अनैतिक संबंधास विरोध करणाऱ्या मुलाचा खून करणाऱ्या जन्मदात्या आईला अटक प्रियकर फरार

29

🔺माढा तालुक्यातील परितेवाडी येथील घटना

✒️नागेश खूपसे(सोलापूर प्रतिनिधी)मो:-7775096293

सोलापूर(दि.27डिसेंबर):-परिते (ता.माढा) येथे खून करून मृतदेह चारीत फेकून दिलेल्या तरुणाच्या खुनाचा छडा टेंभुर्णी पोलिसांनी अवघ्या काही तासात लावला असून प्रियकराच्या मदतीने आईनेच मुलाचा खून केल्याचे उघड झाले आहे.या खून प्रकरणी टेंभुर्णी पोलिसांनी जन्मदात्या आईस बेड्या ठोकल्या असून माढा न्यायालयाने तिला तीन दिवसांची पोलीस ठोठावली आहे तर प्रियकर फरार झाला आहे.

मुक्ताबाई सुभाष जाधव (वय-४५ वर्ष)रा.परितेवाडी ता.माढा असे मुलाच्या खुनप्रकरणी अटक केलेल्या अभागी मातेचे नाव असून सिद्धेश्वर सुभाष जाधव (वय-२२ वर्ष ) रा.परितेवाडी असे या खून झालेल्या दुर्दैवी मुलाचे नाव आहे.तर तात्या कदम असे फरार झालेल्या दुसऱ्या आरोपीचे नाव आहे.या खळबळजनक खून प्रकरणाची अधिक माहिती अशी की,शुक्रवारी दुपारी ३.३० वा.परितेवाडी शिवारात माळावर चारीत एका तरुणांचा तीक्ष्ण हत्याराने वार करून खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी चारीत फेकून दिलेला मृतदेह महेश सुरेश शिंदे यास प्रथम दिसून आला होता.

या खुनाच्या घटनेने परितेवाडी,परिते परिसरात एकच खळबळ उडाली होती.ही माहिती कळताच तेथे बघण्यास आलेल्या पोपटभाई,दादा सुरवसे यांनी तो मृतदेह गावातील सिद्धेश्वर सुभाष जाधव याचाच असल्याचे ओळखले होते.परितेवाडीचे पोलीस पाटील जिंदास बाळू हराळे (वय-३१) यांनी टेंभुर्णी पोलिसांना या खुनाची माहिती देताच या ठिकाणी सपोनि अमित शितोळे यांनी भेट देऊन रीतसर पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदन करण्यासाठी टेंभूर्णी आरोग्य केंद्रात दाखल केला.खून प्रकरणी शुक्रवारी रात्री उशिरा टेंभुर्णी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान सपोनि अमित शितोळे यांनी गुप्त महितीगाराकडून खुनाची माहिती घेऊन संशयित आरोपी म्हणून मयत सिद्धेश्वर जाधव यांच्या आईस मुक्ताबाई सुभाष जाधव (वय-४५) रा.परितेवाडी हिस ताब्यात घेत खून उघडकीस आल्यानंतर काही तासात खुनाचा छडा लावला.हा खून अनैतिक संबंधातून करण्यात आला असून मयत सिद्धेश्वर जाधव यांची आई मुक्ताबाई हिचे व गावातील तात्या कदम यांचे बरोबर अनैतिक संबंध होते.तसेच सिद्धेश्वर हा या अनैतिक संबंधास विरोध करीत असल्याने त्याचा मुक्ताबाई जाधव व तिचा प्रियकर तात्या कदम यांनी संगनमत करून रात्रीच्या सुमारास काटा काढला आहे अशी प्राथमिक माहिती समोर आली असल्याचे सपोनि अमित शितोळे यांनी सांगितले.खून झालेल्या ठिकाणास करमाळा उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.विशाल हिरे यांनी भेट देऊन तापासा बाबत सूचना दिल्या.फरार आरोपी तात्या कदम याचा टेंभुर्णी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

मुक्ताबाई सुभाष जाधव हिस शनिवारी दुपारी माढा येथील वरिष्ठ स्तर न्यायाधीश एस.एस.सय्यद यांच्या समोर उ भे केले असता २९ डिसेंबर पर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या खुनाचा अधिक तपास सपोनि अमित शितोळे हे करीत आहेत.