बीड जिल्ह्यात कोरोना लसीकरणाचा ड्राय रन यशस्वी

31

✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114/9404223100

गेवराई(दि.8जानेवारी):-केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार आज शुक्रवारी (दि.8) राज्यातील 30 जिल्हे व 25 महानगरपालिका क्षेत्रांमध्ये कोरोना लसीकरणासाठी ड्राय रन मोहिम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातही आज सकाळी तीन ठिकाणी कोरोना लसीकरणाचा ड्राय रन यशस्वी करण्यात आला. बीड जिल्हा रुग्णालयात जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांच्या हस्ते कोरोना लसीकरण कक्षाचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर त्यांच्या उपस्थितीत आरोग्य कर्मचार्‍यांना लसीकरणाची रंगीत तालीम करण्यात आली. दरम्यान वडवणी प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच परळी उपजिल्हा रुग्णालयातही ड्राय रन यशस्वी झाला. आता लवकरच लसीकरणासाठीचे नियोजन पुर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

गत 2020 हे वर्ष कोरोनाशी लढा देण्यात गेले. आता कोरोनावर मात करण्यासाठी लस शोधण्यात यश आले आहे. दरम्यान, येत्या काही दिवसातच लसीकरणाची मोहीम हाती घेतली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभरात आज शुक्रवारी कोरोना लसीकरणासाठी 30 जिल्ह्यात ड्राय रन राबवण्यात येत आहे. जिल्ह्यात जिल्हा सामान्य रुग्णालय, वडवणी प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच परळी उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी प्रत्येकी 25 या प्रमाणे 75 आरोग्य कर्मचार्‍यांना कोरोना लस देण्याची रंगीत तालीम करण्यात आली. तत्पूर्वी शुक्रवारी सकाळी 8.30 वाजता जिल्हा रुग्णालयात सीईओ अजित कुंभार यांच्या हस्ते लसीकरण कक्षाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सूर्यकांत गित्ते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राधाकिशन पवार, अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉ.सुखदेव राठोड, यांची उपस्थिती होती.