मुलाच्या स्मृती जपण्यासाठी प्रा. दिलीप ललवाणी व परीवार यांची सामाजिक बांधिलकी

44

✒️भुसावळ(पुरोगामी संदेश नेटवर्क)

भुसावळ(दि.8जानेवारी):- येथील श्रीमती प. क. कोटेचा महिला महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्रभारी प्राचार्य प्रा.डाॅ. दिलीप ललवाणी यांचे चिरंजीव स्वर्गीय स्वप्निल ललवाणी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून भुसावळसह परिसरात गरजवंतांपर्यंत मदत पोहोचून सामाजिक बांधिलकी जपली आहे,व वेगळेपणाने श्रध्दांजली अर्पण केली.
प्रा. दिलीप ललवाणी यांचे चिरंजीव स्व. स्वप्निल ललवाणी यांचे काही दिवसांपूर्वीच निधन झाल्याने त्यांच्या स्मृती कायमस्वरूपी जपाव्या याकरिता सामाजिक भान राखण्याचे काम प्रा. ललवाणी व परीवाराने केले आहे. जव्हार तालुक्यातील शबरी सेवा समिती कर्जततर्फे चार आदिवासी पाड्यातील 125 मुलांना पोषक आहार वाटप करण्यात आला. यावेळी समाजसेवीका रंजना करंदीकर यांनी सेवा करण्याची संधी दिली.

स्वर्गीय स्वप्नील हा भुसावळ येथील के. नारखेडे विद्यालयाचा माजी विद्यार्थी असल्याने शाळेत विविध पुस्तके, सीडी, बौद्धिक खेळ इत्यादी मिळून सुमारे 15 हजार रूपये किमतीचे शैक्षणिक साहित्य शाळेला भेट देण्यात आले. तसेच यापूर्वीसुद्धा दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या बक्षिसासाठी संस्थेकडे पंधरा हजार रुपयांची ठेव ठेवण्यात आली आहे.भुसावळ येथील ज्ञानासह मनोरंजन ग्रुपच्या सहकार्याने सुमारे 25 व्यक्तींनी रात्री दहा ते अकरा वाजेदरम्यान भुसावळ शहरातील विविध सार्वजनिक ठिकाणी फिरून थंडीने कुडकुडणाऱ्या गरजवंतांना मायेची शाल पांघरली.प्रा. ललवाणी यांच्या मातोश्री स्वर्गीय ताराबाई ललवाणी व मुलगा स्वर्गीय स्वप्नील ललवाणी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ भुसावळ येथील नाहाटा महाविद्यालयात प्राचार्य, उपप्राचार्य व प्राध्यापकांच्या उपस्थित 32 पुस्तकांची अमुल्य भेट देण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांना अधिक अभ्यासासाठी ही पुस्तके उपलब्ध झाली आहेत.

जळगाव येथील पांजरापोळ वस्तीमध्ये गाईंना ढेप घालून तसेच वरखेडी येथील महावीर गो शाळेला गाईंना स्वर्गस्थ आत्म्याच्या नावे चारा देण्यासाठी रक्कम देण्यात आली.
भुसावळ तालुक्यातील वराडसीम येथील जिल्हा परिषद मुलींच्या शाळेत विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. त्यात गोष्टीची पुस्तके, लेखन साहित्य व इतर शैक्षणिक साहित्याचा समावेश होता. त्यामुळे बालकांना शिक्षणात मदत होणार आहे.जागर प्रतिष्ठानच्या सहकार्याने रावेर तालुक्यातील धाग्या वाड्यावर व गारबर्डी धरणाच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी कुटुंबियांना नवीन कपडे, भांडी व एक महिन्याचा किराणा देण्यात येऊन त्यांचे दुःख हलके करण्याचा प्रयत्न केला. लहान मुलांना बिस्कीटे, चॉकलेट फुगे व खेळणी दिल्याने त्यांच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण करण्यात आले.

अप्पासाहेब रघुनाथराव भाऊराव गरुड कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय शेंदुर्णी तालुका जामनेर येथील माजी विद्यार्थी प्राध्यापक दिलीप ललवाणी यांनी त्यांच्या मुलाच्या स्मृतिप्रित्यर्थ 50 हजार रुपयांचा धनादेश, पंधरा हजारांची पुस्तके आणि संदर्भ ग्रंथ महाविद्यालयाकडे सुपुर्द केली. पन्नास हजार रुपयांच्या ठेवीतून आलेल्या व्याजाच्या रकमेतून दरवर्षी स्वर्गीय स्वप्निल, माजी विद्यार्थी प्राध्यापक ललवाणी, श्रद्धेय गजाननरावजी गरुड, समाजभूषण स्व. मोतीभाऊ कोटेचा व ललवाणी यांना शिकविलेल्या गुरुजनांच्या नावाने महाविद्यालयातून प्रथम येणारे विद्यार्थी, ग्रंथालयात नियमित असणारा विद्यार्थी, उत्कृष्ट शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजनेचे उत्कृष्ट स्वयंसेवक असे एकूण दहा पारितोषिके देण्यात येणार आहे. प्रा. ललवाणी हे वाणिज्य विभागाचे प्राध्यापक असल्याने वाणिज्य विभागातील विद्यार्थ्यांना उपयुक्त अशी पुस्तके व संदर्भ ग्रंथ वाणिज्य विभागाला भेट देण्यात आली.

कुसुंबा ता. रावेर येथील ग्रामपंचायत सदस्य प्राध्यापक मुबारक तडवी चालवत असलेल्या स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेला स्पर्धा परीक्षेसंदर्भात सुमारे पाच हजार रुपयांची पुस्तके आणि पुस्तके ठेवण्यासाठी रॅक तसेच सातपुडा आदिवासी सांस्कृतिक मंडळ संचलित जे. एस. जावळे माध्यमिक विद्यालयास मोठी घड्याळ भेट देण्यात आली.अशा पद्धतीने प्रा. दिलीप ललवाणी व परीवाराने मातोश्री स्वर्गीय ताराबाई ललवाणी आणि मुलगा स्वर्गीय स्वप्निल ललवाणी यांच्या स्मृती जपण्याचे काम सामाजिक बांधिलकीतून केले आहे.प्रा.ललवाणी व परीवाराने या अनेक घटकांनी सेवा करण्याची संधी व मदत केल्याबद्यल त्र्रुण व्यक्त केले आहे!