सोन्याचा आकार बदलला तरी गुणधर्म कायम असतो !

41

▪️एक कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिक अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या नव्या नियुक्तीच्या अनुषंगाने त्यांच्या कार्यशैलीविषयी माहिती
………………………………..

नागपूर महानगरपालिका आयुक्तपदावरून बदली करण्यात आल्यापासून गेले चार महिने नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या तुकाराम मुंढे यांची राज्य मानवी हक्क आयोगाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. काही जण दबक्या आवाजात त्यांची मानवी हक्क आयोगातील ही नियुक्ती म्हणजे प्रशासकीय वर्तुळात दुय्यम दर्जाची असल्याचे कुजबुजतात.परंतु असे लोक सोन्याचा मुळ गुणधर्म विसरतात. सोनं अंगावर बाळगता न येणा-या म्हणजे बिस्कीटाच्या रुपात असो,कानातील झुमके, गळ्यातील साखळी, हातातील बांगड्या,नाकातील नथ,बोटातील अंगठी अथवा हातातील कंगन अशा कितीही आकारात बदलले, सोन्याच्या कितीही जागा बदलल्या तरी त्याचा गुणधर्म आणि त्यांचे महत्व कदापि कमी होत नाही.सोने ते सोनेच असते.तुकाराम मुंढे या सनदी अधिकाऱ्याच्या बाबतीतही हे उदाहरण अगदी चपखल आणि पक्के सिद्ध होते.

एक कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून प्रसिद्ध असलेले तुकाराम मुंढे हे कुठेही रुजू झाले तरी कायद्याच्या कक्षेत राहून काम करत असल्यामुळे आपल्या कर्तव्यतत्पर भूमिकेशी ते कधीच तडजोड करत नाहीत. त्यांनी नागपूर महापालिका आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर कायद्याची बूज राखत कामाचा धडाका सुरू केला होता. यामुळे त्यांचा महापौर आणि भाजपच्या इतर नगरसेवकांशी सतत संघर्ष सुरू राहिला.हाताची पाचही बोटं जरी सारखी नसली तरी घास तोंडांत जाताना ती एकत्रच होतात.या न्यायाने सर्व पक्षांतील सर्वजण त्यांच्याविरुद्ध उभे ठाकले. थोडक्यात कुठल्याही भिन्न पक्षात असले तरी कुरण चरायला मात्र सगळे पुढारी एकत्र होतात हे एक उघड गुपित आहे.

धडाकेबाज कर्तव्य दक्ष अधिकारी म्हणून तुकाराम मुंढे सर्वपरिचित आहेत. त्यांचे धाडसी निर्णय आणि कार्यशैलीमुळे ते नेहमीच वादग्रस्त ठरलेले आहेत. अवघ्या पाच महिन्यांपूर्वीच त्यांची नागपूरच्या पालिका आयुक्तपदावरून थेट महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सदस्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती.
तुकाराम मुंढे यांच्या आजवरच्या कारकीर्दीवर सहज जरी नजर टाकली तर त्यांच्या कार्यकाल पूर्ण होण्याआधीच होणा-या बदलीचे गूढ उकलते.पहिल्यांदा २००८ मधे नागपूर जिल्हा परिषदेवर तुकाराम मुंढे यांची सीईओ म्हणून नियुक्ती झाली. त्याच दिवशी त्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळांना भेटी दिल्या आणि गैहजर शिक्षकांचे निलंबन केले. प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय कारभारात अनियमितता दिसल्याने काही डॉक्टरांनाही त्यांनी निलंबित केले. सोलापूरचे जिल्हाधिकारी असताना कडक भूमिका घेऊन वाळू माफियांविरोधात कारवाईचा बडगा उगारला.

