आवाज कुणाचा, आवाज जनतेचा, दाही दिशातून घुमला – राष्ट्रवादी ‘पुन्हा’

45

मागील काही दिवसात राष्ट्रवादीच्या दोन राजकीय व्यक्तीवर झालेल्या बलात्काराच्या आरोपांनी अवघा महाराष्ट ढवळून निघाला.औरंगाबाद शहरात शिकवण्या घेणाऱ्या एका तरुणीला नोकरी लावण्याचे आमिष दाखवून १४ नोव्हेंबरच्या रात्री ९ वाजण्याच्या सुमारास संबंधित तरुणीला राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख याने भेटण्यासाठी बोलवून घेतले आणि त्यानंतर गाडीत बसवून निर्जन ठिकाणी नेत बलात्कार केला, अशी तक्रार संबंधित तरुणीने औरंगाबादच्या सिडको पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार औरंगाबाद पोलीस ठाण्यात मेहबूब इब्राहिम शेख याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.सिडको पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.त्याची शाई वाळते न वाळते तेच सामाजिक न्यायमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा गंभीर आरोप केला आहे.त्या महिलेने ट्विटरवरुन धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले आहेत. त्यांनी धनंजय मुंडे यांनी बलात्कार केल्याचा आरोप करत ओशिवारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

या तक्रारीत मुंडे यांनी लग्नाचं अमिष दाखवून फसवणूक केली. तसेच बलात्कार करून शारीरिक शोषण केल्याचा आरोप केलाय. पोलीस सहकार्य करत नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. त्यानंतर सलग ट्विट करत पुन्हा काही प्रश्न उपस्थित केले आहेत. धनंजय मुंडे यांनी मला ट्विटरसहीत सगळीकडे ब्लॉक करण्यामागचं कारण काय? असा सवाल त्यांनी केला आहे. पोलिसात तक्रार दाखल करताच मुंडे यांनी पुन्हा अनब्लॉक केल्याचंही म्हटलं आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, शरद पवार, अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना देखील टॅग केले होते.दोन्ही प्रकरणे हाय प्रोफाइल असल्याने पोलिसांनी आरोपीना अटक केली नाही. १ जानेवारी रोजी औरंगाबाद पोलिसांनी मेहबूब शेख यांची चौकशी केली.

चौकशी केल्यानंतर मेहबूब यांना पोलिसांनी सोडून दिलं तसंच गरज पडल्यास पुन्हा चौकशीला बोलावलं जाईल, असंही पोलिसांनी सांगितलं.धनंजय मुंडेंवर आरोप करणाऱ्या महिलेचा आणि स्वतः धनंजय मुंडे यांचा जबाब मुंबई पोलीस नोंदवणार आहेत. जबाब नोंदवल्या नंतरच पुढे काय कारवाई होणार, यासंदर्भात निर्णय घेऊ असे जाहीर केले.

सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत की, एखादी महिला तिच्यावर झालेल्या अत्याचारांविरोधात तक्रार दाखल करत असेल, तर त्याबाबत तक्रार दाखल करुन त्यासंदर्भातील चौकशी तत्काळ सुरु करण्यात यावी.पोलिसांनी मात्र आधी चौकशी मग कार्यवाही किंवा अटक असा पवित्रा घेतला आहे. ह्या दोन प्रकरणात सुरु झालेला राजकीय शिमगा पाहता, दोन्ही तरुणीवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे.एवढेच नव्हे तर तपास सुरु असतानाच आरोपिंच्या समर्थनात सोशल मिडीया वर मोहीम देखील सुरु झाली आहे.काही ठिकाणी निवेदने आणि निदर्शने देखील करण्यात आली.जणू काही एक प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री पदावरील राजकीय व्यक्तीच ‘अबला’ असाव्यात असा त्याचा सूर आहे.दोन्ही ठिकाणी बलात्काराचे आरोप आहेत.दोन्ही पदाधिकारी सत्ताधारी राजकीय पक्षाचे पदाधिकारी आहेत.नैतिक जबाबदारी म्हणून निष्पक्ष चौकशी होई पर्यंत तरी पक्ष आणि मंत्री पदाचा राजीनामा घेणे गरजेचे होते.

