थंडी गुलाबी, हवाही शराबी : धनुर्मासाची खुबी !

29

सूर्य एका वर्षात १२ राशींतून भ्रमण करत असतो, तो ज्या महिन्यात धनु राशीत असतो, त्या मासाला धनुर्मास किंवा धुंधुरमास म्हणतात. मकरसंक्रातीच्या आदल्या दिवशी येणारी भोगी हा या महिन्याचा शेवटचा दिवस असतो. हा काळ १३ ते १७ डिसेंबरच्या आसपास सुरू होऊन १३ते १५ जानेवारीला संपतो. हिंदू पंचागात हा काळ मार्गशीर्ष-पौष या काळात येतो. हा कालखंड दक्षिणायनात हेमंत ऋतूमध्ये असतो. यावेळी हवेत अत्यंत गारठा असतो. विशेषत: रात्री हे शैत्य वाढते. रात्रीही मोठ्या असतात. जठराग्नी या शैत्यामुळे नाभिस्थानी कोंडला जातो आणि मनुष्याची भूक वाढते. याचा परिणाम असा होतो की मनुष्याला सकाळी लवकर भूक लागते. आयुर्वेदात हा परिणाम असा वर्णन केला आहे –

“दैर्घ्यात् निशानाम् एतर्हि, प्रात: एव बुभुक्षित: (भवति)।”
[पवित्र आयुर्वेद : अष्टाङ्गहृदय – सूत्रस्थान : अध्याय ३रा ]

आरोग्याचा नियम असा की भूक लागल्याशिवाय खाऊ नये आणि भूक लागल्यावर खाण्यास विलंब करू नये. भूक लागल्यावरही जर अन्न पोटात गेले नाही, तर त्याचा शरीरावर विपरीत परिणाम होतो. अग्नीला इंधन हवे असते. ते मिळाले नाही तर तो विझून जातो. जठराग्नीचे इंधन म्हणजे अन्न. अग्नी प्रदीप्त झाल्यावर ते त्याला मिळालेच पाहिजे. ते न मिळाल्यास तो रस, रक्त इत्यादी धातूंचा नाश करतो आणि थकवा जाणवू लागतो, वजन कमी होते. हे सर्व टाळायचे असेल तर अग्नीला त्या त्या वेळी इंधन पुरवले पाहिजे. म्हणून धनुर्मासात सूर्योदय झाल्याबरोबर आहार करणे आरोग्याच्या दृष्टीने चांगले. हा झाला आरोग्यशास्त्राच्या दृष्टिकोनातून विचार. याला आता आपल्या संस्कृतीत कसे बसवले? तेही पहाण्यासारखे आहे –

“इष्टान्भोगान् हि वो देवा दास्यन्ते यज्ञभाविताः ।
तैर्दत्तानप्रदायैभ्यो यो भुङ्क्ते स्तेन एव स: ।”
[पवित्र श्रीमद् भगवद्गीता : अध्याय – ३रा : श्लोक १२वा ]

इंद्र, वरुण, अग्नी, सूर्य अशा अनेक देवतांमुळे आपल्याला खाद्यपदार्थ उपलब्ध होत असतात. म्हणून आपण घास घेण्यापूर्वी थोडा त्यांना अर्पण करावा. त्यांनीच दिलेले अन्न त्यांना न देता जो स्वतः उपभोगतो तो स्तेन म्हणजे चोर ठरतो. धनुर्मासात सकाळी सकाळी कितीही कडकडून भूक लागली असली, तरी ताजे गरम अन्न आधी सूर्याला अर्पण करावे, म्हणजे नैवेद्य दाखवावा आणि मग भक्षण करावे अशी परंपरा आहे. धनुर्मास हे महिनाभर आचरण्याचे व्रत आहे. किमान गारठा असेपर्यंत आणि सकाळी भूक लागेस्तोवर निश्चितच आचरावे. आरोग्यशास्त्र आणि धर्मशास्त्र यांचा सुंदर मेळ धुंधुरमास व्रतात दिसतो. या मासात प्रत्येक दिवशी सूर्योदयापूर्वी देवाला महानैवेद्य अर्पण करून ब्राह्मणांसह भोजन करावे, असे सांगितले आहे आणि तेवढे शक्य नसल्यास निदान एक दिवस तरी तसे करावे, असे म्हटले आहे. दक्षिणेत तमिळ प्रदेशात मात्र हा मास अशुभ समजून त्यात अशुभ निवारणासाठी ते लोक ग्रहशांती व जपजाप्य करतात. धनुर्मासाची कथा अशी सांगितली जाते – ब्रह्मादि देवांनी विष्णूला प्रार्थना केली की, तू आम्हाला दैत्यांच्या त्रासातून सोडव. त्या प्रार्थनेनुसार विष्णूने धनुष्य घेऊन दैत्यांचा नाश केला. ही घटना सूर्य धनू राशीत असताना घडली आणि म्हणून याला धनुर्मास किंवा धुंधुरमास ही संज्ञा मिळाली.

या काळात पहाटे आणि रात्री शिशिर ऋतूतली बोचरी थंडी असते. दुपारी मात्र हळूहळू ऊन तापायला लागते. धनुर्मासात पहाटे उठून व्यायाम करायचा आणि सकाळी लवकर भरपेट जेवावचे. तेसुद्धा कसे काय? तर लोणच्याचा गोळा घातलेली, तीळ लावलेली बाजरीची भाकरी, वांगे, उसावरची पापडी, वरणा-मटार यांची लेकुरवाळी भाजी, मुगाच्या डाळीची खिचडी आणि त्यावर तूप. पचायला तुलनेने हलका, परंतु थंडीने आलेली रूक्षता कमी करणारा स्निग्ध आहार. पण सध्या फास्टफूडच्या जमान्यात होतं कसं की, भोगीच्या दिवसापुरता कसा तरी नाक मुरडत आपण हा मेनू जेवणात घेतो, पण व्यायामाचं काय? छे हो, थंडीमध्ये पहाटे पहाटे उठणार कोण? मस्त पांघरूण गुरफटून झोपायला कसली मज्जा येते! आळस टाळलं पाहिजे, असे ज्ञानेश्वर माऊली समज देतात –

“उन्हाळेनि जो न तपे । हिमवंतीं न कांपे ।
कायसेनिही न वासिपे । पातलेया ।।”
[ पवित्र श्रीज्ञानेश्वरी : अध्याय १३वा : ओवी क्र.३४७ ]

धुंधुरमास शब्द ऐकल्यावर हे म्हणजे काय? हा प्रश्न अनेकांना पडला असेल. आजच्या मुलांना ते सांगण्यासाठी हे लेख प्रयोजन आहे. आयुर्वेदानुसार मकर संक्रमणाच्या आधी हेमंत ऋतूमध्ये येणाऱ्या ह्या धनुर्मासात सामान्य लोकांचा जठराग्नी (भूक) भल्या पहाटे जागृत होतो. त्यामुळे या महिन्यात पहाटे उठून सद्या मिळणाऱ्या भाज्या, बाजरीसारखी धान्ये खाण्याचे महत्व खुप आहे. हे खाणं इतर ऋतुंमध्ये पचायला जड असलं तरी या महिन्यात-ऋतूमध्ये मात्र ‘राजस’ मानलं गेलंय. वर्षभर खाण्यातून मिळणारी ‘एनर्जी’ आपल्याला फक्त या एका महिन्यातल्या खाण्यातून मिळवता येते, येवढं याचं प्रचंड महत्व पूर्वजांकडून सांगितलं गेलंय. आत्ताच्या पिढीला हे माहिती असण्याची शक्यता कमी कारण आजकाल जिथे लोकांना मराठी महिनेच पाठ नसतात. तिथे कालनिर्णय मधेही उल्लेख नसलेला ‘धुंधुरमास’ कोण लक्षात ठेवणार? यावेळी खाण्यातली मजा आणि त्यांची सहज होणारी पचनक्रिया यांचा विचार व्हावा.
जेवणाच्या पंगतीत हमखास ऐकण्यास मिळणारा श्लोक तोच उपदेश देऊन जात असतो –

“जेवा हो जेवा पोटभर जेवा ।

गडुभर पाण्याचा आधार ठेवा ।।”

जेवणाला “अन्न हे पूर्णब्रम्ह!” म्हणत वैज्ञानिक दृष्टीकोनातून बघणाऱ्या संस्कृतीत प्राचीन कालापासून याचा विचार केला गेलाय. हे लक्षात आलं की त्याबद्दलचा आदर एक ‘फुडी’ म्हणून आजही वाढतो. काही वर्षांपर्यंत अनेक लहान गावात तसेच शहरातल्या जुन्या, प्रमुख मंदिरात काकड आरत्यांना जोडून नामवंत कीर्तनकारांची कीर्तनं व्हायची. घराघरातून सूर्याला अर्ध्य देऊन नैवेद्य दाखवून पहाटे साग्रसंगीत जेवणं व्हायची. तरीपण वैज्ञानिक आणि आध्यात्मिक दृष्टीकोन वगैरे बाजूला ठेऊन धुंधुरमासाची खरी मजा लुटायची असेल, तर एखाद्या छोट्या खेड्याला अवश्य भेट देऊन बघावं.
धनुर्मास हा मानवी शरीराला धनुष्याप्रमाणे लवचिक व काटक बनविण्यास हितकारकच ठरतो, हे विशेष !
!! लेखरुपातील ज्ञानवर्धक व अभ्यासपूर्ण माहितीसाठी वाचा फक्त ‘पुरोगामी संदेश’ !!

✒️लेखक:-श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरुजी,
(मराठी साहित्यिक व संतसाहित्याचे गाढे अभ्यासक)
मु. पोटेगावरोड, पॉवर हाऊसच्या मागे, गडचिरोली.
जि. गडचिरोली (मो. ९४२३७१४८८३)
Email – nikodekrishnakumar@gmail.com