शेतकऱ्यांच्या संघर्षाची मशाल अजूनही ज्वलंत आहे !

“देश के किसान एक हो… देश के किसान एक हो”
” संघर्ष शेतकऱ्यांचा ” रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिखित दिग्दर्शित नाटकाचे संवाद आज माझ्यासमोर प्रत्यक्षात येत आहेत. आज संपूर्ण देश शेतकऱ्यांच्या सविज्ञ आंदोलनांने पेटला आहे. सुन्न झालेल्या समाजात, आजवरच्या इतिहासातील सर्वात मोठे शेतकरी आंदोलन दिल्लीत सुरू आहे. मागील दिवसांपासून आपल्या देशाचे अन्नदाता, देशभरातील शेतकरी केंद्र सकारने जाहीर केलेल्या शेतकरी विरोधी कायद्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरले आहेत.दिल्लीच्या हाडही गोठवणाऱ्या थंडीत संसदेला चहुबाजूंनी शेतकऱ्यांनी घेरले आहे.

सत्तेच्या दरबारात आपली अस्मिता विकेलेला मीडिया याची अपेक्षित अशी दखल घेत नाही आहे,व शेतकरी आंदोलना विषयी ते सत्याऐवजी भ्रम पसरवत आहेत.हे शेतकऱ्यांचे आंदोलन केवळ शेतीविषयक मागण्यांपुरते मर्यादीत राहिलेले नाही, तर हा शेतकऱ्यांचा संघर्ष आहे, भांडवलशाही सरकार व त्यांच्या सत्तेला समूळ उखडून टाकत आहे. त्या आंदोलनाला रंगचिंतक मंजुल भारद्वाज यांच्या काव्य रचना वैचारिक दिशा देत आहेत, शेतकऱ्यांना आपल्या नीतिगत तात्विक लढ्यासाठी पेटवत आहेत.

हे भूमीपुत्रांनो, तुम्हाला सलाम
-मंजुल भारद्वाज

हे भूमीपुत्रांनो, तुम्हाला
सलाम
आपल्या शेतातील बांधाला ओलांडून
आपले गाव सोडून
हातात न्यायाचा पताका घेऊन
आपल्या हक्कासाठी
विकासाच्या वाटेवर चालणाऱ्या
तुमच्या पावलांच्या तालावर
गुंजणाऱ्या तुमच्या धाडसाला सलाम!
आज विस्कळीत
विकारग्रस्त
व्यक्तीवादाच्या पकडीत
अडकलेल्या समाजात
तुमच्या संघटित ताकदीला सलाम !
हे मातीच्या पुत्रांनो आता केवळ
हाकिमला मागणी पत्र देऊन थांबू नका,
जुमला ऐकून वाहत जाऊ नका,
डिजिटल इंडियाच्या कारभाराच्या जाळ्यात अडकू नका,
आज आरपारच्या लढाई मध्ये चुकू नका
मनमानी
विवेकशून्य बहुमताच्या आकड्यांच्या
धुंदीत पारित केलेल्या,
भांडवलदारांना तुमचे स्वातंत्र्य विकणाऱ्या
काळ्या कायद्याला रद्द करूनच
श्वास घ्या !
“आत्ता नाहीतर कधीच नाही”
“करु किंवा मरु”
“अभी नहीं तो कभी नहीं”
“करो या मरो”
“जेल भरो”
हुकूमशहाला उखडून फेका !
आज भूमी पुत्रांनों तुम्हाला
तुमचा अधिकार दाबणाऱ्या
हरएक हाकीमा सोबत लढायचे आहे,
तुम्हाला त्या मीडियालाही निशाणा करायचे आहे
जी तुम्हाला व तुमच्या संघर्षाला नाकारते..
जागतिकीकरणाच्या राक्षसाला दैवी आशीर्वाद देणाऱ्या
सेन्सेक्सलाही पालटे करायचे आहे !
तुमचा लढा फक्त एमएसपी आणि कर्जमाफी करण्या इतपतच मर्यादित राहिला तर तुमची शेतजमीन व धान्याचे कोठारं स्मशानभूमी होत राहतील ! तुम्हाला शोषणाच्या मुळाला लक्ष्य करायचे आहे !आणि आता आपल्या पिकाची किंमत स्वतःच ठरवायची आहे !केंद्रात बसलेल्या तुमच्यावर उपकार करून भिकेचे तुकडे फेकणाऱ्यांकडून सत्ता काढून घ्यायची आहे.
पण त्यासाठी तुम्हाला स्वतःशी लढायचे आहे,
आपल्यातील जातीवादाला परास्त करायचे आहे,
आत बसलेल्या धर्माच्या ढोंगीपणावर विजय मिळवायचा आहे.
तुमच्या आत बसलेल्या सरंजामी ‘खाप’ सोबत लढायचे आहे..
तुमच्या खांद्याला खांदा लावून उभ्या असलेल्या महिलेला,
आपल्या बरोबरीची हिस्सेदार हा
सन्मान द्यायचा आहे.
आणि तुम्ही हे करू शकता ..
यासाठी आपल्याला बाहेर नाही
स्वत: सोबत लढायचे आहे.
हे क्रांतिवीरांनों स्मरण राहू दे
जगातील प्रत्येक क्रांतिकारकाला
पहिलं स्वतःशीच लढायचे असते.
मग ते गांधी, नानक, बुद्ध असोत
जोपर्यंत ते स्वत: वर विजय मिळवत होते,
तोपर्यंत क्रांतीचा परचम फडकवत राहिले आहेत !
मी तुमच्याकडून खूप आशा करतो
या जागतिकीकरणाच्या गुलामीच्या काळात या कॉर्पोरेट लूट आणि भांडवलाच्या नंग्या नाचात
विकासाच्या मार्गावर न्यायाचा पताका घेऊन
तुमची पावले क्रांतीचा ताल ठोकत आहे.
हे मातीच्या पुत्रांनो या तालीची लय स्वतः ऐका
याला निव्वळ मागण्या पूर्ण करण्याचा मोर्चा नाही तर
आता संपूर्ण क्रांतीच्या आंदोलनाचे गीत व्हा !

रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिखित हे भूमीपुत्रांनो, तुम्हाला सलाम ही काव्यरचना शेतकऱ्यांच्या आंदोलनाला वैचारिक बळ देणारी आहे. आपल्या भारतीय संस्कृतीचे मूळ आत्मबोध व आत्मशोधात आहे. क्रांती घडवून आणण्यासाठी सर्वात महत्वाचे आहे स्वतःशी लढा देणे, स्वतःचा आवाज ऐकणे हा शेतकऱ्यांचा आवाज आज लोकशाहीचा,संविधानाचा हुंकार आहे, एल्गार आहे.

आज समाज सत्याला मानणारा नाही, आज समाज विचारांना जाणणारा नाही, आज समाज प्राकृतिक, नैसर्गिकतेला मानणारा नाही. समाज आज भ्रम , विकार, द्वेष आणि कृत्रिमतेवर जगणारा आहे.परजीवी शहरात राहणाऱ्यांना परजीवींना वाटत होते की आमचा आणि शेतकऱ्यांचा काय संबंध ? त्या समाजाच्या आत्म्याला शेतकऱ्यांनी हादरवले. त्या समाजाने विचार करण्याची गरज आहे की, तरूणांना रोजगाराची हमी दिली होती, रोजगार न मिळाल्याने तरुण-तरुणी रस्त्यांवर उतरले होते, लॉकडाऊन मध्ये सरकारच्या विरोधात सत्याग्रह करीत मजूर रस्त्याने पायी चालत निघाले होते. देशात महिलांची अवस्था काय आहे ? आपल्याला ठाऊक आहे.बलात्कार करून एक रात्रीत महिलेला प्रशासन जाळून टाकते आणि आज शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत,उद्या आपली म्हणजे मध्यमवर्गीयांची वेळ असणार आहे. हे लक्षात असावे की सरकार जनतेसाठी आहे भांडवलदारांसाठी नाही आणि सरकार अशाच पद्धतीने बहुमताच्या जोरावर असंविधानिक कृती करू लागले, तर याचा सर्वात जास्त परिणाम मध्यमवर्गीय समाजावर होणार आहे. याचा विचार करून आज संपूर्ण समाजाने शेतकऱ्यांना पाठिंबा द्यायला हवा, त्यांच्या सोबत उभे राहायला हवे.

