पोर्ला येथील शिवमंदीरात ग्रामगीता वाचन संपन्न

27

🔸ज्ञान भक्तीच्या आधारे सामाजिक जाणिवेला समृद्ध करण्याचे महान कार्य ग्रामगीता ग्रंथानी केले – बंडोपंत बोढेकर

✒️नरेश निकुरे(कार्यकारी संपादक)मो:-9823594805

पोर्ला(दि.1डिसेंबर):-कार्तिक पौर्णिमेच्या शुभपर्वावर दरवर्षी प्रमाणे यावर्षीही पोर्ला येथील शिवमंदीर परिसरातील स्व. तुळसाबाई दशमुखे स्मृती भवनात ग्रामगीता वाचनाचा कार्यक्रम घेण्यात आला . कोरोना महामारीची परिस्थिती लक्षात घेता तीन दिवसीय छोटेखानी कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते.

सामाजिक अंतर ठेवत ग्रामस्थांनी ह्या कार्यक्रमाचा लाभ घेतला. समारोपिय कार्यक्रमास गडचिरोली पं. स. सभापती मारोतराव इचोडकर , ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर , केशवराव दशमुखे गुरूजी , ग्रंथवाचक डोमाजी झरकर महाराज , मधुकर खडतकर, रामकृष्ण ताजणे, रामचंद्र दशमुखे ,बापुजी फरांडे , देवीदास भोयर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

दिपप्रज्वलन झाल्यानंतर शिवमंदीर समिती तथा आयोजन समितीच्या वतीने सभापती मारोतराव इचोडकर , साहित्यिक बंडोपंत बोढेकर आणि ग्रंथवाचक झरकर महाराज यांचा केशवराव दशमुखे यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.प्रास्तविक पं. स.उपसभापती विलासराव दशमुखे यांनी केले. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक बंडोपंत बोढेकर म्हणाले , ग्रामजीवनाच्या एकुणच उन्नतीचा विचार ग्रामगीता ग्रंथात वं. राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराजांनी सांगितला.

निष्काम सेवाभावनेतून सहकार्य आणि , प्रेमभाव वाढीस लागते म्हणून सेवामार्गाचे आचरण सर्वांनीच केले पाहिजे. ज्ञान भक्तीच्या आधारे गावागावात सामाजिक जाणिवा समृद्ध करण्याचे कार्य राष्ट्रसंताच्या ग्रामगीता ग्रंथानी केले आहे.

असे प्रतिपादन बोढेकर यांनी केले. प्रमुख अतिथी सभापती इचोडकर यांनीही राष्ट्रसंताच्या भजनांचे सुरेख गायन करून दशमुखे परिवाराच्या ह्या सामाजिक योगदानाबद्दल कौतुक केले. सूत्रसंचालन विनोद दशमुखे यांनी केले.आभार प्रदर्शन संतोष दशमुखे यांनी केले .निरंकारी भजन मंडळी याप्रसंगी आपली भजनसेवा दिली.