कट्यार काळजात घुसली !

40

[प्रभाकर पणशीकर स्मृतिदिन विशेष]

प्रस्तावना : नटश्रेष्ठ प्रभाकर पणशीकर तथा पंत हे मराठी रंगभूमीवरील अभिनेते, दिग्दर्शक आणि नाट्यनिर्माते होते. प्रल्हाद केशव अत्रे लिखित तो मी नव्हेच या नाटकात साकारलेल्या पाच वेगवेगळ्या भूमिकांमुळे ते संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले. इथे ओशाळला मृत्यू या संभाजीराजांच्या मृत्यूवर आधारित नाटकातील औरंगजेबाची भूमिका त्यांनी केली. त्यांनी स्थापन केलेल्या नाट्यसंपदा या नाटक कंपनीचे ‘कट्यार काळजात घुसली’ हे संगीतनाटक विशेष प्रसिद्ध झाले. त्यांनी त्यांच्या ५० वर्षांच्या कारकिर्दीत नाटकांचे सुमारे आठ हजारच्या वर प्रयोग केले. मराठीसोबतच गुजराती व कन्नड भाषेतील नाटकांतही त्यांनी अभिनय केला. चार मराठी चित्रपट, चार मराठी मालिका यांसोबतच एक इंग्रजी मालिका आणि रेडिओसाठी तर असंख्य नाट्यवाचने केली. त्यांनी पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे जनमन फुलविले –

“उगवला चंद्र पुनवेचा, दाही दिशा अशा फुलल्या !
कुमुदिनी जनीवनी फुलल्या !धृ!”
[नाटक : पाणी ग्रहण]

जन्म व प्रारंभिक जीवन : नटवर्य पणशीकर (१४ मार्च १९३१ मुंबई – १३ जानेवारी २०११ पुणे) यांचा जन्म मुंबईत फणसवाडी येथे वेद-विद्यासंपन्न ब्राह्मण कुटुंबात झाला. पंतांचे वडील विष्णुशास्त्री हे दशग्रंथी ब्राह्मण होते, तर त्यांचे आजोबा वासुदेवशास्त्री हे संस्कृतचे प्रकांड पंडित होते. लहानग्या प्रभाकरचा ओढा मात्र नाट्य क्षेत्राकडे होता. शाळेत असताना वेगवेगळ्या प्रसिद्ध नाटक कंपन्यांची नाटके त्यांनी पाहिली. एवढेच नव्हे तर ती नाटके पुढे गिरगावच्या गणेशोत्सवात सादर केली. त्यामुळे पौगंडावस्थेतच त्यांना घरापासून परागंदा व्हावे लागले. जसे –

“ॠणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी, भेटीत तुष्टता मोठी !धृ!
त्या कातरवेळा थरथरती अधरी, त्या तिन्ही सांजाच्या आठवणी त्या प्रहरी ।
कितीदा आलो गेलो रमलो, रुसण्यावाचुनि परस्परांच्या कधी न घडल्या गोष्टी !!”
[नाटक : देव दीनाघरी धावला]

दि.१३ मार्च १९५५ रोजी ’राणीचा बाग’ या नाटकाद्वारे नटवर्य प्रभाकर पणशीकरांनी मराठी रंगभूमीवर प्रवेश केला. वयाच्या पंचविशीत त्यांनी लेखक-दिग्दर्शक मो.ग.रांगणेकरांच्या ’नाट्यनिकेतन’ या संस्थेत प्रवेश केला आणि कुलवधू, भूमिकन्या सीता, वहिनी, खडाष्टक आदी नाटकांमधून अभिनयाची शानदार सुरुवात केली. आनंदाचा घोडा चौखूर उधळू लागला –

“हे सुरांनो, चंद्र व्हा । चांदण्याचे कोष माझ्या, प्रियकराला पोचवा ॥
वाट एकाकी तमाची, हरवलेल्या माणसाची । बरसुनी आकाश सारे, अमृताने नाहवा ॥”
[नाटक : ययाति आणि देवयानी]

भूमिका साकारलेली नाटके : अश्रूची झाली फुले, इथे ओशाळला मृत्यू, जेव्हा गवताला भाले फुटतात, तो मी नव्हेच, थँक यू मिस्टर ग्लाड, भटाला दिली ओसरी, विचित्रलिला, गारंबीचा बापू, अमृत झाले जहराचे, मला काही सांगायचंय, विज म्हणाली धरतीला, संत तुकाराम, विकत घेतला न्याय, महाराणी पद्मिनी, लागी कलेजवा कटार (हिंदी), होनाजी बाळा, बेईमान, प्रश्न नाजूक आहे, तो राजहंस एक, त्या कातरवेळी, तीन लाखाची गोष्ट, तुझी वाट वेगळी, मी मालक या देहाचा, अवनुनालल्ला (तो मी नव्हेचचे कानडी रूपांतर), किमयागार, घर अण्णा देशपांडेचे इत्यादी सांगता येतील.