सरकार म्हणते की, शेतकऱ्यांना काही कळत नाही कोणीतरी त्यांची दिशाभूल करत आहे. असं म्हणणारी सरकार आणि त्यांच्या म्हणण्याला दुजोरा देणारे समर्थक देशासोबत नाही आहेत.हे जनतेला जितक्या लवकर कळेल तितकेच देशाचे संविधान बळकट होईल. हा लढा शेतकऱ्यांचा नाही तर आपल्या सगळ्यांचा आहे. इथे कलाकार आणि शेतकऱ्यांचा थेट संबंध आहे कारण शेतकरी मातीला नांगरतात, बीज पेरून धान्य उगवतात तसेच कलाकार प्रेक्षकांच्या मेंदूला नांगरतात व त्यात विचारांचे बीज पेरतात. हि दृष्टी मला थिएटर ऑफ रेलेवंस नाट्य सिद्धांताने दिली.

या प्रसंगी कलाकार म्हणून 18 फेब्रुवारी 2016 रोजी आम्ही आमची भूमिका घेतली होती. “संघर्ष शेतकऱ्यांचा” हे रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिखित – दिग्दर्शित नाटकाने शेतकऱ्यांना पेटवले होते.

आपला देश शेतकऱ्यांमुळे आत्मनिर्भर आहे, कारण शेतकरी आपल्या संस्कृतीचे व अर्थव्यवस्थेचे मूळ आहे. आतापर्यंत हेच होत आले कि, शेतकरी आणि त्यांचे प्रश्न सरकार आणि व्यवस्थेने जाणून बुजून बाजूला केले. केंद्रसरकारचे हे तीन कायदे शेतकऱ्यांना अस्तित्व विहीन करणारे आहेत का ?
भांडवलदारांच्या दावणीला शेतकऱ्याला बांधण्याचे सरकारचे षडयंत्र आहे का ? याचा विचार समाजाने करावा व सरकारनेही यावर विचार मंथन करावे. या आंदोलनात कडाक्याची थंडी व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे बळी जात आहेत,तरीही शेतकरी आंदोलन सुरू आहे.
प्रतिरोध लोकतंत्र की आग़ है
-मंजुल भारद्वाज

जलती आग़ में
लकडियाँ डालना बंद कर दो
तो आग़ धीरे धीरे बुझ जाती है
अंगारे थोड़ी देर तक
लाल रहते हैं
फ़िर मुरझा कर
राख़ का ढेर हो जाते हैं
राख़ हवा से बिखर जाती है
प्रतिरोध लोकतंत्र की आग़ है
आन्दोलन उस आग़
जलाए रखने वाली लकड़ियाँ हैं
जो लोकतंत्र को राख़ का
ढेर नहीं बनने देती
किसी तानशाह की सनक से
बिखरने नहीं देती!

जागतिकीकरणाचा परिणाम मानवी मूल्यांना नष्ट करण्यासोबत असाही झाला की, लोकशाहीच्या मूल्यांचा ऱ्हास होत आहे. म्हणूनच आज प्रत्येक प्रतिरोधाच्या आवाजाला दाबले जात आहे किंवा त्यांना देशद्रोही हा करार दिला जात आहे.वरील काव्यरचना प्रतिरोधाच्या ठिणगीने क्रांतीची मशाल पेटवत आहे व प्रतिरोध लोकशाहीचा प्राण आहे, हा विचार दृढ करीत आहे. शेतकरी आंदोलन शेतकऱ्यांचा प्रतिरोध आहे.
महिला शेतकरी सोबतीने या लढ्यात सामील झाल्या आहेत. त्या आपल्या असण्याने लोकशाही मजबूत करीत आहेत.

बदलाव की बयार !
( परिवर्तनाचे वारे )
-मंजुल भारद्वाज

जेव्हा जेव्हा
भुमिपुत्रींनी प्रण केला
तेव्हा तेव्हा
जगाला बदलून टाकले

चुलीची आग
जेव्हा बनली मशाल
तेव्हा भडकली चहुकडे क्रांतीची ज्वाला !

निघ गद्दार
सोड सत्ता,हो फरार
ए, भांडवलदारांच्या दलाला
आता रणांगणात उतरली
भारताची कन्या !

