गलाई बांधवांच्या सोबत महाराष्ट्र सरकार का उभे रहात नाही ?

26

🔸सराफा व्यावसायिकांची समस्या

✒️लेखक:-दत्तकुमार खंडागळे(संपादक वज्रधारी)मो:-9561551006

खानापुर-आटपाडी भागातल्या काही सराफांना आंतरराष्ट्रीय सोने तस्करी प्रकरणी एनआयच्या नोटीसी आल्या आहेत. या प्रकरणात काय तथ्य आहे, किती तथ्य आहे ? यात कोण कोण दोषी आहेत ? या गोष्टी तपासात पुढे येतील, दोषींवर कारवाई होईल हा भाग वेगळा. पण अशा अनेक खोट्या प्रकरणात निर्दोष गलाईबांधवांना पोलिसांचा नाहक त्रास होतो. परप्रांतीय पोलिस आणि ब-याचवेळा स्थानिक पोलिसही गलाईबांधवांना लुटत असतात, लुबाडत असतात. गलाईबांधवांच्या मागचा हा पोलिसी ससेमिरा आणि छळ कधी संपणार आहे का ? महराष्ट्र सरकार याबाबत गलाईबांधवांच्या पाठीशी उभे राहणार आहे का ? त्यांना या छळापासून मुक्त करणार आहे का ? गलाईबांधवांना कायदेशीर संरक्षणाचे कवच देणार आहे का ? असे अनेक प्रश्न या निमित्ताने चव्हाट्यावर आले आहेत.

खानापुर, आटपाडी, तासगाव, पलुस, कडेगाव, कवठेमहंकाळ व खटाव या सात तालुक्यातील लाखो लोक भारतभर गलाई व्यवसायाच्या निमित्ताने विखुरले आहेत. सुमारे शंभर वर्षाहून अधिक वर्षे हे लोक या व्यवसायात आहेत. परप्रांतात जावून, तिथली भाषा, तिथली संस्कृती आपलासी करून या लोकांनी तिथे स्वत:चा व्यवसाय उभा केला आहे. प्रचंड मेहनत, कष्ट व जिद्दीच्या जोरावर परमुलूखात आपले बस्तान बसवले आहे. भारताच्या काना-कोप-यात हा मराठी बांधव सचोटीने व्यवसाय करतो आहे. अटकेपार गेलेल्या मराठ्यांचा ख-या अर्थाने वारसा याच लोकांनी चालवला आहे.

मराठी माणसाला धंदा करता येत नाही हा समज साफ खोटा ठरवत या गलाईबांधवांनी संपुर्ण भारत व्यापलाच आहे पण दुबई, नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश आदी देशातही आपला व्यवसाय थाटला आहे. खरेतर ही माणसं महाराष्ट्र सरकारसाठी अभिमानाचा व गौरवाचा विषय आहेत. त्यांची सरकारने दखल घेवून त्यांचा गौरव करायला हवा. आपला मराठी माणूस इतक्या सचोटीने व ताकदीने एखाद्या व्यवसायात आपली मक्तेदारी निर्माण करू शकतो हेच या लोकांनी दाखवून दिले आहे. याच कर्तबगार लोकांनी केवळ व्यवसाय करून स्वत:चे घर सक्षम केले नाही तर त्यांनी आपला भागही सक्षम केला. आपली माणसं खंबीरपणे उभी केली. त्यांच्या कामातून सांगली व सातारा जिल्ह्यातील सात-आठ तालुके आत्मनिर्भर केले आहेत. गलाईबांधव नसते तर या भागातल्या लोकांच्यावर चो-या-मा-या करायची किंवा मोल-मजुरीसाठी स्थलांतरीत व्हायची वेळ आली असती.

पण या गलाईबांधवांच्यामुळेच आज या भागातली माणसं माणसात आहेत. आपल्याच गावात सुखाने पोटभर खातायत. आपल्या गावावर, आपल्या भागावर किंवा मराठी मुलूखावर संकट आले की ही माणसं धावून येतात. गावासाठी, भागासाठी संकटमोचक होतात. पुर आला, भुकंप झाला, सुनामी आली प्रत्येकवेळी ही माणसं देव म्हणून मदतीला धावली आहेत. इतरांच्या मदतीसाठी पुढे आली आहेत. कोरोनाच्या व लॉकडाऊनच्या काळात या लोकांनी किमान एक-दिड कोटीची मदत केली असेल. आपल्या गावासाठी, भागासाठी संकटमोचक असणा-या या गलाईबांधवांच्यासाठी आपण काय योगदान देणार आहोत ? त्यांच्यावरील संकटात त्यांच्यासोबत उभे राहणार आहोत का ? हा खरा प्रश्न आहे.

गेल्या काही वर्षात ही माणसं आणि त्यांचा व्यवसाय संकटात आहे. हा व्यवसाय आणि हे लोक संक्रमण अवस्थेतून जात आहेत. परप्रांतात काम करणा-या, तिथली संस्कृती जपत तिथे मराठी संस्कृतीचा झेंडा फडकवणा-या या लोकांना तिथले स्थानिक पोलिस खोटे गुन्हे दाखल करून छळतात. कुणीही चोर उठतो, या लोकांच्याकडे बोट दाखवतो आणि मग ते पोलिस या लोकांना उचलून नेतात, मारहाण करतात. त्यांच्याकडून मनमानी पैसे उकळतात. पैशासाठी त्यांचा शाररिक व मानसिक छळ करतात. एखाद दुस-या प्रकरणात एखादा माणूस दोषी असेलही पण बहूतेकवेळा त्या चोरांची आणि पोलिसांची छुपी युती असते. ते जाणिवपुर्वक या लोकांचे नाव घ्यायला लावतात. त्यांच्या विरूध्द तक्रार करायला लावतात. त्यांच्या दुकानावर धाडी घालतात. त्यांना अटक करून त्यांचा छळ करतात. पैसे उकळण्यासाठी बेकायदा डांबून ठेवतात. गेली अनेक वर्षे हा छळ हे गलाईबांधव निमुटपणे सोसत आहेत.

या पोलिसांच्या छळामुळे आत्महत्या करायची वेळ अनेकांच्यावर आली. अनेकांनी मेहनतीने साधलेली प्रगती मातीमोल झाली. अनेकजण या पोलिसी कारस्थानात उध्वस्त झाले पण बोलणार कोणाला ? आपली व्यथा सांगणार कोणाला ? अशी या लोकांची अवस्था आहे. गावाकडचे, भागातले नेते या लोकांच्याकडे फक्त राजकीय भांडवल, गि-हाईक म्हणून पाहतात. स्वत:च्या राजकारणासाठी व स्वत:चे राजकीय दुकान चालवण्यासाठी या लोकांचा वापर करतात. त्यांच्या स्वत:च्या संस्था मोठ्या करण्यासाठी उकळपट्टीचे साधन म्हणून त्यांच्याकडे पाहतात. पण गलाईबांधवांचे प्रश्न काय आहेत ? त्यांच्या मुलभूत समस्या काय आहेत ? ते कसे सुटले पाहिजेत ? यावर हे नेते कधीच काम करत नाहीत. आपल्या गावासाठी, भागासाठी व राज्यासाठी मोठे योगदान देणा-या गलाईबांधवांची या छळातून कायमची सुटका होणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रयत्न व्हायला पाहिजेत.

महाराष्ट्र सरकारने या लोकांसाठी काम करणारे, त्यांच्या समस्या सोडवणारे एखादे महामंडळ निर्माण करायला हवे. दोन राज्यात मिळून एखादे समन्वय मंडळ स्थापन करावे. या समन्वय मंडळावर तिथले स्थानिक व मराठी आयपीएस अधिकारी तसेच गलाईबांधवांचे काही प्रतिनिधी नेमावेत. या तक्रारींची या समन्वय मंडळामार्फत तटस्थपणे चौकशी करूनच गुन्हे दाखल करण्यास परवानगी द्यावी. खोटे तक्रारदार उभे करून उठसुठ कुणालाही अटक करायचे, उचलून न्यायचे आणि त्यांची लुबाडणूक करायची हे बंद झाले पाहिजे. या माणसांना कुणी वाली आहे की नाही ? बांगलादेशी, नेपाळी माणूस आपल्या देशात येतो, सुखाने व सुरक्षित राहतो. त्याला काही त्रास होत नाही पण आपलीच माणसं, आपल्याच देशातली माणसं अशी लुटली जातात, छळली जातात पण त्याचे कुणालाच काही वाटत नाही. हे लाजिरवाणे नाही का ? यापेक्षा लाजिरवाणी बाब ही की या लोकांना पुण्यातही कस्टमचे पोलिस लुटतात. गावाकडचे पोलिसही लुटतात. म्हणजे या लोकांच्या वाट्याला तिकडेही तेच आणि इकडेही तेच. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी या लोकांसाठी भरीव काम करावे. या लोकांना सरकार म्हणून पाठबळ द्यावे. त्यांचा पाठीराखा व्हावे. कारण ही माणसं केवळ स्वत: मोठी होत नाहीत तर महाराष्ट्र मोठा करतायत. महाराष्ट्राचे जेष्ठ नेते शरद पवार, बच्चू कडू, जयंत पाटील, विश्वजीत या मंत्र्यांना गलाईबांधव माहिती आहेत. पवार साहेब आणि या लोकांच्यांत ऋणानुबंध आहेत. त्यामुळे या नेतेमंडळींनी गलाईबांधवांचा छळ आणि लुट थांबवावी. त्यांच्यासोबत मराठी माणूस व महाराष्ट्र सरकारने उभे रहावे.