आता बर्ड फ्ल्यू चे संकट

29

मागील दहा महिन्यांपासून जग कोरोनाच्या महासंकटाशी लढत असून हे संकट अजूनही दूर झालेले नाही अशातच नव्या संकटाची चाहूल लागली आहे. हे संकट आहे बर्ड फ्ल्यू या महामारीचे. सर्वप्रथम जपान या देशात बर्ड फ्ल्यू चे संकट निर्माण झाल्याची बातमी आली. त्यापाठोपाठ ब्रिटन, जर्मनी, नेदरलँड, बेल्जियम या देशात बर्ड फ्ल्यू चा प्रकोप वाढू लागल्याचे समोर आले म्हणूनच या देशात लाखो कोंबड्यांची कत्तल करण्यात आली आहे. परदेशात बर्ड फ्ल्यू ने थैमान घातले असताना आता भारतातही बर्ड फ्ल्यू चे आगमन झाले असल्याने देशात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

राजस्थान, गुजरात, केरळ, हिमाचल प्रदेश, मध्यप्रदेश या राज्यात बर्ड फ्ल्यू ने हातपाय पसरायला सुरवात केली आहे. या राज्यात बर्ड फ्ल्यू ने लाखो पक्षी मरण पावले आहेत. बर्ड फ्ल्यू ची आपत्ती वाढू लागली असल्याने केरळने या आपत्तीला राज्यस्तरीय आपत्ती म्हणून घोषित केले आहे. कर्नाटक आणि मध्यप्रदेश या राज्यांनी अंडी व कोंबड्यांच्या मांस विक्रीवर बंदी घातली आहे. हिमाचल प्रदेशातही स्थलांतरित पक्ष्यांचा मृत्यू बर्ड फ्ल्यू ने झाला असल्याचे निष्पन्न झाले असल्याने तिथेही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गुजरात आणि राजस्थानमध्ये बर्ड फ्ल्यू ने हजारो कोंबड्या, कावळे आणि बगळे मरण पावले आहेत. मागील दहा दिवसांत देशांत ४ लाख ८४ हजार ७७५ पक्षी मरण पावल्याची नोंद झाली आहे. हा आकडा चिंताजनक आहे. महाराष्ट्रातही काही भागात बगळे, कावळे आणि पोपट मरण पावल्याच्या घटना घडल्या आहेत त्यामुळे महाराष्ट्रातही बर्ड फ्ल्यू चे संकट येऊ शकते.

हे संकट आणखी मोठे होऊ नये म्हणून सरकारने आतापासूनच पावले उचलायला हवीत. बर्ड फ्ल्यू चा प्रसार वाढू नये म्हणून सरकारने राज्यातील सर्व पोल्ट्री फार्म तसेच पक्षी उत्पादक पोल्ट्री फार्म, जलाशये आणि सर्वात महत्वाचे म्हणजे परदेशातून स्थलांतरित होऊन आलेले पक्षी, त्यांचे निवारे यावर लक्ष ठेवायला हवे. बाधित पक्ष्यांना ठार मारण्याचे सरकारने आदेश दिले पाहिजेत कारण बर्ड फ्ल्यू हा देखील संसर्गजन्य रोग आहे. एक बाधित पक्षी शेकडो पक्षांना बाधित करु शकतो. इतकेच नाही तर बाधित पक्षांपासून किंवा त्यांचे मांस खाल्ल्यामुळे माणसांना देखील हा रोग होऊ शकतो असे जाणकारांचे मत आहे. संसर्गजन्य रोग कसा फैलावतो याचा अनुभव आपल्याला कोरोनाने दिला आहे. जी चूक आपण कोरोनाच्या वेळी केली ती चूक आता होता कामा नये. मागील वर्षी जानेवारी, फेब्रुवारीतच चीन आणि युरोपमध्ये कोरोनाचे रुग्ण सापडले तेंव्हा आपण निर्धास्त राहिलो. कोरोना आपल्याकडे येऊच शकत नाही अशा भ्रमात आपण राहिलो. हा भ्रम आपल्याला किती महागात पडला हे वेगळे सांगायला नको. कोरोनाच्या वेळी जी चूक आपण केली तिच्यातून धडा घेऊन बर्ड फ्ल्यू ला रोखायला हवे त्यासाठी तातडीने पावले उचलली तरच बर्ड फ्ल्यू चे येऊ घातलेले संकट टळू शकेल.

✒️लेखक:-श्याम बसप्पा ठाणेदार(दौंड जिल्हा पुणे)मो:-९२२५४६२९५