जपू या,स्त्री पुरुष मैत्री

24

मैत्रीबद्दल अनेक कविता ,लेख,कथा लिहिल्या जातात. या विषयावर अनेक चित्रपट बनले आहेत.अतिशय आवडते व हृदयाशी जोडलेले नाते असते ते मैत्रीचे.मैत्री कधीही,कोठेही,कुणाहीसोबत होऊ शकते. तिला वयाचे,जातीचे,श्रीमंत- गरीब, शिक्षित- अशिक्षित,लहान- मोठे,सुंदर- कुरूप असले कोणतेही बंधन नसते .ह्या सर्वांच्या पलीकडे होते ती मैत्री. मन जुळलीत , विचार पटले की अगदी सहजासहजी होते ती मैत्री.मुलींची अथवा महिलांची किव्हा मुलांची अथवा पुरुषांची मैत्री ह्या बद्दल सर्वांसमोर सहज बोलले जाते. तासंतास जरी बोलले, फिरायला गेले तरी त्याचे कुणालाही काही वाटत नसते.मात्र ! जर एक मुलगा व मुलगी किंवा एक महिला व पुरुषाची मैत्री असणे ह्याला आजही आपल्या समाजात मान्यता नाही.त्यांच्याकडे संशयित नजरेने बघितले जाते व अनेक गोष्टी उगाच रंगवून गैरसमज पसरवले जातात.एक वेळ मुलाची व मुलीची मैत्री समजून घेतली जाते.

मात्र स्त्री व पुरुषाची निर्मळ मैत्री असूच शकत नाही हा सर्वात मोठा गैरसमज आहे .खरे तर नोकरी करताना किंवा एखादे काम करताना स्त्री व पुरुष सहकारी असतात, दोघांना मिळून एकत्र काम करावे लागते. त्यामुळे एकमेकांच्या संपर्कात रहावे लागते, बोलावे लागते. ह्यात काय गैर आहे ? मात्र लोकांच्या नजरा आज ही बदल्या नाही. स्वतःला आधुनिक म्हणवणारे ,आधुनिक विचार करत नाही ह्यची खंत वाटते. नवरा बायकोचे नाते हे विश्वासावर अवलंबून असते .काही जोडप्यांना ही मैत्री मान्य असते .ते आपल्या जोडीदाराला स्वतःची स्पेस देतात. त्यामुळेच त्यांचे नाते अधिक घट्ट असते कारण ते विश्वासाने विणले व जपले जाते. परस्परांमध्ये असलेला हा समजूतदारपणा त्यांचे आयुष्य अधिक सुंदर बनवतो .पण फार कमी स्त्री अथवा पुरुष असतील जे स्पष्टपणे सांगतात की हा माझा मित्र आहे किंवा ही माझी मैत्रीण आहे ,अशी घरच्यांना सहज ओळख करून देतात.खरे तर अशी ही निर्मळ मैत्री असू शकते जेथे दोघेही आपापली कौटुंबिक जबाबदारी चोख निभावतात व मैत्री ही जपतात. दोघांमध्ये खूप छान बॉंडिंग असते.ते छान गप्पा गोष्टी करतात. सुख दुःखात वाटेकरी असतात.

एकमेकांना समजून ही घेतात.आनंदाची बातमी प्रथम ज्याला सांगावी असे होते किंवा आपले दुःख सांगून हलके वाटते. आपल्या हातून घडलेली एखादी चूक कबुल करताना कोणतीही खंत वाटत नाही. कमीपणा जाणवत नाही. आपले सीक्रेट देखील ज्याबरोबर शेअर केले जाऊ शकते . कारण पूर्ण खात्री असते की ती गोष्ट केवळ त्या दोघांमध्येच राहील व तीच व्यक्ति आपल्याला समजू शकते. असे नाते असते ते केवळ मैत्रीचे. दोघांच्या घरात जेव्हा त्या मैत्रीबद्दल माहित असते तेव्हा ती अधिक बहरते व अधिक फुलते.येथे कोणतीही लपवाछपवी करावी लागत नाही. अशी मैत्री निरागस व निस्वार्थी असते. ह्या मैत्रीत न कोणत्या अपेक्षांचे ओझे असते ना कोणतेही बंधन असतात. मात्र एक मर्यादा नेहमीच असते. आपल्यामुळे कधीही कोणाचे मन दुखावले जाऊ नये ह्याची काळजी घेतली जाते. कारण त्याचे दुःख पहावले जात नाही. एकच इच्छा असते की त्याचे हास्य कोणीही हिरावून घेऊ नये. त्याच्या नकळत केवळ त्याच्या आनंदासाठी काही गोष्टी केल्या जातात. मैत्री कधीही ठरवून केली जात नाही. ती सहज जुळते. पण अनेकवेळा स्त्री पुरुषाशी मैत्री करण्याचे टाळते.

