच ती उभी राहिली असेल का ? याची चर्चा काहीजण करीत होते. मेधाला परदेशी पैसा मिळतो का ? निवडणुकीत कमी मते का पडली ? विकासात ती अडथळा आहे अशी अत्यंत अनुदार चर्चा करणारे संवेदनाहीन लोक मी बघतो तेव्हा संताप संताप होतो.. मेधाची बांधिलकी तपासायची आपली योग्यता असते का ? या उद्वेगातून तेव्हा मी मेधावर सहज लिहून गेलो होतो..
प्रिय मेधा ,
धुवांधार कोसळत्या पावसात,
दारं खिडक्यांसह स्वत:ला
स्वेटर मफरलमध्ये बंद करून बसलेला मी,
एका हातात चहाचा कप
आणि दुसऱ्या हातात रिमोट घेतलेला…..
अशा रम्य वातावरणात
दिसतेस मला तू
एका न्यूज चॅनलवर उभी
‘डूबेंगे पर हटेंगे’ नही च्या निर्धाराने

‘तुझी बांधिलकी कि स्टंट’?
‘तू हट्टी की दुराग्रही’?
‘विकासवादी की विकासविरोधी’?
याची चर्चा मी
चहाच्या घोटाघोटाने करीत राहतो

मेधा ,
आमच्यासारखी आत्ममग्न सुरक्षित बेटं
पाण्याखाली का ग जात नाहीत ….?

 

✒️लेखक:-हेरंब कुलकर्णी
महालक्ष्मी मंदिराजवळ, मुपो ता अकोले
जि अहमदनगर ४२२६०१
मो:-८२०८५८९१९५

मेधा पाटकर यांच्याविषयी मराठीतील काही पुस्तके जरूर वाचा
लढा नर्मदेचा नंदिनी ओझा (राजहंस प्रकाशन)
मेधा पाटकर सोनाली नवागुळ (मनोविकास प्रकाशन)
नर्मदा संघर्ष दीपक चैतन्य (साकेत प्रकाशन )
—————
*हेरंब कुलकर्णी* (8208589195)
————————————-
गिरीश गांधी यांनी प्रसिद्ध केलेल्या *स्मिता स्मृती विशेषांक* २०२० सावित्रीच्या लेकी या अंकातून संपादक :अरुण शेवते