प्राण्यांबाबतच्या तक्रारी, समस्यांसाठी हेल्पलाईन व ॲप्लीकेशन कार्यान्वित करणार – उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे

31

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)मो:-9403277887

नाशिक(दि.23डिसेंबर):- जिल्ह्यातील प्राण्यांच्या संरक्षणासाठी राज्य शासनाच्या निर्देशानुसार जिल्हास्तरीय प्राणी क्लेष प्रतिबंधक समिती गठीत करण्यात आली असून या समितीच्या अंतर्गत जिल्ह्यातील प्राण्यासंदर्भातील समस्या, सूचना व तक्रारींच्या अनुषंगाने लवकरच हेल्प लाईन क्रमांक व मोबाईल ॲप्लीकेशन कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांनी सांगितले आहे.

आज निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या दालनात आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय प्राणी क्लेष प्रतिबंधक समितीच्या बैठकीत निवासी उपजिल्हाधिकारी श्री. डोईफोडे बोलत होते. यावेळी जिल्हा वन अधिकरी आनंद रेड्डी, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. बी. आर. नरवाडे, सहायक आयुक्त डॉ. जी. आर. पाटील, जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी विष्णू गरजे, पशुधन विकास अधिकारी डॉ. उज्वल पवार, डॉ. वैशाली थोरात, महानगरपालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सोनवणे, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद साळवी यांचेसह समितीचे अशासकीय सदस्य अरूण शिंदे, महेंद्र अहिरे, भारती जाधव, आशिष यमगर आदी उपस्थित होते.

निवासी उपजिल्हाधिकारी श्री. डोईफोडे म्हणाले, जिल्ह्यात दररोज प्राण्यांबाबत काही प्रमाणात घटना घडत असतात, या घटनांमध्ये अनेक वेळा निष्पाप प्राण्यांच्या जीवाला धोका निर्माण होत असतो, अशा घटनांमधून प्राण्यांचे रक्षण व्हावे यासाठी जिल्हास्तरीय प्राणी क्लेष प्रतिबंधक समितीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात यावी. त्याचप्रमाणे या समितीमधील सर्व शासकीय व अशासकीय सदस्यांनी समन्वयाने प्राणी संरक्षणाच्या दृष्टिने कामाचे नियोजन करावे, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी श्री. डोईफोडे यांनी दिल्या आहेत.

वाहतुकी दरम्यान प्राण्यांना होणाऱ्या वेदना, बाजारपेठेत प्राण्यांची चढउतार करण्यासाठी चबुतऱ्यांची निर्मीती करणे, आजारी, वृद्ध, जखमी, पशूंची सोय करण्यासाठी जिल्ह्यातील पशुंचा निवारा, पाण्याची सोय, पांजरापोळची सोय करणे यासोबत प्राण्यांसाठी मूलभूत बाबी लक्षात घेऊन त्यावर कार्यवाही करावी, असेही निवासी उपजिल्हाधिकारी श्री. डोईफोडे यांनी सांगितले.

जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. नरवाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गठीत करण्यात आलेल्या समितीमध्ये गौरव क्षत्रिय, श्रीमती भारती जाधव, श्रीमती शरण्या शेट्टी, महेंद्र अहिरे, निलेश इंगळे, आशिष यमगर आणि अरुण शिंदे यांची अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच जिल्हास्तरीय प्राणी क्लेष प्रतिबंधक समितीचे कार्ये, उद्दिष्टे आणि जबाबदाऱ्या यांची माहितीही डॉ. नरवाडे यांनी दिली आहे.