मात्र, त्यातून मोठा गैरसमज होतो की ती स्त्री फार शिष्ठ आहे ! मात्र त्याला तिची काही वैयक्तिक कारणे असतात . तिच्या नवऱ्याला ही मैत्री अजिबात मान्य नसते .त्याचे विचार मागासलेले व संकुचित असू शकतात. त्यामुळे ती ही मैत्री नाकारते .स्वतःला तिच्या जागी ठेवून पहा मग तुमच्याही लक्षात येईल की स्त्री वाटते तेवढी आजही स्वतंत्र नाही. बऱ्याच गोष्टी तिच्या हातात नसतात. अनेक स्त्रिया तर पूर्णपणे आपल्या जोडीदारावर अवलंबून असतात. उगाच आपल्यात भांडणे नको ,उगाच आपल्या कुटुंबाला काहीही त्रास नको ,आपले काम भले व आपले कुटुंब भले अशी तिची विचारसरणी असते.त्यामुळे कधीही स्त्रीने तुमची मैत्री नाकारली तर गैरसमज न करता तिच्या दृष्टीने विचार करा. तुमचे मत नक्कीच बदलेल ह्यात शंका नाही.अनेक वेळा ह्या सोशल मीडिया मुळे तिची फसवणूक ही होऊ शकते. कारण पुरुषाचा तिच्याशी मैत्री करण्यामागे काय हेतू आहे हे समजणे फार कठीण असते.

त्यामुळे स्त्री अनोळखी पुरुषाशी कधीही बोलत नाही, मैत्री करत नाही.आपला परिचय असलेल्या व्यक्ती बरोबरच ती बोलते.सर्व पुरुष वाईट असतात अथवा सर्व स्त्रिया बरोबर असू शकतात असे ही नाही. मात्र पवित्र मैत्री दीर्घकाळ टिकून राहते कारण त्यात शुद्ध व प्रामाणिक हेतू असतो. जेथे दोघेही मन सांभाळत एकमेकांना दुखवत नाही व भावनांचाही आदर राखला जातो. आपल्यामुळे आपला मित्र अथवा मैत्रीण दुखावली जाऊ नये हीच एकमेव इच्छा असते.आपल्यामुळे त्यांच्या कुटुंबाला कधीही तडा जाऊ नये त्यांनी नेहमी त्यांच्या कुटुंबाला व कामाला प्रथम प्राधान्य द्यावे त्यांची प्रगती व्हावी असे मनोमन वाटत असते हीच तर खरी मैत्री असते.ही मैत्री एवढी पारदर्शक असते जी विश्वासावर टिकुन आजन्म साथ देते. स्त्री व पुरुष मैत्री हा अतिशय नाजूक विषय आहे. मात्र जर दोघांचाही दृष्टीकोन स्वच्छ असेल, दोघेही समविचारी असतील तर ही मैत्री त्यांच्या सुखी व आनंदी आयुष्याची सर्वात मोठी भागीदारी ठरेल.ही मैत्री म्हणजे खूप मोठा आधार असेल जे तुम्हाला चूका करण्यापासून सावध करेल व योग्य निर्णय घेण्याचे बळ देईल.

जेव्हा लोकांचा ह्या मैत्रीकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलेल तेव्हा जीवनात खूप मोठे सकारात्मक परिवर्तन घडेल. आपल्या हक्काची व्यक्ती कायम आपल्याला सोबत करेल ह्याहून सुंदर अजून काय असू शकते ? कारण तिच्या अस्तित्वाचे आपल्या जीवनात मोलाचे स्थान असेल.निर्मळ मनाने व स्वच्छ अंतःकरणाने केलेली मैत्री ही आयुष्यभर साथ देते .कारण ह्या मैत्रीस परमेश्वराचे आशीर्वाद लाभलेले असतात.आता तुम्हीच पहा की, एवढ्या लोकांच्या गर्दीत अमुक एका व्यक्तीशी आपली ओळख होणे हे सर्व विधी लिखित असते नाही का ? मैत्रीमुळे जीवनाचा खरा सार उमगतो. ते सूर गवसतात जे आनंदी रहायला शिकवतात. आजपर्यंत न केलेल्या गोष्टीही करू लागलो . स्वतःसाठी जगायला शिकतो हीच खऱ्या मैत्रीची ताकद ठरू शकते.आयुष्य पहिल्यापेक्षा अधिक सुंदर भासू लागते जीवनात करण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत ह्याची नव्याने जाणीव होते ज्यासाठी हा एक जन्म देखील अपुरा आहे असे वाटू लागते. प्रत्येक क्षण भरभरून जगायला शिकवते अशी अदृश्य शक्ती असते ह्या मैत्रीमध्ये. ती जपा, ती सांभाळा . ह्याहून सुंदर नाते ह्या सृष्टीवर नाही.

✒️लेखन-रश्मी हेडे.

▪️संपादन -देवेंद्र भुजबळ.9869484800.