बंगालपासून – महाराष्ट्रापर्यंत : 188 वर्ष मराठी पत्रकारितेचे एक ऊहापोह

32

( मराठी पत्रकार दिन विशेष )

आज दिनांक – 6 जानेवारी 2020! ‘ मराठी पत्रकार दिन’ ! सर्व मराठी प्रिंट मीडिया पत्रकार,संपादक तसेच सर्व वाचक मंडळी यांना आजच्या ‘ मराठी पत्रकार’ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

लहानपणी शाळेला जात असताना एक ओढा मध्ये यायचा. तो ओढा ओलांडून आम्हाला शाळेत जावे लागायचे. ओढ्याला पावसाळ्यात आमच्या गुडघ्यापर्यंत तरी पाणी राहायचे. त्यामुळे आम्हाला तो ओढा ओलांडण्याची खूप भीती वाटायची. पण,आमच्यातला सूर्यकांत नावाचा बालमित्र ओढा ओलांडायला कधीच घाबरायचा नाही. मग तो झपझप त्या ओढ्यातून पुढे निघायचा,आम्ही घाबरायचो पण सूर्यकांत गेलेला पाहून आम्हीपण पुढे जायचो. अस रोज व्हायचे, आता सूर्यकांत शाळेत नाही जरी आला तरीसुद्धा आम्ही ओढा ओलांडायचोच; कारण आता आमची भीती मेली होती.

भारतातील वर्तमानपत्राचा इतिहास देखील थोडा असाच भीतीदायक होता. कारण आपल्या देशातील वर्तमानपत्राची सुरुवात ही ब्रिटिशांच्या काळात झाली होती. अर्थात त्यावेळेस व्यक्तिस्वातंत्र्याची मुस्कटदाबी प्रकर्षाने होत असे. त्यामुळे जिथे भारतीय आपसात कुजबुज करायलाही घाबरायचे,तिथे जाहीर वर्तमानपत्रातून जगजाहीर मतप्रदर्शन करून आपली भूमिका मांडण्याचे सामर्थ्य कोणीही करण्यास धजावत नसे. असे नाही की त्यावेळेस हुशार व मुत्सद्दी भारतीय नव्हते,अर्थात होते! परंतु, ब्रिटिशांची भीती त्यांना तसे करू देत नसे.

भारतीय वर्तमानपत्रांचा इतिहास पाहायचा झाला तर ब्रिटिश काळात एका ब्रिटिश व्यक्तीनेच याची सुरुवात केली होती,हे विशेष! जेम्स ऑगस्ट्स हिकी या ब्रिटिशाने 29 जानेवारी 1780 मध्ये ‘बेंगाल गॅझेट’ किंवा ‘कलकत्ता जनरल एडवाइजर’ किंवा ‘हिकी बंगाल गॅजेट’ या नियतकालिकाने केली होती. त्या काळातील ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या कामातील धांदल दाखवण्यासाठी हे साप्ताहिक मुद्दाम सुरू केले गेले. परंतु काही कालावधीनंतर या साप्ताहिकावर ब्रिटिशांनी बंदी घातली. त्यामुळे टपालच्या माध्यमातून साप्ताहिक जाणे बंद झाले. यानंतर मद्रासमधील पहिले इंग्रजी वृत्तपत्र ‘मद्रास कुरिअर’ हे होय. ते 1785 साली रिचर्ड जॉन्सन या सरकारी मुद्रकाने सुरु केले.

मुंबईमधील पहिले नियतकालिक ‘बाँबे हेरौल्ड’ 1789 मध्ये सुरु झाले. नन्तर 1791 मध्ये ‘बाँबे गॅझेट’ प्रकाशित झाले. पुढे ‘बाँबे हेरौल्ड’ त्यात विलीन झाले.

भारतीयांनी सुरू केलेले पहिले नियतकालिक हे बंगाल प्रांतातून सुरू झाले. बंगाल प्रांताला वर्तमानपत्राचा फार मोठा इतिहासे. आहे.

बंगालमध्ये देशी भाषेतून साप्ताहिके,पाक्षिके अशी नियतकालिके छापण्यात येत असत. त्यामध्ये 1816 साली गंगाधर भट्टाचार्य यांनी ‘बेंगॉल गॅझेट’ हे वृत्तपत्र बंगाली भाषेत सुरु केले.

भवानीचरण बॅनर्जी यांनी ‘संवाद कौमुदी’ हे बंगाली वृत्तपत्र 4 डिसेंबर 1821 रोजी सुरु केले. समाजसुधारक राजा राममोहन रॉय यांचा संवाद कौमुदीशी निकटचा संबंध असल्यामुळे ‘संवाद कौमुदी’ हे त्यांचेच पत्र म्हणून ओळखले जायचे.

यानंतर खूप सारे वर्तमानपत्रे देशातील वेगवेगळ्या प्रांतात देशी- विदेशी लोकांनी देशी-विदेशी भाषेत सुरू केले. त्याकाळी सर्व भारतीयांशी एकाचवेळेस सर्वदूर सवांद साधता येईल असे वर्तमानपत्रच हे एक साधन होते. त्यामुळे समाजसुधारक तथा तत्कालीन नेतेमंडळी यांनी या साधनाचा पुरेपूर वापर करून घेतला.

आज एवढा इतिहास सांगण्यामागचे कारण हे की, आज महाराष्ट्रातील पहिले वर्तमानपत्र ‘ दर्पण’ च्या प्रसिद्धीचा तो आजचाच ( 6 जानेवारी ) दिवस आहे. महाराष्ट्र राज्यातील पहिले नियतकालिक येण्यापूर्वी त्यालापण इतर वर्तमानपत्राची पार्श्वभूमी आहे, हे एव्हाना आपल्यापर्यंत पोहचलेच असेल.

आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म ( 6 जाने.1812, पोंभुर्ले, देवगड- रत्नागिरी ) तथा त्यांनी काढलेले पहिले वर्तमानपत्र,( 6 जाने. 1832 ) जे महाराष्ट्रातील पहिले वर्तमानपत्र होते. या दोन्हीही पावन दिनाचे औचित्य साधुन महाराष्ट्रात दरवर्षी 6 जानेवारीला ‘ मराठी पत्रकार दिन’ साजरा केला जातो. त्यामुळेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे ‘ मराठी पत्रकारितेचे जनक’ म्हणून ओळखले जातात.

‘ दर्पण’ हे नियतकालिक ( पाक्षिक ) सुरू करण्यापूर्वी जांभेकरांनी साधारणतः 1831 मध्ये एक पत्र काढून नियतकालिक काढण्यामागची त्यांची भूमिका स्पष्ट केली होती. त्यांचा वर्तमानपत्र काढण्यामागचा उद्देश केवळ बातम्या देणे नसून भारतीयांना पाश्चात्य ज्ञान, कला, विज्ञान, शिक्षणाने लोकांची होणारी प्रगती हे समजावून सांगायचे होते. ‘ दर्पण’ सुरुवातील पाक्षिक होते परंतु नन्तर मागणी तथा खप वाढल्याने थोड्याच अवधित ते ‘ साप्ताहिक’ करण्यात आले. मे 1840 ला दर्पणकारांनी ‘ दिग्दर्शन’ नावाचे मासिकही काढले.

‘ दर्पण’ हे द्विभाषी होते. ज्यात एक स्तंभ इंग्रजी भाषेत राहायचा. भारतात इंग्रजांची नोकरी करता-करता पत्रकारितेला विरोध होऊ नये तसेच भरतीयांमधील जाणीवा जाग्या करण्यासाठी त्यांनी उपरोक्त द्विभाषी कार्यक्रम राबवला होता. गोविंद कुंटे तथा भाऊ महाजन यांचे त्यांना याकामी भरसक सहकार्य लाभले.

एकूण 9 भाषांचे ज्ञान असणारे आचार्य हे मराठीसोबत बंगाली,संस्कृत,कानडी,गुजराती,तेलगू आशा भाषेत निपुण होते. त्यांनी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी सचिव, शाळा पुस्तक मंडळाचे सचिव, शिक्षक,प्राध्यापक,तपासनिस आशा वेगवेगळ्या हुद्द्यावर काम केलेले आहे. त्यामुळे शासकीय कामकाजासोबत ते सामाजिक कार्यही पार पाडणारे महाराष्ट्राचे ‘आद्यसमाजसुधारक’ होते. त्या कार्यशैलीची प्रशंसा म्हणून ब्रिटिशांनी त्यांना ‘ जस्टीस ऑफ पीस’ हा किताब दिला होता.त्यांचा वसा पुढे चालून गोपाळ गणेश आगरकर यांनी देदीप्यमानपणे चालवला.

जेम्स ऑगस्ट्स हिकी, गंगाधर भट्टाचार्य,भवानीचरण बॅनर्जी पासून ते राजा राममोहन ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे ब्रिटिशप्रणित आडकाठी आणणारा ओढा ओलांडणारे आद्य पत्रकार होत. ज्यांच्यामुळेच समोरच्या पिढीला पत्रकारिता करण्याची हिंमत आली. हे रोखण्यासाठी ब्रिटिशांनी कितीतरी कायदे केले, तरीसुद्धा एकदा सुरू झालेले वृत्तपत्र सहजासहजी बंद करता आले नाही. याचे श्रेय हे महाराष्ट्रात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनाच जाते. त्यामुळे ते खऱ्या अर्थाने ‘पत्रकारितेचे पितामह’ तसेच ‘आद्यपत्रकार’ व ‘सुधारक’ होत.

आता ब्रिटिशांचे शासन नाही,परंतु कुठलेतरी शासन हे सदासर्वकाळ आलटून पालटून राज्य तसेच केंद्रात हे सत्तेवर राहतेच. पत्रकार मंडळींनी या आपल्या महान पूर्वजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून, कोणालाही न घाबरता सामान्यांचा आवाज बनावा.सत्ताधीश असो; की विरोधक यांना जाब विचारून लोकशाही मजबूत करावी.हीच आजच्या ‘मराठी पत्रकार दिनाची’ शुभेच्छा व आशा!

धन्यवाद!

✒️लेखक:-अमोल चंद्रशेखर भारती(लेखक/कवी/व्याख्याते,नांदेड )मो:-8806721206