✒️दुर्गा अंकुबाई मल्लू गुडीलू
सामाजिक कार्यकर्ती

३ जानेवारी सावित्री बाई यांचा जन्म दिवस.हा सर्व स्त्री पुरुषांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा दिवस.वेगवेगळ्या क्षेत्रात आज अनेक महिला आपली वेगळी ओळख बनवीत आहेत त्या केवळ सावित्री बाई मुळेच.जोतिबा आणि सावित्री बाई नी स्त्री शिक्षणाचे बीज त्या काळात रोवले नसते तर मी ज्या समाजातून आलेली आहे त्या समाजातील स्त्री कधीच या व्यवस्थे मध्ये उभी राहू शकली नसती.जोतिबा सावित्रीच्या सोबत भक्कमपणे उभे राहिले आणि सावित्री बाईंनी पुढचा इतिहास रचला.त्या सावित्री बाईना मी सावित्री उत्सवाच्या निमित्ताने वंदन करते.
मी ज्या वैदू समाजातून आले आहे त्या समाजाने माझ्या कुटुंबाला २०१३ साली जातीतून बहिष्कृत केले होते.पुरुषी वर्चस्व असलेल्या प्रबळ अशा जात पंचायतीने माझ्या कुटुंबाला आर्थिक दंड ठोठावला. सगळ्या बाजूने कोंडी केली,मला जीवे मारण्याची धमकी दिली.

त्यावेळी मी 23 वर्षाची असेन.हा जाच सहन न होवून मी वैदू समाजातील तरुण मुलांना एकत्र करण्यास सुरुवात केली त्याच वेळी अनेक सामाजिक संघटना आणि कार्यकर्त्यांच्या संपर्कात आले.मुंबईत जोगेश्वरी येथे जात पंचायतीच्या विरोधात पहिली परिषद घेतली.रूढी परंपरेच्या नावाखाली स्त्रियांचे जास्त शोषण केले जाते.आम्ही त्याचे बळी ठरलो होतो त्या परिषदे नंतर वैदू समाजाची जात पंचायत बरखास्त केली आणि आम्हाला आमच्या कामाची दिशा सापडली.या सगळ्या धावपळीत माझ्या सोबत ज्याची मला भक्कमपणे साथ लाभली तो माझा मित्र शाली शेख,माझा जोतिबा….

आमचा पारंपरिक व्यवसाय हा सुया, दाभणी आणि जडीबुटी ची औषधे विकण्याचा. यात पोलिसांचा ससेमिरा, गावगुंडांचा त्रास.मात्र जात पंचायत बरखास्त झाल्यावर मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी समाजातील मुलांचे शिक्षण, रोजगाराच्या नव्या संधी,स्त्री पुरुषांची समानता आणि बाल विवाह रोखण्यासाठी आमची सुरू झालेली धडपड, अंधश्रद्धांचा सामना, यासाठी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात आम्ही गेलो,तरुण मुलं आणि स्त्रियांच्या बैठका घेतल्या.हे सर्व करीत असताना समाजातून खूप त्रास सहन करावा लागला,आर्थिक चणचण तर कायम असायची. नैराश्य यायचं.बरखास्त झाली असलीं तरी पुरुषी वर्चस्व असलेली पंचायती मधील माणसे बिथरली होती.ही कालची मुलगी आम्हाला काय शिकवते ही भावना असायची या साऱ्या काळात माझ्या सोबत शाली माझ्या सोबत भक्कमपणे उभा राहिला.

मला जातीतून बहिष्कृत केल्या पासून ते काल माझी आई कोरोना ने गेली तो पर्यंत माझ्या प्रत्येक अडचणी मध्ये हा माझा मित्र जोतिबा सारखा कायम माझ्या सोबत राहिला आहे.छोट्या वयातील एक दुर्गा बलाढ्य अशा जात पंचायतीच्या विरोधात कशी उभी राहू शकते ते मी शाली कडून शिकले आहे.त्याचाही प्रवास हा संघर्षाचा आहे.ज्या समाजातून तो आलेला आहे तिथे ही त्याला लहानपणा पासून संघर्षाचा सामना करावा लागला आहे.हा संघर्ष आर्थिक आहे तसा तो सामाजिक,धार्मिक ही आहे.यातूनही तो माझ्या सोबत माझ्या लढाईत आहे.मी जी काही आज आहे त्यात शाली शेख या माझ्या मित्राचा,माझ्या जोतिबाचा मोठा वाटा आहे.

३ जानेवारीला मी माझ्या घरात सावित्री उत्सव सणा सारखा साजरा करणार आहेच पण माझ्या वैदू समाजातील प्रत्येक घरात सावित्रीच्या जन्म दिवस सणा सारखा साजरा करण्याचे आवाहन मी या निमित्ताने करीत आहे.मी स्वतः माझ्या दारात रांगोळी घालणार आहे,दरवाज्याला फुलांचे तोरण बांधणार आहे.आकाश कंदील लावणार आहे आणि उंबऱ्यावर ज्ञानाचे प्रतीक म्हणून एक पणती पेटवणार आहे. आम्ही सर्वजण करणारच आहोत, तुम्हीही यात सामील व्हा.

महाराष्ट्र, लेख, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED