ग्रामपंचायत निवडणुकीचा सोशल मिडीयावर जोरदार प्रचार

32

🔹ग्रामीण भागातील उमेदवारांकडून आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर

✒️अशोक हाके(बिलोली,तालुका प्रतिनिधी)मो:-9970631332

बिलोली(दि.8जानेवारी):- तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच़े चिन्ह वाटप झाल्यानंतर प्रचाराला सुरुवात झाली. विशेष म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत युवकांकडून सोशल मिडीयावरही निवडणुकीचा जोरदार प्रचार केला जात आहे. उमेदवारांचे व्हिडीओ, आँडीओ,सामाजिक कामे केल्याचे व्हिडीओ व्हायरल करून प्रचार केला जात आहे.
कुंडलवाडी शहर व परिसरात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरू असुन परिसरातील चिरली-टाकळी गट ग्रामपंचायत, हुनगुंदा,डौर,हज्जापुर, अर्जापुर, कोंडलापुर-नागापूर,कोटग्याळदौलापुर,माचनुर,पिंपळगाव(कुं),हरनाळी,नागणी आदी गावांत उमेदवारांना चिन्ह वाटप झाल्यावर निवडणूक प्रचार मोठ्या प्रमाणात सुरु आहे.

त्यातच प्रचारात आधुनिक तंत्राचाही मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. उमेदवारांचे फोटो,विडीओ बनवित विकास कामे आम्हीच केली व करणार असल्याचे विडीओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात पोस्ट करून उमेदवार आपला प्रचार करीत आहेत. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत सोशल मिडीयाचा प्रभावी वापर होत असल्याचे दिसून आले. मात्र ग्रामीण भागातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत सोशल मिडीया व आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने होणाऱ्या प्रचारामुळे आता चांगलीच रंगत आणली आहे. माणूस आपल्या हक्काचा,इतिहास घडविणार,अशा वेगवेगळ्या घोषवाक्यांचा वापर करून इच्छुक उमेदवार सोशल मिडीयावर जोरदार प्रचार करीत आहेत.दुसरीकडे अनेक व्हिडीओ, आँडीओ मिक्सिंग चित्रांची रेलचेल सोशल मिडीयाच्या विविध माध्यमांवर दिसत आहे.