तुमची आमची एकच जात : मानव !

35

[संतश्रेष्ठ संताजी जगनाडे महाराज पुण्यस्मरण]

जगद्गुरू संतशिरोमणी तुकारामजी महाराज यांचा जसा लोकांवर प्रभाव वाढत जात होता, तसा त्या काळातील कर्मठांना सहन होत नव्हता. संत तुकारामांनी लिहिलेल्या अभंगांची गाथा त्यांनी इंद्रायणी नदीत बुडवून नष्ट करण्याचा फुका प्रयत्न केला. परंतु ते सर्व अभंग हे त्यांच्या लेखणीकास मुखोद्गत होते, त्यांनी ते पुन्हा लिहून काढले. लेखणीक दुसरे तिसरे कुणी नसून ते खुद्द संतश्रेष्ठ संताजी जगनाडे महाराज होते. खरेय, हे काही साधे काम नव्हतेच. यास्तव जातीचा संतच हवा, असे ते सांगतात –

“माझिया जातीचा मज भेटो कोणी । आवडिचा धनी पुरवावया ।।१।।
माझिया जातीचा मजशी मिळेल । कळेल तो सर्व समाचार ।।२।।
संतु म्हणे येथे पाहिजे जातीचे । येरा गबाळाचे काम नाही ।।३।।”
[ पवित्र घाण्यावरील अभंग : भाग पहिला : अभंग क्र.१.]

त्यांची आज मार्गशीर्ष कृ.१३ अर्थात दि.११ जानेवारी २०२१ रोजी पावन पुण्यतिथी. त्यांच्या दुःख निवारक पुण्य स्मरणानिमित्त त्यांना या लेखाद्वारे साष्टांग दंडवत प्रणाम !
संत श्री संताजी जगनाडे महाराज यांचा जन्म ८ डिसेंबर १६२४ रोजी महाराष्ट्र राज्यात पुणे जिल्ह्यातल्या मावळ तालुक्यातील सुदुंबरे या गावी विठोबा जगनाडे यांच्या घरी झाला. विठोबा जगनाडे व आई माथाबाई हे विठ्ठलभक्त होते. त्यामुळे संताजींवर लहानपणापासूनच धार्मिक संस्कार झाले. घर तेली समाजाचे असल्यामुळे मुलांला हिशेब करता येणे गरजेचे होते. त्यामुळे संतशिरोमणी संताजी महाराजांनी देखील लिहिता, वाचता आणि हिशेब करता येईल एवढे शिक्षण घेतले होते. घरची परिस्थिती चांगली होती. त्यामुळे त्यांना काहीच कमी पडले नाही. त्यांच्यावर बालपणापासूनच आध्यात्मिक संस्कार झाले. कीर्तन व भजनाला जाण्याची सवय लागली.

संत कविवर्य संताजी महाराजांचे शिक्षण तसे फक्त हिशेब करण्यापुरते झाले. त्यानंतर त्यांनी आपल्या पारंपरिक व्यवसायास – तेल गाळण्यास सुरवात केली. त्याकाळी बालविवाहाची प्रथा होती. त्यामुळे त्यांचा वयाच्या १२व्या वर्षीच यमुनाबाईशी विवाह झाला व ते संसाराच्या बेडीत अडकले. आता त्यांचे लक्ष फक्त कुटुंबावर केंद्रित झाले. त्याचबरोबर त्यांना जसा वेळ मिळेल, तसा भजनाला व कीर्तनालाही ते जात असत. त्यांच्यावर लहानपणापासूनच धार्मिक संस्कार असल्यामुळे त्यांचे कुटुंबापेक्षा जास्त लक्ष सामाजिक कार्यात होते. समस्त मानवांची जात एकच आहे. भेदाभेद करू नये, अशी शिकवण ते देतात –

“सगुण हा घाणा घेऊनि बैसलो । तेली जन्मा आलो घाणा घ्याया ।।१।।
नाही तर तुम्ही आम्ही एक जात । कमी नाही त्यात आणु रेणु ।।२।।
संतु म्हणे जाती दोनच त्या आहे । स्त्री आणि पुरुष शोधुनिया पाहे ।।४।।”
[पवित्र घाण्यावरील अभंग : भाग दुसरा : अभंग क्र.९.]

