वाचूनी इतिहासाला,
स्वातंत्र्याचा अर्थ खरा मग
कळेल अक्षराला..!
तिच्या प्रयत्ने आम्हा लाभली
अमृताची वाणी
वंदन तिजला करुया आपण सारे कर जोडूनी आता

स्रियांची युगायुगाची गुलामगिरीची बेडी तोडणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन हा प्रत्येक स्रीसाठी तिचं माणूसपण सन्मानाने मिरवणारा उत्सवच म्हणावा लागेल.सावित्रीबाईंचे चरित्र ,कार्य समजून घेणे म्हणजे स्वतःच्या आस्तित्वाचे उत्खनन करणे होय.सावित्रीमाईंनी आयुष्यभर पती महात्मा जोतीराव फुले यांच्या खांद्याला खांदा लावून सत्यशोधकी बाण्याने स्री,शुद्र,शुद्रातीशुद्र यांच्या उद्धारासाठी कार्य केले त्याची इतिहासात तोडच नाही.आज २१ व्या शतकात स्रीया प्रत्येक क्षेत्रात उत्तुंग झेप घेत आहेत त्याचे श्रेय जाते ते या विद्येच्या देवीला!

सावित्रीबाई फुले यांचा जन्म खंडोजी व लक्ष्मीबाई या दांपत्याच्या पोटी सातारा येथील नायगाव येथे ३जानेवारी १८३१ मध्ये झाला.त्या काळाच्या प्रथेनुसार वयाच्या ९ व्या वर्षी जोतीराव फुले यांच्याशी १८४० साली मोठ्या थाटामाटात संपन्न झाले.जोतीरावांचे वय हे १३ वर्षांचे होते.जोतीरावांच्या सानिध्यातच या हिऱ्याला पैलू पडण्याचे कार्य घडले.जोतीबा फुले यांनी १ जानेवारी १८४८ रोजी पूणे येथे भिडेवाड्यात मुलींसाठी पहिली शाळा काढली.ही बाब वाटती तितकी सोपी निश्चितच नव्हती.कारण तो काळ होता मनुस्मृतीचे जाचक कायदे असलेला. “नारी,ढोर,गवार,शुद्र सकल ताडण के अधिकारी” हे वचन माणणारा.

अज्ञान,रुढी,परंपरांनी बरबटलेल्या समाजातून स्रीयांची स्थिती सुधारायची असल्यास शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे महात्मा फुलेंनी ओळखले होते.समाजपरिवर्तन करायचे तर त्याची सुरुवात घरापासूनच करुन सावित्रीबाईंना शिक्षण देण्यास प्रारंभ केला.धरणीमातेवर गवताच्या काडीने अक्षरलेखणाची सुरुवात झाली. “स्री शिकली तर त्याच अक्षरांच्या अळ्या होवून पतीच्या ताटात पडतात,पती लवकर मरतो.धर्म बुडतो” असा तथाकथित समज जनमानसावर होता.अशा परिस्थितीत स्वतः शिकून ज्ञानदानाचा वसा घेतला व परिणामी पहिली स्री शिक्षिका संपूर्ण भारताला लाभली.शिक्षणकार्याचा प्रसार हे तर मोठे दिव्यच होते.

शिव्यांची लाखोली पचवीत,शेण,दगडाचा मारा सहन करत त्यालाच समाजाने उधळलेली फुले समजणे याला विशाल अंतःकरणच लागते.सावित्रीमाईंच्या अंगी असलेल्या जिज्ञासा,चिकाटी या गुणांमुळेच त्या शिकू शकल्या. बालपणी शिरवळच्या बाजारात भेट म्हणून मिळालेले ख्रिस्तचरीत्रातील चित्रेच तेवढी समजतात.अक्षरे वाचता येत नाहीत.ही खंत त्यांना होती.या जिज्ञासेतून जोतीरावांनी शिक्षणाचा प्रस्ताव ठेवल्यावर शिकण्यास साह्यभूत ठरली.सावित्रीबाई फुले या केवळ शिक्षिकाच नव्हत्या तर शिक्षणतज्ञही होत्या.आनंददायी शिक्षणाची मुहूर्तमेढ त्यांनीच रोवली.मुलांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी आज सुरु असलेली शालेय पोषण आहार योजना त्या काळी त्यांच्या शाळांमधे मुलांना गोड-धोड देवून चालवत होत्या.अवघ्या सहा मुलींपासून सुरु झालेली शाळा अनेक अडचणींवर मात करत वाढू लागली.विधवा,परित्यक्ता स्रियांसाठी घरी जावून रात्री प्रौढ साक्षरता वर्ग चालवत.

