मातंगाचा संघर्ष, बलिदानाचा रक्तरंजित इतिहास नव्या पिढीपर्यंत घेऊन जाण्याची गरज – कॉम्रेड गणपत भिसे

32

✒️टेंभुर्णी(पुरोगामी संदेश नेटवर्क)

टेंभुर्णी(दि.15जानेवारी):- टेंभुर्णी, वाटेगाव, पुणे, शेंद्रा(औरंगाबाद) येथील बलिदान भूमी मातंग चळवळीची शक्तिपीठं असून या शक्तिपीठाकडे समाजाला वळवून लहुजी, फकिरा, गावंजी, पोचीराम आणि लढवय्या मातंगाचा संघर्ष, बलिदानाचा रक्तरंजित इतिहास नव्या पिढीपर्यंत घेऊन जाण्याची गरज असल्याचे मत लाल सेनेचे कॉम्रेड गणपत भिसे यांनी व्यक्त केले आहे.लाल सेनेच्या वतीने टेंभुर्णी तालुका नायगाव जिल्हा नांदेड येथे 14 जानेवारी रोजी नामांतर दिनानिमित्त ‘मातंग बलिदान परिषद’ घेण्यात आली. परिषदेचे उद्घाटन पत्रकार शाम कांबळे यांच्या हस्ते झाले. या परिषदेला कॉ. उत्तम गोरे, कॉम्रेड अशोक उबाळे, कॉम्रेड किशोर कांबळे, हनुमंत कंधारे, पत्रकार अंकुश कांबळे, विजय कांबळे, सारजा भालेराव, गिरजा कांबळे, आशा भिसे, कुमार आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी कॉम्रेड गणपत भिसे म्हणाले, नामांतराच्या लढ्यात मातंगाचे असलेलं बलिदान नव्या पिढीपर्यंत घेऊन जावून नवतरुणांना लढ्याची प्रेरणा देण्यासाठी मातंग बलिदान परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. देवाधर्माच्या चक्रव्यूहात अडकलेला समाज मोकळा करण्यासाठी ही शक्तीपीठं निर्णायक भूमिका बजावतील. याप्रसंगी पत्रकार श्याम कांबळे म्हणाले, नामांतराच्या लढ्यात शहीद झालेल्या पोचीराम कांबळे यांच्या समाधीवर आजपर्यंत कुणी नामांतर दिनी जात नव्हतं, नामांतर दिनी पोचीरामाच्या समाधीवर जावून पुष्प अर्पण करुन कुणीही अभिवादन करत नव्हतं, शहिदांकडे पाठ फिरवणे म्हणजे शहिदांचा अवमान आहे.

लाल सेनेने आजपासून सुरू केलेली अभिवादनाची परंपरा म्हणजे मातंग चळवळीला दिशा देण्याचे मिशन असून दलित-बहुजन युवकांमध्ये क्रांतिकारी विचार पेरण्याची प्रक्रिया आहे, लाल सेनेच्या समाजबदलाच्या मिशनमध्ये आपण सर्वांनी सहभागी होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पत्रकार कांबळे यांनी केलं आहे. सर्व प्रथम शहीद पोचीराम कांबळे आणि चंदर कांबळे यांच्या प्रतिमाना पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले, त्यानंतर वीर पोचीराम कांबळे यांच्या अर्धांगिनी धोंड्यामाय कांबळे यांना साडीचोळी आणि रोख रक्कम देऊन सन्मान करण्यात आला. परिषदेला नांदेड, लातूर, परभणी, औरंगाबाद जिल्ह्यातून प्रमुख कार्यकर्ते उपस्थित झाले होते.

परिषदेच्या यशस्वीतेसाठी कॉम्रेड अविनाश मोरे, आकाश बुरडे, विक्की गोरे, सुग्रीव वाघमारे, अशोक भाग्यवंत, प्रताप कांबळे आदींनी परिश्रम घेतले. परिषदेला सकाळ पासून येणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी केस करण्याची भिती दाखवून पळवून लावले आणि परिषद सुरू झाल्यानंतर देखील उपस्थित कार्यकर्त्यांना 149 च्या नोटीसा बजावण्याचा धडाका सुरू ठेवला होता त्यामुळे परिषदेत पोलिसांचा निषेध केला. परिषदेचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक लाल सेनेचे कॉम्रेड प्रकाश गायकवाड यांनी केले. दरवर्षी चौदा जानेवारीला टेंभुर्णीत पोचीरामाच्या समाधीस्थळी येवून अभिवादन आणि दिल्ली जवळ सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा असे दोन ठराव पास करून परिषदेची सांगता झाली.