लिहिलेली नाटके : अंधार माझा सोबती, अश्रूंची झाली फुले, संगीत – कट्यार काळजात घुसली, किमयागार, संत तुकाराम, पुत्रकामेष्टी, संगीत – मदनाची मंजिरी, संगीत – सुवर्णतुला आदी आहेत.

सत्कार व पुरस्कार : आचार्य अत्रे पुरस्कार, उत्तुंग पुरस्कार, कलाश्री पुरस्कार, डॉ.काशीनाथ घाणेकर स्मृती पुरस्कार, नटश्रेष्ठ केशवराव दाते पुरस्कार, जागतिक मराठी परिषद पुरस्कार, नटवर्य दत्ताराम पुरस्कार, दीनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कार, नवरत्‍न पुरस्कार, संगीत नाटक अकादमी पुरस्कार, नाट्यगौरव सुवर्ण पुरस्कार, नाट्य दर्पण-वर्षाचा मानकरी, नटसम्राट नानासाहेब फाटक स्मृती पुरस्कार, महाराष्ट्र गौरव पुरस्कार, महाराष्ट्रभूषण पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा पहिला जीवन गौरव पुरस्कार, नंतर या पुरस्काराचे ‘प्रभाकर पणशीकर पुरस्कार’ असे नामांतर करण्यात आले. नटसम्राट बालगंधर्व स्मृती पुरस्कार, रत्‍नप्पा कुंभार पुरस्कार, विष्णुदास भावे सुवर्णपदक, राजर्षी शाहू सुवर्णपदक इत्यादींचा समावेश आहे. वाईट दिवस संपून चांगल्याची चाहूल लागते तसे –

“रात्रीचा समय सरुनि । होत उषःकाल हा,
प्रिये पहा, प्रिये पहा ।।”

नाट्यसंपदा संस्था : पुढे मो.ग.रांगणेकरांशी मतभेद झाल्यानंतर पंत ’नाट्यनिकेतन’ मधून बाहेर पडले. अत्रे थिएटर्समधून ’तो मी नव्हेच’चे प्रयोग सादर करू लागले. आपले स्नेही मोहन वाघ आणि वासुदेव कोल्हटकर यांच्या मदतीने त्यांनी इ.स.१९६३ साली ’नाट्यसंपदा’ या संस्थेची स्थापना केली. विद्याधर गोखले लिखित ’अमृत झाले जहराचे’ आणि वसंत कानेटकर यांचे ’मोहिनी’ अशी दोन नाटके नाट्यसंपदेने रंगमंचावर आणली. दुर्दैवाने ती फारशी चालली नाहीत. मात्र त्यानंतरच्या ’मला काही सांगायचंय’ आणि विशेषत: ’इथे ओशाळला मृत्यू’ या नाटकांच्या निर्मितीने नाट्यसंपदेला स्थैर्य, आर्थिक यश आणि प्रसिद्धी मिळवून दिली. ’कट्यार काळजात घुसली’ या सुप्रसिद्ध संगीत नाटकाने तर इतिहास घडवला. इ.स.१९७० मध्ये ’तो मी नव्हेच’चे हक्क संस्थेने विकत घेऊन पुढे या नाटकाचे पंतांनी दोन हजारहून अधिक प्रयोग केले. नाट्यसंपदा या संस्थेने त्यांची अश्रुंची झाली फुले, कट्यार काळजात घुसली आणि संत तुकाराम ही तीन नाटके एकाच दिवशी तीन नाट्यगृहांत लावून एक न मोडण्यासारखा विक्रम प्रस्थापित केला. आता बघा की –
“या भवनातील गीत पुराणे ।मवाळ हळवे सुर जाउ द्या, आज येथुनी दुर !!

भाव भक्तिची भावुक गाथा, पराभुत हो नमविल माथा !
नवे गीत अन नवे तराणे, हवा नवा तो नुर !!”
[नाटक : कट्यार काळजात घुसली]

समापण व समर्पण : तीन दशक मराठी रंगभूमी गाजवणारे ज्येष्ठ रंगकर्मी प्रभाकर पणशीकरांनी वयाच्या ७९व्या वर्षी दि.१३ जानेवारी २०११ रोजी गुरुवारी रात्री मृत्युला कवटाळले. असा मोहरा होणे नाही, परंतु तशी आस मनी बाळगणे काळाचीच गरज. त्यांना व त्यांच्या हरहुन्नरी कर्तृत्वाला पुरोगामी संदेश परिवाराचे विनम्र अभिवादन !

✒️लेखक:-श्री कृष्णकुमार निकोडे गुरुजी.
( मराठी साहित्यिक तथा संत व लोक साहित्याचे गाढे अभ्यासक)
मु. पिसेवडधा, पो. देलनवाडी,
ता. आरमोरी, जि. गडचिरोली.
मो. नं. ७७७५०४१०८६.
email – nikodekrishnakumar@gmail.com