जीवनात पत्नीचे महत्व समजून घेऊया

239

नऊ महिने मायेने आपल्या पोटात सांभाळून त्यानंतर जन्म देणारी आई. स्वतः अनेक यातना सहन करते; पण आपल्याला सुखात ठेवते. तळहाताच्या फोडाप्रमाणे आपल्याला सांभाळते. त्यामुळे आईसारखी मायाळू आईच. संपूर्ण आयुष्य पणाला लावून आपल्याला लहानाचे मोठे करणारे आई-वडील. आपल्या पंखात बळ निर्माण करतात. आपल्याला मुक्त आकाशामध्ये विहार करायला शिकवतात.

 

घर असावं घरासारखं

नकोत नुसत्या भिंती

तिथे असावा प्रेम जिव्हाळा

नकोत नुसती नाती…..

 

या घरातून पिल्लू उडावे

दिव्य घेऊन शक्ती…

 

ज्याप्रमाणे आई वडील आपल्याला वाढवतात, घडवतात, सक्षम बनवतात. या जगात जीवन जगण्यास शिकवतात. ते जीवनाचा आधारवड असतात. आपल्या आयुष्याच्या एका टप्प्यावर आपले जन्मदाते आपला विवाह लावून देतात. आपल्या आयुष्यात ‘आयुष्याचा जीवनसाथी’ येतो. जन्मदात्या मात्या पित्याप्रमाणे पुढील आयुष्याचा भक्कम आधार आपला जीवनसाथी असतो.

संपूर्ण हयातभर नाही तर त्याच्याही पुढे जाऊन आपल्या हयातीनंतर आपल्या लेकरांचा विचार करणारे आई-बाबा. आपल्या भविष्याचा विचार करूनच आपल्याला चतुर्भुज करतात.

प्रितीची दोन पाखरं… अनंत स्वप्न उराशी बाळगून… प्रवेश करीत आहेत इवल्याशा घरट्यात… जे रुजलं आहे दोन परिवाराच्या ऋणानुबंधाच्या धाग्यांनी…. ज्यांना हवा आहे पंखात बळं…. आपल्या शुभ आशीर्वादांचे… तेव्हा याल ना आपण?…. यायचं हं नक्की….

अशा प्रकारचे आमंत्रण देऊन थोरामोठ्यांच्या आशीर्वादाने, सनई चौघड्याच्या तालासुरात, देवा ब्राह्मणाच्या साक्षीने, पवित्र अग्नीभोवती सप्तपदी घेऊन आपण विवाहबद्ध होतो.

 

ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी

भेटीत तृष्टता मोठी….

आयुष्याच्या नव्या पर्वाला सुरुवात होते. आपला संसार थाटला जातो. इथून पुढे खऱ्या अर्थाने माणसाच्या कार्यकर्तृत्वाची कसोटी सुरू होते. पारंपारिक पद्धतीनुसार उदरनिर्वाहाची सोय करणे, आर्थिक व्यवहार सांभाळणे याची जबाबदारी नवऱ्या मुलावर पडते. घर सांभाळणे, फुलवणे, घराला घरपण देणे, संस्कार देणे अशी अत्यंत महत्त्वाची जबाबदारी नवरी असणाऱ्या मुलीकडे येते. नवरा मुलगा नवराच राहतो; पण नवरी मुलगी मात्र बायको बनते. आपले आई-वडील, भाऊ-बहीण, आप्तस्वकीय, नातेवाईक, आपले घर सोडून दुसऱ्याचे घर सजविण्यासाठी आलेल्या या मुलीचा घरात लक्ष्मीच्या पावलाने गृह प्रवेश होतो. तिचे सगळे जग बदलते. हा खूप मोठा त्याग मुलीच्या जीवनातील असतो. म्हणूनच बापाचे घर सोडताना ती धाय मोकलून रडते. तिच्या आई-वडिलांची अवस्था तर खूपच वाईट असते. त्यांची अवस्था समजण्यासाठी प्रत्येकाला एक मुलगी असावी लागते. बघणाऱ्याचेही डोळे पाणावतात. भरल्या डोळ्यांनी आपल्या बाबांच्या घराचा निरोप नवरी मुलगी घेते. सासरचा गृहप्रवेश म्हणजे त्या मुलीसाठी एक नवा जन्म असतो.

या नव्या जन्मात ती कुणाची पत्नी असते. कुणाची सून असते. कोणाची वहिनी असते. तिला घर सांभाळताना ही सगळी नाती सांभाळायची असतात. हे सगळे करताना तारेवरची कसरत होत असते. हे कोणालाही सांगण्याची आवश्यकता नाही. हे सर्वांना माहीतच आहे. घर चालवण्यासाठी लागणारी आर्थिक पाठबळ उभे करणे या कामात पती गुंतून जातो. घर आणि घरातली माणसे या मुलीलाच सांभाळावी लागतात, जपावी लागतात. आपुलकीने मायेच्या ओलाव्याने नातेसंबंधांमध्ये जिव्हाळा निर्माण करावा लागतो. खरेतर हे सगळ्यांनाच जमते किंवा सर्व वेळेसच जमते अशातलाही भाग नाही. कमीअधिक गोष्टी प्रत्येक घरातच घडत असतात. माणसे आहोत आपण चुका तर होणारच; पण त्या सांभाळता आल्या; की माणसाचे जीवन सार्थकी लागते.

खरेतर कोणत्याच नात्याची तुलना होऊ शकत नाही. प्रत्येक नाते हे आपआपल्या ठिकाणी खूप मोठे असते… प्रत्येक नाते प्रेमाने बहरत असते.. आपुलकीच्या ओलाव्याने घट्ट होत असते… मायेच्या जिव्हाळ्याने गुंफले जात असते.. पण खऱ्या अर्थाने एकमेकांची सोबत करणारे पती-पत्नीचे नाते असते….

घरातल्या सगळ्यांना जपणारी, सगळ्यांची काळजी घेणारी, मायेने आपल्या सगळ्या नात्यांना आपलेसे करणारी पत्नी मिळणे ही एक भाग्याची गोष्ट असते. आई आणि पत्नी दोघींनाही खदखदून हसताना, एकमेकांशी मोकळेपणाने बोलताना, एकमेकांची काळजी घेताना बघून किती धन्यता वाटते. याचे वर्णन करता येत नाही. आपल्या वडिलांची काळजी घेताना बघून किती समाधान वाटते ते सांगता येत नाही. कधी तरी आपण घरी असल्यावर संध्याकाळचा चहा वडीलांना देण्याची वेळ आपल्यावर आल्यास मोकळ्या हवेत बसणार्‍या वडिलांना बाहेर चहा नेऊन दिला; तर त्यावर चहा घरात बोलवुन द्यायचा असतो असा रस्त्यावर चहा देतात का ? म्हणून आपल्यावर रागावणारी पत्नी बघून मन भरून येते. छोट्या छोट्या गोष्टीतही आपल्याच आई-वडीला प्रमाणे आपल्याही आई-वडिलांचा विचार करणारी, काळजी घेणारी पत्नी मिळाणे यासाठी नशीब लागते.

भावा-भावाचे जमेल न जमेल, त्यांच्यात मतभेद असतीलही पण प्रत्येक भावासोबत तेवढ्याच आदराने आणि आपुलकीने वागून घराचे अभेद्य पण कायम ठेवणारी पत्नी मनात एकतेचचा आधार निर्माण करते. घरे वेगळी करणाऱ्या बायका दिसतात. त्यांच्यावर भरभरून टीकाही होते. पोटभर निंदानालस्ती होते. सगळा राग, सगळे दुःख विसरून घरे जोडणाऱ्या सुद्धा बायका असतात. यावर चर्चा होत नाही. त्यांचे कौतुक, गुणगौरव केला जात नाही. हे व्हायला पाहिजे. याची खूप गरज आहे. खऱ्या अर्थाने अशी पत्नी मिळणे यासाठी पूर्वजन्मीचे पुण्य लागते.

प्रत्येक गोष्टीत पतीचा विचार करणारी. प्रत्येक गोष्ट पतीसाठी करणारी. कायम त्याची आवड-निवड जपणारी. नेहमी त्याच्या बऱ्या वाईटाचा विचार करणारी. त्याच्या सुखामुळे सुखावणारी. त्याच्या दुःखामुळे गहिवरून जाणारी. त्याच्या वेदना स्वतः जाणून घेणारी. काटा त्याच्या पायात रुतावा आणि पाणी तिच्या डोळ्यातून यावे; एवढी आंतरिक भावनेने एक झालेली असते. केवळ नजरेतून त्याच्या मनातले विचार, भावना समजून घेते. घरी यायला थोडासा उशीर झाला; तरी अधीर होते. आजारपणात अस्वस्थ होते. आपल्या संसारात, घरात, लेकरा बाळात, घरातल्या माणसात, एवढी रमते ; स्वतःचे घर म्हणजे माहेर विसरते.

पत्नी ही साधी व्यक्ती नसते. खऱ्या अर्थाने संसार म्हणजे तिच्यासाठी तपश्चर्या असते. मन लावून, देहभान हरपून, ती भक्तिभावाने हे तप करते. आपल्या सुखदुःखापेक्षा, तिच्यासाठी घराचे सुखदुःख महत्त्वाचे असते. आपल्या आवडीनिवडी विसरून जाते; पण बाकी सगळ्यांच्या आवडीनिवडी जपते. पती वरचे प्रेम ही खऱ्या अर्थाने तिच्यासाठी भक्ती असते. याच भक्तिभावाने आयुष्यभर संसार फुलवते. लेकरांना जन्म देते. त्यांचे पालन पोषण करते. त्यांच्यावर चांगले संस्कार करते. असेल त्या परिस्थितीमध्ये , वेळप्रसंगी आपल्या पोटाला चिमटा घेऊन लेकरांना मात्र लाडाकोडात वाढवते. तिच्यासाठी स्वतःची हौस, मौज महत्वाची नसते. घरातल्याची मात्र प्रत्येक इच्छा पूर्ण करते. संपूर्ण आयुष्य समर्पित भावनेने जगते.