छद्मी राष्ट्रवाद्यांनो खबरदार
संघी विकारी जन हो
सावधान
भुमिपुत्रींची ही ललकार
आहे वादळाचा हुंकार

मराठी अनुवाद : स्वप्नजा घाटगे.

प्रतिरोधाच्या रंगदृष्टीतून उभारलेल्या “थिएटर ऑफ रेलेवंस” नाट्य सिद्धांताने शेतकरी म्हणजे देशाचा मालक हि त्यांची खरी ओळख “संघर्ष शेतकऱ्यांचा” या नाटकाच्या माध्यमातून समाजापुढे ठेवली. वरवर मलमपट्टी न करता शेतकऱ्यांच्या मूळ प्रश्नांना या नाटकाने चालना दिली. आपला देश शेतीप्रधान आहे. मग भांडवलशाही सरकार का राबवली जाते ? हरित क्रांति ने खरच क्रांती घडली की नुकसान झाले ?…देशात दुष्काळ असतानाही शेतकऱ्यांनी आत्महत्या केली नव्हती, मग आताच का करत आहेत ? अशा असंख्य प्रश्नांना या नाटकाने चिन्हांकित केले. वाढत्या औद्योगिक क्रांति मुळे बिघडलेले निसर्गाचे चक्र ..भांडवलदारांचा वाढत चाललेला मोह, त्यांच्या लालसेने बिघडत चाललेले तंत्र ..ग्लोबलाइजेशनच्या नावाखाली नष्ट होणारी विविधता ..रासायनिक खतांचा अतिरेक, पाण्याचा विध्वंस याने शेतीवर होणारा थेट परिणाम, हि कारणे शेतकऱ्याला आत्महत्येच्या दिशेने नेतात.भांडवलशाही सरकारनीती मुळे शेतकऱ्याची अशी अवस्था आहे. शेतकरी शेत पिकवतो आणि भारतीय शेती पूर्णपणे निसर्गावर अवलंबून आहे.

तर सरकारने पूर्व दक्षणीय पाऊले उचलायला हवी जेणे करून निसर्गाच्या आपत्तीमुळे पिकाचे नुकसान झाले तर त्याची भरपाई मिळेल पण सरकार याउलट रस्ते बांधकाम आणि आंतराष्ट्रीय बाजारपेठ स्थापन करीत आहे. अशा या बाजारीकरणाच्या, भांडवली व्यवस्थेत संघर्ष शेतकऱ्याचा “ हे केवळ नाटक न राहता एक चळवळ म्हणून उभी राहिली. भांडवलशाही सरकार विरोधात आंदोलन उभे राहिले. ज्याप्रमाणे आंतराष्ट्रीय कंपन्या आपल्या उत्पादनाप्रमाणे स्वतःची किंमत ठरवतात, त्याप्रमाणे शेतकऱ्याने स्वतःच्या पिकाचा दर स्वतः ठरवावा, हि दृष्टी शेतकऱ्यांना या नाटकाने दिली. भांडवशाही व्यवस्थेच्या पलीकडे आपल्याला संविधानिक व्यवस्था निर्माण करायची आहे आणि हे शेतकरी आंदोलन नक्कीच या न्यायसंगत व्यवस्थेच्या निर्माणाची सुरुवात आहे !

तिरंगे
-मंजुल भारद्वाज

माझ्या देशाच्या शेतकऱ्यांनो
तुम्ही देशाचा अभिमान
तुमच्या रंगाला सलाम
तिरंग्याला सलाम
तुमच्या बलिदानावर
केसरीया कुर्बान
तुमच्या शांतीवर
धवल मेहरबान
हिरवा म्हणतो आहे
शेतकरी माझी शान
त्याग, शांती आणि समृद्धी
दूर व्हावी देशाची दुर्दशा
हे भूमीपुत्रांनो
तुम्हांला सलाम
-मंजुल भारद्वाज
मराठी अनुवाद : स्वप्नजा घाटगे.

✒️लेखिका:-सायली पावसकर
थिएटर ऑफ रेलेवन्स रंगकर्मी व अभ्यासक
संपर्क : pawaskarsayali31@gmail.com/

महाराष्ट्र, लेख, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED