राज्यांतर्गत पीकस्पर्धा योजना

42

🔹रब्बी हंगामातील पिकांकरीता 31 डिसेंबर पर्यंत अर्ज करा

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

चंद्रपूर(दि.15डिसेंबर):- राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती, मनोबल यामध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल, तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेऊन राज्यांतर्गत पीकस्पर्धा योजना राबविण्यात येत आहे.

पिकस्पर्धेतील पिके : या स्पर्धेमध्ये खालील पिकांचा समावेश होतो. खरीप पीके : भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, मुग, उडीद, सोयबीन, भुईमुग, सुर्यफुल. रब्बी पिके : ज्वारी, गहू, हरभरा, करडई, जवस, तीळ.
पीकस्पर्धेतील पिकाची निवड करताना पीकनिहाय तालुक्यातील क्षेत्र किमान १००० हेक्टर असावे.
स्पर्धक संख्या, पीकस्पर्धा क्षेत्र, कापणी प्रयोग घ्यावयाची संख्या : पीकस्पर्धेसाठी पुर्ण तालुका हा एक घटक आधारभूत धरण्यात येईल.

किमान स्पर्धक संख्या- सर्वसाधारण गटासाठी १० शेतकरी आणि आदिवासी गटासाठी पाच शेतकरी. पीकस्पर्धामध्ये सहभागी लाभार्थीचे शेतावर त्यापिकाखाली किमान १० आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे. पीक कापणी प्रयोग घ्यावयाची किमान संख्या- सर्वसाधारण गटासाठी पाच व आदिवासी गटासाठी चार राहील.

स्पर्धेतील भाग घेणारे शेतकरीकरिता अटी व शर्ती – पिकस्पर्धेसाठी सर्व शेतकऱ्यांना भाग घेता येईल. स्पर्धेत भाग घेतांना शेतकऱ्यांकडे त्यांच्या नावावर जमीन असली पाहिजे व जमीन तो स्वतः कसत असला पाहिजे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल.

अर्ज दाखल करण्यासाठी तारीख रब्बी हंगाम- ज्वारी , गहू , हरभरा , करडई , जवस , तीळ पिकाकरीता ३१ डिसेंबर राहील.
पीकस्पर्धा विजेते – पीकस्पर्धेत विजेत्यांना तालुका, जिल्हा, विभाग व राज्य पातळीवर बक्षीस देण्यात येणार आहे. राज्य पातळीवरील प्रथम बक्षीस 50 हजार, द्वितीय 40 हजार तर तृतीय बक्षीस 30 हजार रुपये राहणार आहे. तसेच विभाग पातळीवर अनुक्रमे 25 हजार, 20 हजार व 15 हजार, जिल्हा पातळीवर 10 हजार, सात हजार, व पाच हजार, तालुका पातळीवर पाच हजार, तीन हजार व दोन हजार रुपयाचे बक्षीस सत्कार समारंभात देण्यात येईल.

तरी वरीलप्रमाणे पीकस्पर्धेत भाग घेवू इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी विहित नमुन्यातील अर्ज प्रवेश शुल्क व सात-बारा उताऱ्यासह आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करून तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी यांचेकडे पाठवावे. अधिक माहितीसाठी संबंधीत कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी अथवा तालुका कृषी अधिकारी यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी उदय पाटील यांनी केले आहे.