पतीला देव म्हणते. त्याचा प्रत्येक शब्द पाळते. त्याची मर्जी सांभाळते. मन प्रसन्न ठेवते. मानसिक, भावनिक बळ देते. कायमस्वरूपी भरभक्कम आधार देते. अडीअडचणीत संकटात खंबीर बनवते. पतीसाठी आणि आपल्या संसारासाठी वाटेल ते करण्याची तिची तयारी असते. तिच्यासाठी आपले घर आणि संसार हेच जग असते. आपल्या संसारात ती एवढी मनोभावे रमते; की कधीकधी आपले आजारपण सहज अंगावर काढते. खरेच पत्नी अजब रसायन असते. संपूर्ण अर्थाने आयुष्याचा, जीवनाचा ‘जीवनसाथी’ असते. जगण्याचा आधार आणि दिशाही तीच असते.

आत्तापर्यंतच्या आयुष्यात जन्मदात्या आई-वडीलांप्रमाणे, भावांप्रमाणे प्रत्येक गोष्टीमध्ये, सुख-दुःखामध्ये, प्रत्येक घटनेमध्ये, प्रत्येक कामामध्ये खंबीरपणे उभी राहणारी पत्नी मनाला खूप भावते. पत्नीच्या डोळ्यात दिसणारा पतीबद्दलचा अभिमान, त्याच्याबद्दलचे प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, आदर आणि मैत्रीभाव पाहून धन्यता वाटते. जीवनात पत्नी सारखी दुसरी मैत्रीण नाही ; याचा प्रत्यय येतो.

बायको कुणाचीही असो ती संशय घेतेच. हा संशयी स्वभाव खूप काही सांगून जातो. संशय प्रेमाची पावतीच असते. जोपर्यंत संशय आहे ; तोपर्यंत प्रेम कमी झाले नाही. असे समजले जाते. ज्यावेळी पत्नी पतीच्या मैत्रिणी वरून त्याला चिडवते ; त्यावेळी तिच्या भावना समजत नसतील का ? लग्नाअगोदरच्या काळातल्या त्याच्या ‘स्वप्नातल्या अव्यक्त प्रेम कहाण्या’ असतीलही; पण पूर्णत्वाला गेलेली एकच कहाणी असते. आयुष्यभर साथ देणारी आणि आयुष्याच्या पलीकडेही साथ देणारी प्रेम कहाणी त्यांचीच असते . आता तीच पत्नी, प्रेयसी, अर्धांगिनी, सखी असते. फक्त तिच्यासाठीच तो म्हणतो…..

 

माझ्या कणाकणात

तुझाच वास आहे

तू फक्त घेऊन पहा

मी तुझाच श्वास आहे.

पत्नीचे आपल्या जीवनातील स्थान खूप महत्त्वाचे असते. अनन्यसाधारण असते. पत्नीच खऱ्या अर्थाने उभ्या जीवनाचा जीवनसाथी असते. चांगल्या-वाईट प्रत्येक प्रसंगात तीच साथ देत असते. सप्तपदी चालताना घेतलेली सात वचने जन्मभर सांभाळते. एकच जन्म नाही ; तर सात जन्मासाठी आपली सोबत करते. अशा पत्नीसाठी मी बायको नावाची कविता केली आहे. या कवितेनेच सदरच्या लेखाचा शेवट करणे योग्य होईल.

 

*बायको*…..

 

पत्नी, अर्धांगिनी, बायको

तिच जीवनसाथी ही असते

अलगद आपल्या हृदयाच्या

घरात जाऊन बसते

 

खरे सांगा तिच्यापुढे

कोणाचे काही चालते..?

तिच्या विरहाची हुरहूर

प्रत्येकाच्या मनात सलते

 

तिच्या नुसत्या नजरेतही

वेगळीच जरब असते

ती तिच्या नवऱ्याला

अगदी सहज दिसते

 

कोणी केवढाही असो

सगळ्यांची हीच अवस्था

कोणी खरे सांगत नाही

ही फसवाफसवी ची व्यवस्था

 

भल्या भल्यांची इथे

बोबडीच वळते

व्यसन आणि दुर्गुण

आपोआप पळते

 

तिच्या या भीतीचे

एकच कारण असते

स्वतः तिच्या वागण्यात

एकही चूक नसते

 

ती सतत संसारासाठी

अहोरात्र झिजते

आपल्या सुखासाठी

देव-देवताही भजते

 

तिच्यामुळेच घराला

खरी शोभा असते

म्हणूनच तर पतीला

एखाद्या देवी सारखी दिसते

 

✒️लेखक:-श्री. मयूर मधुकरराव जोशी(ग्रीन पार्क, जिंतूर. जि. परभणी)मो:-9767733560/7972344128