सामान्य नागरिकांचे हित आणि सुरक्षा डोळ्यासमोर ठेवून यात्रा समितीच्या मुजोरीला लगाम घातला. त्यावेळी त्यांना वाळू माफियांच्या रोषाचाही सामना करावा लागला. पंढरपूर मंदिर समितीच्या चेअरमनपदी नियुक्ती झाल्यानंतर मुख्यमंत्री सोडून इतर सर्व बड्या नेत्यांचे व्हीआयपी दर्शन त्यांनी बंद केले. हवशे-गवशे तर दूरच राहिले.तिथून त्यांची नवी मुंबईत महापालिका आयुक्तपदी बदली झाली.नवी मुंबईत दाखल झाल्यानंतर त्यांनी कुठल्याही राजकीय पक्षांची तमा न बाळगता अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरु केली असे करतांना वर्षोनुवर्षे ज्यांना कुणाची हात लावायची हिम्मत झाली नव्हती अशा अतिक्रमण आणि अनधिकृत ठिकाणी ही त्यांचा हातोडा आदळला. आणि तिथेच तुकाराम मुंढे सत्ताधाऱ्यांच्या निशाण्यावर आले.नवी मुंबईत त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणण्यात आला.

नवी मुंबईतून पुण्यात पीएमपीएमएल अध्यक्षपदी बदली झाली.पुण्यात गेल्यानंतर त्यांनी तोट्यात असलेल्या पीएमपीएमएलचा महसूल वाढवण्यासाठी अनेक ठोस पाऊले उचलली, विकासाच्या आड येणारे, अडथळे ठरणारे नियम बदलले आणि नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून सुविधा दिल्या. पण काम चोर पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांचे निलंबन आणि त्यात राजकीय हस्तक्षेप यामुळे त्यांची कारकीर्द पुन्हा एकदा वादात(?) चर्चेत आली.आणि त्यामुळे पुण्यातून तुकाराम मुंढे यांची बदली नाशिकला करण्यात आली. तिथे ते किमान एक वर्ष तरी पूर्ण करतील,अशी अपेक्षा होती. पण एका वर्षाच्या आतच त्यांची मंत्रालयात बदली करण्यात आली. काही कालावधी नंतर त्यांची नियुक्ती नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून करण्यात आली.नागपूर महापालिकेत आल्यावर वर उल्लेख केल्याप्रमाणे महापौर संदीप जोशी आणि भाजपच्या इतर सर्व नगरसेवकांच्या विरोधामुळे त्यांची आयुक्तपदावरून
बदली करून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सदस्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती.

पाणी आणि पाटबांधारे हे सतत संशयाच्या गर्तेत असलेले विभाग आणि मुंढे जर त्यात लक्ष घातले तर… ? यातील काही संभाव्य धोके ओळखून आणि वाद टाळून नेहमीप्रमाणे काही दिवसातच सरकारने त्यांच्या त्या बदलीचा आदेशही रद्द केला होता. तेव्हापासून तुकाराम मुंढे हे जवळपास चार महिने नियुक्तीच्या प्रतिक्षेत होते.अखेर बुधवारी राज्यातील काही आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा निर्णय सरकारने घोषित केला. त्यामध्ये तुकाराम मुंढे यांना अखेर राज्याच्या मानवी हक्क आयोगाच्या सचिवपदी नियुक्ती देण्यात आली आहे.
तिथे ही मुंढे आपला कर्तव्य करिश्मा दाखवतील यात शंकाच नाही.म्हणून म्हणावेसे वाटते सोनं कुठे ही ठेवले तरी ते सोनेच राहते.समाज असो वा देश उत्कर्ष आणि जडणघडणसाठी शिस्त असणे आवश्यक असते.आणि त्या कसोटीत तुकाराम मुंढे हे खरोखरच सरस ठरतात.आपल्या गरजा आवश्यकतेनुसार सिमीत ठेवल्या की कुठल्याच अधिक गोष्टींचा मोह निर्माण होत नाही आणि पुढे जाऊन भ्रष्टाचाराला वाट फुटत नाही हे मुंढेंनी अनेक वेळा प्रांजळपणाने सांगितले आहे.आज अशा प्रशासकीय अधिका-यांचीच देशाला खरी गरज आहे.
कर्तव्यदक्ष तुकाराम मुंढे यांच्या नवीन वर्षातील या नव्या पर्वाला हार्दिक शुभेच्छा !

✒️लेखक:-विठ्ठलराव वठारे(उपाध्यक्ष,पॉवर ऑफ मिडीया फाऊंडेशन महाराष्ट्र)