त्या काळी संतांचे समाजाला कीर्तनांच्या आणि अभंगांच्या माध्यमातून शिकवण देण्याचे कार्य चालू होते. तेव्हा जगद्गुरू संत तुकारामजी महाराजांची ख्याती संपूर्ण महाराष्ट्रात झाली होती. असेच एकदा ते सुदुंबरे या गावी कीर्तनासाठी आले होते. त्यांची कीर्तने ऐकून महाराजांवर मोठा प्रभाव पडला व त्यांनी संसार सोडण्याचा निर्णय घेतला. तेव्हा संत तुकोबांनी संत संतोबांना समजावून सांगितले, की संसारात राहूनही परमार्थ साधता येतो. तेव्हापासून संतश्रेष्ठ संताजी जगनाडे महाराज त्यांच्या चौदा टाळकऱ्यांमध्ये सामील झाले. संतमंडळींच्या सान्निध्यात राहून त्यांनी गुरुवर्य तुकोबारायांचे अभंग उतरवून घेण्यास सुरुवात केली. स्वरचित अभंगात ते स्वतःचा नामोल्लेख ‘संतु तेली’ असा करीत असत. स्वतः पावन गुरुचरणी अनन्यभावे शरण गेल्याचे वर्णन ते मोठ्या गोड शब्दांत करतात –

“एकादशी दिनी संत तुका वाणी । राऊळा आंगणी उभे होते ।।१।।
तेव्हा संतु तेली गेलासे दर्शना । पांडुरंग चरणा नमियेले ।।२।।”

गुरुदेव संत तुकारामजींनी “शेवटच्या क्षणी माती टाकण्यास येणार.” असे वचन संतशिरोमणी संताजींना दिले होते. परंतु गुरुवर्य हे शिष्योत्तमा आधीच वैकुंठाला गेले. असे म्हणतात की, जेव्हा संतश्रेष्ठ संताजी महाराज निरवर्तले, तेव्हा अंत्य संस्कारसमयी कितीही प्रयत्न केले तरी काही त्यांचे पार्थिव पूर्ण गाडले जात नव्हते, त्यांचा चेहरा वरच राहत होता. थोड्याच वेळात वैकुंठाहून जगद्गुरू संत तुकारामजी महाराज आपले वचन पूर्ण करण्यासाठी आले व त्यांनी तीन मुठी माती टाकल्यानंतर संतश्रेष्ठ संताजींचा नश्वर देह पूर्णपणे झाकला गेला. ती तिथी होती मार्गशीर्ष कृष्ण त्रयोदशी. महाराज आपल्याविषयी सांगतात –

“आम्ही तो आहोत या देशीचे वाणी । आम्ही तो विकितो तेल सौदा दोन्ही ।१।
तुका विकी सौदा आणिक मिरची । व संतु विकी तेल लावुनि चुरशी ।२।
तेल सौदा अवघा झाला संतु म्हणे । तुकयाशी खुण पटली असे ।३।”

[पवित्र घाण्यावरील अभंग : भाग सतरावा : अभंग क्र.८३.]
पुरोगामी संदेश परिवारातर्फे संतश्रेष्ठ संताजी जगनाडे महाराजांच्या समाजोद्धारक कार्य कर्तृत्वाला व अविस्मरणीय स्मृतींना विनम्र अभिवादन !

✒️लेखक:-‘बापू’ – श्रीकृष्णदास निरंकारी.
[सदस्य, विश्वबंधुत्व मिशन, मराठी साहित्यिक व संत तथा लोक साहित्याचे गाढे अभ्यासक.]
मु. प.पू.गुरुदेव हरदेव कृपानिवास,
रामनगर वॉर्ड नं.२०, गडचिरोली.
पो. ता. जि. गडचिरोली.
फक्त व्हा.नं.९४२३७१४८८३.
इमेल – krishnadas.nirankari@gmail.com