कुंडलवाडी शहरातील आठवडी बाजारात मोबाईल चोरट्यांचा सुळसुळाट

29

🔺स्थानिक पोलीसांचे साफ दुर्लक्ष

✒️अशोक हाके(बिलोली,तालुका प्रतिनिधी)मो:-9970631332

बिलोली(दि.27डिसेंबर):-तालुक्यातील कुंडलवाडी शहरातील आठवडी बाजारात मोबाईल चोरट्यांचा सध्या सुळसुळाट झाला आहे. त्याचबरोबर पाकीटमारी व पर्स लांबविण्याचे प्रकार सुरू आहेत.या प्रकाराने नागरिक चांगलेच धास्तावले आहेत.बाजारातील गर्दीचा फायदा घेत नागरिकांच्या खिशावर देखील चोरटे डल्ला मारीत आहेत.कुंडलवाडी हे बिलोली तालुक्यातील सर्वात मोठे शहर असुन येथे आठवड्यात मंगळवार व शुक्रवार असे दोन दिवस बाजार भरतो.तेलगंणाच्या सीमेवर शहर असल्याने परिसरातील १० ते १५ गावातील नागरिकांचा दररोज कुंडलवाडी शहराशी संपर्क येतो.तसेच बाजारात भाजीपाला, कपडे,फळे,धान्य व विविध वस्तुंचे विक्रेते मोठ्या प्रमाणात येतात.

यामुळे आठवडी बाजारात मोठी गर्दी असते याच गर्दीचा फायदा चोरटे घेत गत महिनाभरापासून आठवडी बाजारात मोबाईल चोरी,पाकीटमारी च्या घटनांत वाढ झाली आहे.विशेष म्हणजे मोबाईल चोरटे इतके तरबेज आहेत की,मोबाईल हातात पडताच मोबाईल स्वीच आँफ करून ठेवतात.इकडेतिकडे चौकशी करेपर्यंत गर्दीचा फायदा घेत चोरटे पसार होत आहेत.दि.२५ डिसेंबर रोजी भरलेल्या आठवडी बाजारात पाटोदा(थडी ) येथील हौसाजी दत्तराम बोमले हे भाजी आणण्यासाठी आले असता त्यांच्या खिशातील १५ हजार किमतीचा स्मार्ट फोन चोरट्यांनी पळविल्याची घटना घडली आहे.

मोबाईल चोरीचे कसे प्रकार दर आठवडी बाजारात घडत आहेत. आठवडी बाजारात पोलीसांची गस्त असणे आवश्यक आहे.याकडे पोलीसांचे मात्र दुर्लक्ष होत आहे.पोलीसांचे झंझट नको म्हणून नागरिक तक्रारी करण्याकडे कानाडोळा करीत असुन मोबाईल चोरीमुळे बाजारासाठी येणारे नागरिक वैतागले आहेत.पोलिसांनी बाजारपेठेत मोबाईल चोरणा-या चोरट्यांच्या मुसक्या आवळाव्यात अशी मागणी नागरिकांनी केली आहे.याचबरोबर बाजारात जाताना नागरिकांनीही सावधानता बाळगण्याची गरज आहे.