आपल्या अधीनस्थ कर्मचाऱ्यांच्या हातून पोलीस चौकीचे उदघाटन करणाऱ्या पोलीस अधीक्षक सौ तेजस्वी सातपुते यांना त्रिवार सॅल्युटच…

42

आदर्श IAS व IPS कसे असावेत,याचा निबंध लिहून, कथा ,गोष्टी सांगून अथवा मार्गदर्शन करून किंवा पेपरबाजी करून अथवा फोटोसेशन करून कधीच जनतेला अथवा आपल्या सहकाऱ्यांना कोणीही सांगूच शकत नाहीत, परंतु आपल्या एखाद्या छोट्याशा कृतीतून देखील बॉर्न IPS व IAS हे समाजासमोर , आपल्या सहकार्‍यांच्या समोर आदर्श ठेवत असतात. असाच विलक्षण सुखद अनुभव बार्शी तालुका पोलिस स्टेशनचे वरिष्ठ ASI दिलीप शंकर ठोंगे साहेब यांनी आणि तेथे उदघाटन प्रसंगी जमलेल्या सर्व पोलिस कर्मचारी , अधिकारी आणि नागरिकांनी अनुभवला .

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुका पोलीस स्टेशन अनेकांच्या प्रयत्नाने दिनांक 1 मे 2018 रोजी पांडे चौक येथील जुन्या इमारतीमध्ये सुरू झाले . सोलापूर ग्रामीणचे तत्कालीन पोलिस अधीक्षक श्री विरेश प्रभू साहेब यांच्या अथक प्रयत्नातून व पाठपुराव्यातून सुरू झालेले हे पोलीस स्टेशन त्यानंतर चांगल्या पद्धतीने कार्यरत झाले होते . परंतु त्या पोलीस स्टेशनची इमारत ही मोडकळीला आली आणि नागरिकांच्या, कर्मचाऱ्यांच्या व अधिकाऱ्यांच्या पाठपुराव्यामुळे प्रशासनाने, बार्शी येथील नागोबाचीवाडी मधील कांदलगाव बायपास चौक येथे एक खासगी जागा भाड्याने घेऊन त्या ठिकाणी ते पोलीस स्टेशन 1 जानेवारी 2021 ला स्थलांतर केले . हे पोलीस स्टेशन 2018 ला चालू होताना जे कर्मचारी -अधिकारी होते, त्यातील अनेक कर्मचारी -अधिकारी हे एक जानेवारी 2021 रोजी, नव्या जागेचे स्थलांतर करताना देखील होते.

दिनांक 1 जानेवारी 2021 रोजी सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक सौ तेजस्वी सातपुते मॅडम या दुपारी दीडच्या सुमारास बार्शी तालुका पोलीस स्टेशन चे उदघाटन करण्यासाठी बायपास रोड जवळील उदघाटन स्थळी आल्या , नियमाप्रमाणे अपेक्षेप्रमाणे आणि परंपरेप्रमाणे सर्व अधिकाऱ्यांनी, वरिष्ठ अधिकारी म्हणून तेजस्वी सातपूते मॅडम यांच्या हस्ते उदघाटन करण्याचे योजिले होते .परंतु काही व्यक्तिमत्वे ही आपल्याला न समजणारी व त्यांच्या मनाचा व विचाराचा अंदाज दुसर्यांना घेता येणार नाही अशी असतात , अशाच बॉर्न आयपीएस सातपुते मॅडम या अचानक धक्कातंत्र देण्यामध्ये माहीर आहेत.

त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी अशी धक्कातंत्रे बरीच दिलेली आहेत. त्यामुळे काहींना सुखद तर काहींना आश्चर्याचे धक्के बसले आहेत. बार्शी तालुका पोलीस स्टेशनच्या उदघाटन प्रसंगी अधिकाऱ्यांनी उदघाटनासाठी मॅडमकडे विनंती करताच, मॅडमनी तेथे उपस्थित असलेल्या वरिष्ठ ASI कर्मचाऱ्याला पाचारण केले आणि त्यांच्या हातून उदघाटनाची फीत कापून , त्या तालुका पोलीस स्टेशन चे उदघाटन केले. वास्तविक तेथील सर्वांचा विचार हा मॅडमनी चौकीचे उदघाटन करावे असाच होता, त्यांना ते अपेक्षित देखील होते, परंतु धक्का तंत्रात माहीर असलेल्या सोलापूर ग्रामीण च्या पोलीस अधीक्षक सौ तेजस्वी सातपुते मॅडम यांनी एक जानेवारी 2021 रोजी तेथील सर्वांना आणि संपूर्ण पोलिस खात्याला देखील एक सुखद आश्चर्याचा धक्का दिला आणि आपल्या सहकारी कर्मचाऱ्याला त्यांनी उदघाटनाचा मान देऊन सर्वांनाच आश्चर्यचकित केले.

हे तीच व्यक्तिमत्वे करू शकतात जी व्यक्तिमत्वे समाजाचा, कामाचा आणि सर्वात दुर्बल घटकांचा विचार करतात आणि आपल्या बरोबर काम करणाऱ्या प्रत्येक प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा- अधिकाऱ्यांचा , लोकांचा मान करतात आणि मान राखतात. वास्तविक सातपूते मॅडम यांना त्यांच्या आयुष्यात अशी पोलीस स्टेशनचे बरीच उदघाटन करायला मिळतील व मिळणार आहेत, परंतु त्या ASI ठोंगे यांच्या बाजूने विचार केला तर …………..….तर ते केव्हाही इतक्या मोठ्या मानाचा विचारच करू शकत नाहीत, त्यांच्या आयुष्यात सर्वात मोठा मान सन्मान हा त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आज त्यांना दिला होता आणि हे खूप उत्तम उदाहरण, संवेदनक्षम व्यक्तिमत्व असलेल्या तेजस्वी सातपुते मॅडम यांनी समाजासमोर ठेवले आहे .यापुढे ठोंगे साहेब हा क्षण आणि मॅडमनी दिलेला सन्मान केव्हाही विसरुच शकणार नाहीत. आपल्या सहकार्‍यांचा आदर करणे त्यांना मान देणे हे करण्यासाठी उच्च कोटीची विचारधारा व मन लागते ते नक्कीच मॅडमनी पुन्हा सिद्ध केले. त्यामुळेच सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक सौ तेजस्वी सातपुते यांना त्रिवार सॅल्यूटच …

सौ तेजस्वी सातपुते मॅडम यांना व संपूर्ण पोलिस खात्याला नवीन वर्षाच्या शुभेच्छा आणि सातपूते मॅडमची कारकिर्द अशीच बहरत जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना

✒️लेखक:-दीनानाथ काटकर
( माहिती अधिकार कार्यकर्ता -मोबाईल-9423332056)
(बार्शी, जिल्हा सोलापूर)