वृत्तपत्र : लोकशाहीचे चौथे आधारस्तंभ

65

(मराठी पत्रकार दिन : बाळशास्त्री जांभेकर जन्मदिन)

महाराष्ट्र शासनाने मराठी पत्रकार दिन हा ६ जानेवारी रोजी बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्म दिनानिमित्त घोषित केला आहे. राज्यात सर्वत्र हा दिवस साजरा केला जातो. भारतदेशात राष्ट्रीय प्रेस अर्थात पत्रकार दिन प्रत्येक वर्षी १६ नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. हा दिवस भारतातील स्वतंत्र आणि जबाबदार पत्रकारांची उपस्थिती दर्शवितो. माध्यमांना लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असे म्हंटले जाते. पत्रकार हा समाजाचा आरसा असतो, जो प्रतिकूल परिस्थितीतही सत्य प्रकट करत असतो. ‘नॅशनल प्रेस डे’ हा दिवस पत्रकारांच्या स्वातंत्र्याचे आणि समाजाबद्दलच्या त्याच्या जबाबदाऱ्यांचे महत्व दर्शवितो. प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाने १६ नोव्हेंबर १९६६ पासून काम सुरू केले.

राज्यातील बाळशास्त्री जांभेकर हे मराठी भाषेतील आद्य पत्रकार आहेत. त्यांनी मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र ‘दर्पण’ हे दि.६ जानेवारी १८३२ रोजी सुरू केले होते. जुलै १८४० मध्ये दर्पणचा शेवटचा अंक प्रकाशित झाला होता. मराठी भाषेत गोविंद कुंटे आणि भाऊ महाजन यांच्या मदतीने त्यांनी दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र काढले. जनसामान्यांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने ‘दर्पण’ हे आवर्जून मराठी भाषेत काढण्यात आले. जगद्गुरु संत तुकारामजी महाराज आपल्या अभंगातून शब्दांची शक्ती वर्णन करतात –

“आम्हा घरी धन, शब्दांचीच रत्ने !!
शब्दांचीच शस्त्रे, यत्ने करू !!
शब्दचि आमचे, जीवाचे जीवन !!
शब्दचि वाटू धन, जन लोकां !!”

तिचा त्यांनी अगदी योग्य उपयोग करून घेतला, असे म्हणणे वावगे ठरू नये.

जांभेकरांचा जीवन प्रवास : कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील पोंभुर्ले या गावी दि.६ जानेवारी १८१२ रोजी बाळशास्त्रींचा जन्म एका पुराणिकाच्या घरी झाला. अज्ञान, दारिद्र्य आणि रुढीप्रिय समाजाच्या अंध:कारातून बाहेर पडण्यासाठी सन १८२५ मध्ये ते मुंबईत आले. मुंबईत बापू छत्रे यांच्या निवासस्थानी राहून त्यांनी अध्ययन सुरू केले. आपल्या विलक्षण बुध्दीचातुर्याने व तल्लख स्मरण शक्तीने त्यांनी त्या वेळच्या मुंबईतील सार्वजनिक जीवनावर विलक्षण छाप टाकली. सन १८३० मध्ये हिंद शाळा पुस्तक मंडळाचे सेक्रेटरी म्हणून त्यांना नियुक्ती मिळाली आणि एक नवे क्षितिज त्यांच्यासाठी खुले झाले. सन १८३१ मध्ये त्यांनी ग्रंथ रचनेस प्रारंभ केला. त्यानंतर वयाच्या अवघ्या २०व्या वर्षी ६ जानेवारी १८३२ रोजी ‘दर्पण’ या बातमीपत्राची मुहूर्तमेढ रोवली.

वृत्तपत्राची संकल्पना : बातमीचे महत्व त्या काळी सर्वसामान्यांमध्ये रुजलेले नसल्याने दर्पणला सुरुवातीला मोठ्या संख्येने वर्गणीदार व वाचक मिळाले नाहीत. मात्र ही संकल्पना जशी रुजली, तसे त्यातील विचारही रुजले आणि प्रतिसाद वाढत गेला. ब्रिटिश काळामध्ये वृत्तपत्र चालवणे आणि त्याला वाचक मिळवणे हे मोठे कठीण काम होते. मात्र याही परिस्थितीत पदरमोड करून व कुठलेही नफ्याचे तत्व न स्वीकारता या काळामध्ये सुधारकांनी आपले वृत्तपत्र चालवले. यामध्ये बाळशास्त्री जांभेकर यांचे दर्पण हे वृत्तपत्र अग्रणी ठरले होते. प्रत्यक्षात या काळातील वृत्तपत्रे ठराविक काळानंतर प्रसिद्ध केली जात असत. त्याचवेळी इंग्रजी सत्ताधार्‍यांना स्थानिकांच्या अडचणी आणि भावना कळाव्या यासाठी दर्पणमध्ये एक स्तंभ इंग्रजी भाषेत लिहिला जात असे, हे विशेष..

पत्रकारितेचे विविध प्रकार : पत्रकारितेची उद्दिष्टे, स्वरूप, कार्य यांनुसार विविध प्रकार संभवतात. जसे- विकास पत्रकारिता, शोध पत्रकारिता, अन्वयार्थक पत्रकारिता, पीत पत्रकारिता, धनादेश पत्रकारिता, नवपत्रकारिता, युक्तिवादात्मक पत्रकारिता, विरोधक पत्रकारिता, छायाचित्र पत्रकारिता हे त्यांतील काही प्रमुख प्रकार होत. माझ्या अल्पमतीप्रमाणे ते याहूनही कितीतरी भिन्न आणि कितीतरी अधिक असू शकतात.

🔸पत्रकारातील गुण

 (१) कुतूहल व चौकसपणा – एखादी घटना घडली तर त्याविषयी अधिक जाणून घेण्याची उत्सुकता पत्रकारात हवी. ती एखाद्या चांगल्या बातमी मागची प्रेरणा ठरू शकेल. (२) अथक परिश्रम आणि वेळोंवेळीही काम करण्याची तयारी – पत्रकार होणे म्हणजे केवळ हातात बूम-माईक घेऊन, प्रेसकार्ड दाखवत मिरवणे नव्हे. त्यासाठी प्रचंड कष्ट सोसावे लागते. ब्रेकिंग न्यूज कधी वेळ पाहून घडत नाही. त्यामुळे कधी गाढ झोपेतून उठून काम करावे लागू शकते. (३) वेळेचे भान, समयसूचकता व सदुपयोग – शिळ्या बातम्यांकडे लोक दुर्लक्ष करतात. त्यासाठी वेळेत बातमी फाईल करणे तसेच वेळच्या वेळी अपडेट्स देणे अत्यंत गरजेचे असते. कोणत्या वेळी काय बोलावे वा लिहावे? किती बोलावे अथवा लिहावे? हे उमगले पाहिजे.

(४) तार्किक विचार तथा शोधक बुद्धी – एखादी घटना का घडली? आणि त्यापासून परिणाम काय होतील? याचा विचार करता आला पाहिजे. (५) उत्तम भाषा, भरपूर शब्दसंग्रह किंवा व्यक्त होण्याची कला – सोप्या शब्दांत सर्वांना समजेल अशी बाळबोध भाषा अवगत असावी. प्रभावी, मार्मिक व नेमकेपणाने बातमी मांडण्याचे कौशल्य असावे. (६) प्रचंड जनसंपर्क – काँटॅक्ट्स नंबर संपर्कसूत्रे जमा करणे, लोकसंपर्क वाढवणे आणि कुठल्या प्रसंगी कोणाशी संपर्क साधावा? हे जाणून घेणे जमले पाहिजे. (७) संभाषण कौशल्य – एखाद्या घटनेवर कुणाला बोल फोडायचे असेल तर त्याच्याशी कसा संवाद साधायचा? ते ज्ञान हवे. (८) नैतिकता, विश्वासार्हता, निःस्पृह, निष्पक्षपणे विचार करण्याची क्षमता वाढवावी लागते. (९) सहनशीलता व संयम – तोल ढळू न देता काम करणे, प्रसंगी शांत राहता येणे, कुठे थांबायचे हे समजणे गरजेचे मानले जाते.(१०) ज्ञानलालसा – प्रवास वर्णन-निरीक्षण व लिहिण्याची आवड असणे, रस्ते, ठिकाण व परिसराविषयी माहिती असणे वा काढून घेणे महत्त्वाचे ठरते.

पत्रकार कसा असावा? माझ्या मते वृत्तपत्र समाजमन न्याहाळण्याचा स्वच्छ आरसा आहे. म्हणून पत्रकारही चारित्र्यवान असावा. “सत्य, न्याय व निष्ठेने काम करता येत नाही. त्याने पत्रकार होण्यापेक्षा पात्रकार व्हावे!” असे आचार्य प्र.के.अत्रे यांनी म्हंटले आहे. पत्रकारांची लेखणी ही तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे. परंतु एखाद्याचे चरित्रहणन करून अपमानीत केले जाऊ नये. अन्याय, अत्याचार, गुंडगिरी, भ्रष्टाचाराविरुद्ध लढताना फक्त लेखणी चालवा. या शब्दशस्त्रानेच रक्तबंबाळ होईल –

“खिंचो न कमानों को
न तलवार निकालो !
जब तोफ मुक़ाबिल हो
तो अख़बार निकालो !!”

जे पत्रकार खऱ्या बातम्या देण्यास घाबरतात, त्यांनी पत्रकारिता करूच नये. ही एक मानवी जीवनाची सेवा आहे. ढोंग, विषमता आणि अन्याय ह्यांच्याविरुद्ध उपसलेली ती तलवार आहे. सत्य, समता, आणि स्वातंत्र्य यांची ती आराधना व पूजा आहे. त्याच्या लेखणीला तलवारीची धार नसेल, तर सत्य सांगण्याचे आणि न्याय देण्याचे कार्य त्याला यशस्वीपणे करता येणार नाही, बस्स एवढेच!

पुरोगामी संदेश न्यूज नेटवर्कतर्के हाडाचे पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांना त्यांच्या जन्मदिनी शत शत नमन आणि मराठी पत्रकार दिनानिमित्त अखिल पत्रकार बंधुभगिनींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा !

✒️लेखक:-श्री निकोडे कृष्णकुमार गोविंदा.
(रा.डि.शै.दै.रयतेचा वाली-गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी)
मु. श्रीगुरुदेव प्रार्थना मंदिराजवळ, रामनगर, गडचिरोली.
पो. ता. जि. गडचिरोली.
मधुभाष – ७७७५०४१०८६.
email – krishnadas.nirankari@gmail.com