गडचिरोलीमधील आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना मिळणार सेंट्रल किचनद्वारे जेवण

25

✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क)

मुंबई(दि.27डिसेंबर):- गडचिरोलीतील शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना सकस, चांगल्या प्रतीचे व पौष्टिक आरोग्यदायी जेवण मिळावे, यासाठी आदिवासी विकास विभागाने गडचिरोलीमध्ये मध्यवर्ती स्वयंपाकगृह (सेंट्रल किचन) उभारण्यात येणार आहे. टाटा ट्रस्ट व बीपीसीएल यांच्या सहकार्याने सुमारे पाच हजार जणांसाठी जेवण बनविण्याची सोय येथे होणार आहे.

ग्रामीण भागात असणाऱ्या शासकीय आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे आणि पोषणमूल्य असलेले जेवण उपलब्ध व्हावे यासाठी आदिवासी विकास विभागाने हा निर्णय घेतला आहे. यापूर्वी ठाणे, डहाणू येथे मध्यवर्ती स्वयंपाकगृह सुरू करण्यात आले होते.

त्याच धर्तीवर गडचिरोलीमध्ये हे स्वयंपाकगृह उभारण्यात येणार आहे. या ठिकाणी एका वेळी 5 हजार व्यक्तीसाठी जेवण बनविण्याची क्षमता असलेले अद्ययावत स्वयांपाकगृह उभारण्यात येईल. या स्वयंपाकगृहाचा लाभ परिसरातील 11 आश्रमशाळांमधील व 14 वसतिगृहातील सुमारे 4 हजार 750 विद्यार्थ्यांना होणार आहे. यामध्ये नाष्टा, दोन वेळेचे जेवण व अल्पोपहार तयार करण्यात येईल. हे अन्न विशेष वाहनांच्या माध्यमातून 60 किमी परिसरातील शासकीय आश्रमशाळा, इंग्रजी माध्यमाच्या शाळा, वसतीगृहे यांना पुरविण्यात येणार आहे.

या स्वयंपाकगृहातील कर्मचाऱ्यांना टाटा ट्रस्टच्या वतीने प्रशिक्षण देण्यात येणार आहे. स्वयंपाकगृह उभारणीचा सर्व भांडवली खर्च हा टाटा ट्रस्ट व बीपीसीएल यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधी (सीएसआर) मधून करण्यात येणार आहे. या मध्यवर्ती स्वयंपाकगृहाचे कामकाज चालविण्यासाठी आदिवासी विकास विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली सुकाणू समिती आणि आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली संनियंत्रण समितीची स्थापना करण्यात येणार आहे