पतीच्या निधनानंतर सती जाण्याची अघोरी प्रथा त्या काळात होती.सती जाणे किंवा समाजमान्य हालआपेष्टा सहन करणे याच्याशिवाय पर्याय नसे.स्रियांना या विरुद्ध संघटित करुन दुःखाला सामुदायिक वाचा फोडली. त्याकरीता त्यांनी पतीला आग्रह धरला व त्याचाच परिणाम म्हणून १८६५ साली पूण्यात नाव्ह्यांचा संप घडला. फसवणूक झालेली ब्राम्हण समाजातील विधवा काशीबाई हिचे बाळंतपण करुन तिचा मुलगा यशवंत यास दत्तक घेवून मोठ्या मायेने त्याचे संगोपन केले.त्याला उच्च शिक्षण देवून डाॕक्टर घडविले.सावीत्रीमाई जोतीबांसोबत केवळ अंधपणे कार्य करत नव्हत्या तर त्या कार्यावर त्यांची ठाम निष्ठा होती.त्यामूळेच इतिहास बदलाचे क्रांतिकारी कार्य पन्नास वर्ष सातत्याने करु शकल्या.त्यांनी स्रीयांची संघटना स्थापून प्रौढ स्रीयांचे शिक्षण,कुमारी माता,परित्यक्ता,विधवा विवाह,बालहत्या,बालाजरठ विवाह,अस्पृश्यतानिवारण अशा अनेक विषयांवर भरीव कार्य केले.

सावित्रीबाई फुले यांना स्वतंत्र प्रतिभेची देण होती. कवितांमधून त्या स्वतःच्या भावना शब्दबद्ध करत.त्यांच साहित्य हे स्वप्नरंजन करणारं नव्हतं तर समाजाचे ज्वलंत विषय अधोरेखीत करणारे होते.काव्यफुले व बावन्नकशी सुबोध रत्नाकर हे त्यांचे काव्यसंग्रह प्रकाशित आहेत. केशवसुतांच्याही आधी ३०-३५ वर्षे त्यांनी कविता रचल्यात त्यामुळे आद्यकवयित्री त्याच आहेत.त्यांच्या कवितांमधे निसर्गाबद्दल अतोनात प्रेम,जोतीरावांविषयी कृतज्ञता, अंधश्रद्धेवर प्रहार,शिक्षणाचे महत्त्व हे विषय आहेत.

‘विद्या हे धन आहे रे,श्रेष्ठ साऱ्या धनाहून
तिचा साठा जयापाशी,ज्ञानी तो मानती जन’

महात्मा फुलेंच्या मृत्युप्रसंगी तर त्यांच्यातील पराकोटीचे धारिष्ट्य दिसून येते.दत्तक मुलगा यशवंतला भावकीतील मंडळींनी विधी करण्यास विरोध दर्शविल्यावर सावित्रीबाई स्वतः यशवंतचा हात धरुन टिटवे धरुन गेल्या व जोतीरावांना अग्नी दिला.जोतीरावांना कायम सावलीप्रमाणे साथ देणाऱ्या सावित्रीबाई आदर्श समताधिष्टित सहजीवणाचे उच्चतम प्रतिकच आहेत.जोतीरावांच्या मृत्युनंतर सत्यशोधक समाजाची धूरा त्यांनी समर्थपणे पेलली.फूले दांपत्याची सांपत्तिक स्थिती खूपच चांगली होती.स्वतःजवळील संपत्ती त्यांनी सामाजिक व शैक्षणिक सुधारणेच्या कामी खर्च केली.त्यामुळे जीवनाच्या उत्तरार्धात आर्थिक अडाचणींची झळही सोसावी लागली.

महात्मा फुलेंच्या मृत्युनंतर बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी सावित्रीमाईंना वैयक्तिक खर्चासाठी दरमहा पन्नास रुपये सुरु केले होते.परंतू या माऊलीने स्वतःचा विचार न करता ती रक्कम सत्यशोधक समाजाच्या कार्यासाठी वापरली.शेवटच्या श्वासापर्यंत दीनदूबळ्यांची सेवा करत असतांना प्लेगच्या साथीत प्राणज्योत मालवली.महाराष्ट्र शासनाने नुकताच ३ जानेवारी हा दिवस ‘महिला शिक्षण दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.ही स्वागतार्ह बाब आहे.परंतु त्यांचे कार्य हे फक्त तेवढ्याच परीघात संकुचित होवू नये असे वाटते. सावित्रीबाईंची जयंती दरवर्षी येईल व जाईलही पण त्यातून ध्येय आणि हेतू कळाला पाहिजे.आजच्या प्रश्नांची यादी लक्षात घेवून त्या प्रश्नांवर सावित्रीमाईंसारखे उपाय शोधता यायला हवेत तरच खऱ्या अर्थाने त्यांना आदरांजली ठरेल. सावित्रीमाईंनी आपल्याला शिक्षणाचा वसा दिलाय!तो घेवून आपण पुढे जात आहोत का?त्यांनी दिलेल्या शिक्षणाचा उपयोग आपण कसा करतोय?हेही यानिमित्ताने तपासायला हवे.

आपल्याला पोथी,पुराणे वाचता यावी हा उद्देश नक्कीच नव्हता तर वाचलेल्या प्रत्येक गोष्टीची चिकित्सा करता यावी इतका व्यापक होता.सुनिता विल्यम्स,कल्पना चावला यांसारख्या अनेक कतृत्वशाली महिला विज्ञानाची कास धरुनच पुढे जावू शकल्या. यानिमित्ताने क्रांतीज्योती होता आलं नाही तरी त्या दिव्य तेजाचे एक किरण नक्कीच होवू असा विश्वास आपण बाळगू.

✒️लेखिका:-श्रीमती ज्योती थोटे-गुळवणे,
9850211943
अंबड,जि,जालना.

महाराष्ट्र, लेख, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED