आष्टी येथील ग्रामविकास अधिकारी घालतोय भ्रष्टाचारावर पांघरून !

30

🔺माहिती अधिकार कार्यकर्ते जवाहर मासीरकर यांचा आरोप

✒️आष्टी(पुरोगामी संदेश नेटवर्क)

आष्टी(दि.21डिसेंबर):– गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या आष्टी ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी इंद्रावण बारसागडे यांनी विविध विकास कामात भ्रष्टाचार केला असून यासंदर्भात विचारलेली माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहेत. भ्रष्टाचारावर पांघरून घालणा-या ग्रामविकास अधिकारी इंद्रावण बारसागडे यांचेवर कारवाई करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन माहिती अधिकार कार्यकर्ते जवाहर मासीरकर यांनी जि. प. चे मुख्य कार्यपालन अधिकारी यांचेकडे सादर केल्यामुळे प्रशासकीय यंत्रणेत खळबळ माजली आहे.

जि. प. चे मुख्य कार्यपालन अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ग्रामपंचायत कार्यालय आष्टी येथील ग्रामविकास अधिकारी इंद्रावण बारसागडे हे प्रभारी अधिकारी म्हणून ऑक्टोबर २०१८ पासुन कारभार पाहत आहेत. सादर कार्यकाळात त्यांनी नाली बांधकाम, सिमेंट रोड, ४४ नवीन दुकान गाळे, दुकान गाळ्याचे विस्तारीकरण आदी कामे करण्यात आली. झालेल्या कामाची माहिती अधिकार कार्यकर्ते जवाहर मासीरकर यांनी ग्रामविकास अधिकारी यांना माहिती माहिती मागितली असता माहिती देण्यास टाळाटाळ केली असे विविध आरोप निवेदनात केले आहे.

माहिती देण्यास टाळाटाळ करणा-या ग्रामविकास अधिकारी यांचे विरोधात द्वितीय व अंतिम अपील मा. राज्य माहिती आयुक्त यांचेकडे १२.११.२०२० व २५.११.२०२० ला सादर केले आहे. त्यामुळे सदर प्रकरण कोणती दिशा घेणार याकडे लक्ष केंद्रित झाले आहे. प्रकरण माहिती आयुक्त यांचेकडे न्यायप्रविष्ठ असून यात कुठला निकाल मिळेल ही उत्सुकता असतानाच माहिती अधिकार कार्यकर्ते जवाहर मासीरकर यांनी जि. प. चे मुख्य कार्यपालन अधिकारी यांचेकडे निवेदन सादर केल्यामुळे आता वेगळीच चर्चा सुरु आहे.