अमेरिकेत लोकशाहीची हत्या

28

अमेरिकेच्या संसदेवर डोनाल्ड ट्रम्प समर्थकांनी जो धुडगूस घातला त्यात चार जण मरण पावले. या घटनेने संपूर्ण जगात खळबळ माजली आहे. जगातील सर्वात जुनी आणि समृद्ध लोकशाही असे जिचे वर्णन केले जाते त्या अमेरिकेच्या लोकशाहीचे वस्त्रहरण होताना संपूर्ण जगाने पाहिले आहे. डोनाल्ड ट्रम्प समर्थकांनी अमेरिकेत लोकशाहीची हत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना केवळ अमेरिकेसाठीच नाही तर जगातील लोकशाहीवाद्यांसाठी धोक्याची घंटा आहे. लोकांनी दिलेला कौल नाकारुन लोकशाही पद्धतीने सत्तांतरास नकार देऊन समर्थकांमार्फत अराजकता पसरवून देश अस्थिर करणे हे हुकूमशाहीचे प्रतीक आहे.

जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेत आज जे काय चालू आहे ते पाहता अमेरिका गृहयुध्दाच्या उंबरठ्यावर उभा आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. अमेरिकेमध्ये जॉर्ज वाशिंग्टन, अब्राहम लिंकन असे महान राष्ट्राध्यक्ष होऊन गेले त्यांनी अमेरिकेला शक्तिशाली राष्ट्र बनवण्यासाठी प्रयत्न केले याच नेत्यांनी अमेरिकेत लोकशाही रुजवली आज मात्र याच लोकशाहीची दिवसाढवळ्या हत्या होत आहे. जो देश आपला इतिहास, आपली परंपरा विसरतो तो देश विनाशाकडे वाटचाल करतो असे म्हणतात आज अमेरिकेत तेच होताना दिसत आहे. अमेरिकेत जो धुडगूस चालू आहे त्यामुळे अमेरिकेतील लोकशाही व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. वास्तविक अमेरिकेत जगातील सर्वात जुनी लोकशाही आहे म्हणून अमेरिकेत लोकशाही व्यवस्था खोलवर रुजली असेच सर्वांचे मत होते पण आज तिथे जे काय घडत आहे ते पाहता अमेरिकेपेक्षा भारतात लोकशाही खोलवर रुजली असे म्हणावे लागेल.

भारतात लोकशाही व्यवस्था येऊन अवघे सत्तर वर्ष झाली आहेत पण भारताची लोकशाही ही जगातील सर्वात प्रगल्भ लोकशाही आहे असे म्हणावे लागेल. कारण येथे जनमताचा आदर केला जातो. सत्ताधारी असो की विरोधक जनतेने दिलेला कौल तात्काळ मान्य करतात. लोकशाहीत जनता जनार्दन आहे. जनतेने दिलेला कौल हाच अंतिम आहे हे आपल्या लोकशाहीने मान्य केले आहे.आपल्याकडे पराभूत झालेला पक्ष खुल्या मनाने पराभव स्वीकारुन विजयी झालेल्या पक्षाचे अभिनंदन करतो त्याच्यासाठी खुर्ची खाली करतो आणि जबाबदार विरोधी पक्षाची भूमिका पार पाडतो.

अमेरिकेत जे काही चालू आहे ते पाहता घटनाकारांनी आपल्याला दिलेली संसदीय लोकशाही पद्धत किती योग्य आहे याची प्रचिती येते. अमेरिकेत असलेल्या अध्यक्षीय लोकशाही पद्धतीचे आकर्षण असलेला मोठा वर्ग आपल्याकडे आहे. आज त्यांना अध्यक्षीय लोकशाहीचा फोलपणा लक्षात आला असेल. अध्यक्षीय लोकशाही म्हणजे हुकूमशाहीची पहिली पायरी. आज भारताच्या लोकशाहीला जगातील सर्वात महान लोकशाही का म्हणतात याची जाणीव देशवासियांना झाली असेल अर्थात यात घटनाकर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या दूरदृष्टीचा मोठा वाटा आहे. जगातील कोणत्याही लोकशाहीपेक्षा भारताची लोकशाही ही अधिक प्रगल्भ आहे याचे प्रत्यंतर या निमित्ताने आले याबद्दल घटनाकर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे जितके आभार मानावे तितके कमी आहे.

✒️लेखक:-श्याम बसप्पा ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५