दिवंगत कवी बळीरामजी धकाते यांच्या कविता ग्राम परिवर्तनाचा विचार देणाऱ्या – बंडोपंत बोढेकर

31
✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

गडचिरोली(दि.13जानेेवारी):- थोर तत्त्वज्ञ वं. राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराज यांच्या विचार साहित्याने प्रभावित राहिलेले दिवंगत कवी बळीरामजी धकाते यांच्या संपूर्ण कविता जनसामान्यांना परिवर्तनवादी विचार देणाऱ्या आहे. हाक नव क्रांतिची या काव्यसंग्रहातून त्यांनी आपले भावविश्व उलगडत झाडीपट्टीतील जनसामान्यांच्या वेदना मांडल्या, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक तथा ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी केले.राष्ट्रसंत विचार साहित्य परिषद आणि डिजीटल महाभारत युट्युब न्युज चॕनेल यांच्या संयुक्त सहकार्याने आॕनलाईन पध्दतीने दिवंगत ज्येष्ठ कवी बळीरामजी धकाते यांच्या चौथ्या स्मृतीदिनानिमित्ताने ‘बळीरामजी धकाते व्यक्ती आणि वाड्मय ‘ ह्या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते, त्याप्रसंगी बंडोपंत बोढेकर बोलत होते.

श्री. बोढेकर पुढे म्हणाले , ज्येष्ठ कवी धकाते यांनी आपल्या जीवनात गरीबीचा काळ अनुभवला. संघर्षातून ते पुढे आले. उत्तम शिक्षण घेत गडचिरोली ,चंद्रपूर आणि वर्धा ह्या जिल्ह्यातील दुर्गम भागात शिक्षक म्हणून उत्तम शैक्षणिक सेवा दिली. वेगवेगळ्या शाळेत आणि शिक्षण विभागात इंग्रजी , भूगोल , राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि नैतिक शिक्षण तज्ज्ञ म्हणूनही त्यांनी केलेले कार्य कौतुकास्पद होते . शालेय जीवनापासूनच ते काव्यलेखन करीत असे. त्यासोबतच त्यांनी स्वतःला श्रीगुरूदेव सेवा मंडळाच्या रचनात्मक कार्यास जोडून घेतले होते . गडचिरोलीचे प्रथम नगरसेवाधिकारी तसेच अ.भा. श्रीगुरूदेव सेवामंडळाचे मध्यवर्ती प्रतिनिधी म्हणूनही त्यांनी सेवा कार्य अव्याहतपणे सुरू ठेवले होते . या सेवा कार्यासोबतच सातत्याने त्यांनी लेखनही सुरू ठेवले.
त्यांनी लिहिलेली वैनगंगेची धार आणि हाक नव क्रांतीची ही दोन्हींही काव्यसंग्रह प्रबोधनात्मक आहे.त्यांच्या आयुष्यातील भ्रमंतीत आलेले जीवनानुभव , राष्ट्रसंताना अपेक्षित ग्रामपरिवर्तन , झाडीमंडळाचे निसर्ग सौंदर्य त्यांच्या काव्यलेखनात प्रामुख्याने दिसून येतात, असे बोढेकर म्हणाले .बळीरामजी धकाते यांच्या स्मृतीदिनानिमित्ताने त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्तविक उदय धकाते यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ. सुचिता धकाते यांनी केले.