मात्र तसे घडले नाही.धनंजय मुंडे प्रकरणी महिलेच्या वकिलानी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. पोलीस आम्हाला सहकार्य करत नाहीयेत,अर्ध स्टेटमेंट्स घेतलं आहे, कोर्टात जाऊ, सहा दिवस झाले तरी FIR घेतला जात नाही.मुंडें दबाव टाकत आहेत.तक्रारकर्त्या महिले विरुद्ध खोटे केस केलेजात आहेत.माझ्या (मुंडेंच्या) ताकदीची तुम्हाला कल्पना नाही, केस मागे घेण्यासाठी धनंजय मुंडेंकडून महिलेच्या कुटुंबावर दबाव टाकून धमकावल्याचा आरोपही तक्रारदार महिलेच्या वकिलाने केला आहे.तक्रारकर्त्या महिलेच्या भावाला आणि वहिनीला धमकी दिली गेली की तुझ्या बहिणीला तक्रार परत घ्यायला लाव नाहीतर तुझ्या परिवाराला खंडणीच्या गुन्ह्यात आतमध्ये टाकेल,पोलिसांनी अर्ध स्टेटमेंट घेतलं आणि पुन्हा बोलावलं.पोलिसांनी मीडियाला टाळत मागील दाराने बाहेर काढलं.दरम्यान, मागील एक वर्षात मेहबूब शेख यांचा तरुणीशी कुठलाही संपर्क झालेला नसल्याची माहिती औरंगाबाद पोलिसांनी दिलीय.

ह्या मध्ये मूळ तक्रार मागे पडली असून तर विवाहबाह्य संबंध गुन्हा आहे की नाही ?, द्विभार्या प्रतिबंधक कायदा लागू होतो का ? ह्या वर चर्चा सुरु आहे.करणी सेनेने तर ह्याला चक्क हिंदू मुस्लिम रंग दिला आहे.महाराष्ट्र करणी सेनेने धनंजय मुंडे यांची जाहीर पाठराखण करीत, “मुस्लिम व्यक्ती चार विवाह करू शकतात तर हिंदू व्यक्तीने दुसरं लग्नं केलं तर काय चुकलं असा सवाल महाराष्ट्र करणी सेनेच्या अजय सिंह सेंगर यांनी केल्याचं वृत्त टीव्ही नाईन ने दिलंय.राजकीय पक्षांच्या नेत्यांची वक्तव्य ही कमालीची विरोधाभासी आहेत.भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ ह्यांनी मेहबूब शेखला अटक का झाली नाही हा प्रश्न विचारत राज्यात लागू करण्यात येणाऱ्या शक्ती विधेयकात राजकीय कार्यकर्त्यांसाठी विशेषत: सत्ताधारी पक्षांच्या कार्यकर्त्यांसाठी वेगळी तरतूद करण्यात आलीय का? असा प्रश्न उपस्थित केला आहे.भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ह्यांनी मुंडेंचा राजीनामा मागत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.भाजप किरीट सोमय्या ह्यांनी निवडणूक आयोगा कडे मुंडे विरोधात माहिती लपवली म्हणून तक्रार दाखल केली आहे.

तर दुसरी कडे भाजप नेते आणि माजी आमदार कृष्णा हेगडे ह्यांनी तक्रार करणा-या तरुणीला ब्लॅकमेलर, हनी ट्रॅप ठरवत पोलीस तक्रार करायला थेट पोलीस चौकी गाठली आहे. कृष्णा हेगडे ह्यांनी याचे वक्तव्य असे आहे की – २०१० पासून ही महिला मला त्रास देत होती. ती मला फोर्स करत होती की मी तिच्याबरोबर संबंध ठेवावे. मी तिला दुर्लक्षित करत होतो. तरीही ती वेगवेगळ्या नंबरवरुन मला फोन करायची मेसेज करत होती. मी तिच्याबद्दल माहिती काढल्यानंतर हा हनी ट्रॅपचा प्रकार असल्याचे समजले. आता ६ जानेवारीला मला तिनं पुन्हा मेसेज केले. त्यानंतर मला धनंजय मुंडेचं प्रकरण समजलं. इतक्या वर्षानंतर हे प्रकरण बाहेर आणलं. आज मुंडेंचं प्रकरण बाहेर आलं. उद्या मला फसवलं असतं परवा अजून कुणाला फसवलं असतं. म्हणून मी तक्रार द्यायला पोलिसात जात आहे. मी पोलिसांना माहिती दिली आहे.धनंजय मुंडे माझे मित्र नाहीत पण ही महिला कुणालाही टार्गेट करु शकते, इति. हेगडे.धनंजय मुंडेंच्या विरोधात तक्रार करणाऱ्या महिलेच्या विरोधात तक्रार करण्यासाठी अंबोली पोलिस ठाण्यात पोहोचले.
भाजपवाले नक्की विरोधात आहेत की समर्थनात हे अजूनही स्पष्ट नाही.क्लीनचीट देण्याची सवय असल्याने भाजपला तत्वतः विरोध करायचा अंशतः तक्रार करायची की सरसकट ठोकून काढायचं ह्यावर एकमत झालेलं दिसत नाही.

भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी मेहबूब शेख प्रकरणी पोलिसांच्या भूमिकेवर संशय निर्माण करून पत्रकार परिषद घेऊन डीसीपींना बडतर्फ करण्याची मागणी केली. “पोलिसांनी अशा घटनेमध्ये माध्यमांसमोर येऊन प्रतिक्रिया द्यायला नको होती. डीसीपी दीपक गिर्हे यांनी पीडिता आणि आरोपी यांच्यामध्ये गेल्या वर्षभरात फोनवरुन संभाषण झालं नाही अशी प्रतिक्रिया माध्यमांना दिली. परिणामी पीडितेचे मनोबल खच्चीकरण झालं. त्यामुळे संबंधित डीसीपींना बडतर्फ करावी” असं त्या म्हणाल्या होत्या.
सेना पदाधिकारी काही वेगळे आहेत अश्यातला भाग नाही.शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार ह्यांनी ‘प्यार किया तो डरना क्या?’, अशा बिनधास्त शब्दात त्यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केली आहे.दुसरी कडे “खासगी आणि कौटुंबिक गोष्टी या त्याच पातळीवर सोडवायच्या असतात. त्यामध्ये राजकारण आणायचे नसते. विशेषत: राजकारण्यांनी या गोष्टीचे भान ठेवले पाहिजे”, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केल.आता ह्यातलं अधिकृत काय समजायचे ? डरना नहीं,हे अधिकृत समजायचं की, खाजगीत काहीही बलात्कार केला तरी ती खाजगी बाब म्हणून कौटुंबिक पातळीवर सोडून द्यायचे ? मंत्री आणि राज्यसभा सदस्य ह्या लोकसेवकांची ही भूमिका नेमकं काय स्पष्ट करते हा विचार महाराष्ट्रातील जनतेने केला पाहिजे.राष्ट्रवादीसोबत सत्तेत असलेल्या शिवसेनेच्या नेत्या आणि विधानपरिषदेचे उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी मेहबूब शेख यांनी बलात्काराचा आरोप असलेल्या मेहबूब शेख प्रकरणात बी समरी रिपोर्टची शक्यता लक्षात घेत या प्रकरणाचा तपास महिला पोलीस अधिकाऱ्याकडे सोपवावा, अशी मागणी नीलम गोऱ्हे यांनी केली आहे. त्यांनी या संदर्भात प्रसिद्धी पत्रक काढून म्हटलं आहे की, “या अत्याचाराच्या प्रकरणात पोलिस बी समरी फाईल करु शकतात.

तसंच मेहबूब शेख हे तरुणी आणि तिच्या कुटुंबीयांवर दबाव आणत आहे.तसेच औरंगाबाद इथल्या महिलांवरील अत्याचाराच्या बऱ्याच केसेसमध्ये बी समरी रिपोर्ट करुन त्या केसेस बंद करण्यात आल्या आहेत. ज्या प्रकरणात बी समरी रिपोर्ट करुन बंद केल्या आहेत त्याचा आढावा घेण्याची सूचना गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी द्यावी.अशी मागणी केली होती.राष्ट्रवादीने देखील अशीच संदिग्ध भूमिका घेऊन ह्या आरोपा बाबत ते फारसे गंभीर नसल्याचे दाखवून दिले आहे.पवारांनी धनंजय मुंडे प्रकरणाचं स्वरुप गंभीर असल्याचं म्हटलं, असा भास होतो. “धनंजय मुंडेंवरचा आरोप आणि स्वरुप – माझ्या मते त्या आरोपाचं स्वरुप गंभीर आहे, साहजिकच याबाबत पक्ष म्हणून विचारविनिमय करावा लागेल. यासाठी पक्षाचे प्रमुख सहकारी आहेत, त्यांच्याशी अद्याप बोलणं झालेलं नाही. पक्ष म्हणून, पक्षप्रमुख म्हणून जे काही निर्णय घ्यावे लागतील, काळजी घ्यावी लागेल ते तातडीने निर्णय घेऊ”, असंही शरद पवार बोललेत.तथापि सामाजिक न्यायमंत्री धनजंय मुंडे आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन नेते वेगवेगळ्या कारणामुळे सध्या अडचणीत सापडले असून विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. “पण कोणीही आरोप केले म्हणून राजीनामा घेणार नाही,” असं जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.त्यामुळे पवार किती गंभीर असतील ह्यावर प्रश्नचिन्ह आहे.

धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला आहे का असा प्रश्न पत्रकारां कडून विचारण्यात आला तेव्हा शरद पवारांनी हसत उत्तर दिलं, “तुमच्याकडूनच ही माहिती मला मिळत आहे” ह्याचा अर्थ सुजाण जनतेला लागला असेलच.अर्थात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ह्यांनी जाहीरच केले आहे की ‘नो राजीनामा’ आरोप काय होतच असतात.राष्ट्रवादीच्या गोटातून सावध प्रतिक्रिया येत आहेत. मात्र अद्याप महिला नेत्यांनी मौन सोडले नाही.
धनंजय मुंडे यांच्या मदतीला मनसे नेत्या रुपाली पाटील धावून आल्या आहेत. याप्रकरणी त्यांनी धनंजय मुंडे यांची बाजू घेत तक्रारदार महिलेवर काही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.“बलात्कार झालेल्या महिलेला न्याय मिळालाच पाहिजे. बलात्कार हे तुमच्या राजकारणाची खेळी बनवू नका. आणि बायांनो तुमच्या संमतीचे शाररिक संबंध हे राजकारणात कोणाला वापरू देऊ नका… तुमच्यामुळे खरोखर पीडितेला, बलात्कार झालेल्या अन्याय झालेल्या भगिनींना न्याय मिळत नाही, अशी खंत व्यक्त करत एक महिला म्हणून लाज बाळगा, बलात्कार हा त्या महिलच्या इच्छेविरुद्ध तथा बळजबरीने होत असतो, संमतीने ठेवलेले संबंध हा बलात्कार नसतो”, असंही सांगायला रुपाली पाटील विसरल्या नाहीत.आता ही मनसेची अधिकृत भूमिका समजायची की रुपाली पाटील ह्यांचे वैक्तिक मत हे अजून स्पष्ट नाही.

हि सर्व वैचारिक दिवाळखोरी आहे. बलात्काराचा आरोप मोठ्या धेंडा वर झाला की चौकशी आणि तपासाच्या नावाखाली आरोपीला अटक करण्यात येत नाही.सामान्य माणसाला मात्र तात्काळ बेड्या ठोकल्या जातात. ज्या आरोपींवर गुन्हा दाखल झालाय त्यांच्या समर्थनात सोशल मीडियावर कँम्पेन राबवण्यात येत आहे.निवेदन दिली जात आहेत.तरी नेते काहीही झाले नसल्याचा आव आणून हे प्रकरण ज्या पध्ध्तीने हाताळत आहेत, त्यातून एक गोष्ट तर स्पष्ट आहे की कुठेतरी पाणी मूरत आहे.राजकारणातील नैतिकता तर एवढ्या खालच्या स्तरावर आली आहे की, पक्षाच्या पदाचा राजीनामा घेतला गेला ना मंत्री पदाचा. एड बाळासाहेब मांडतात ते खरे आहे की,”राष्ट्रवादीला इभ्रत राखायची असेल तर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतल्याशिवाय पर्याय नाही.शरद पवार म्हणाले हा गंभीर गुन्हा आहे हा कसा घ्यावा हे मुंडे यांनी ठरवावं”.बाळासाहेबांचे हे वाक्य अत्यंत सूचक आहे की, “राजकारणी ज्ञानी असतो पण काही साधायचे असेल तर तो अज्ञानाचे सोंग घेतो.मुंडे यांच्या राजीनामा हा कोर्टाचा विषय आहे, लोक निवडणूक आयोगाकडे का जातात” हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.अर्थात एकाने मारल्या सारखं करायचे आणि दुसऱ्याने मारल्या सारखे करायचे परंतु कार्यवाही होऊ द्यायची नाही.

राजकीय व्यक्ती वर बलात्काराचे आरोप झाले तरी राजकारणी गंभीर का नसतात कारण ‘पॉलिटिकल हमाम में सब नंगे’ आहेत.देशात महिलांवरील अत्याचारांचे गुन्हे दाखल असलेल्या खासदारांमध्ये सर्वाधिक खासदार व आमदार भारतीय जनता पक्षाचे असून, त्यांची संख्या २१ आहे. १६ खासदार-आमदारांसह काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर तर ७ खासदार-आमदारांसह वायएसआर काँग्रेस पक्ष तिसऱ्या क्रमांकावर आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) या संस्थेने हा अहवाल दिला आहे.२००९ मध्ये लोकसभेत असे २ खासदार होते, तर २०१९ मध्ये त्यांची संख्या १९ झाली आहे.शपथपत्रात घोषणा करणाऱ्यांमध्ये पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक म्हणजे १६ असे खासदार-आमदार आहेत. त्यानंतर ओडिशा आणि महाराष्ट्रातील १२-१२ खासदार-आमदार आहेत.मागील पाच वर्षांमध्ये असे गुन्हे दाखल असलेल्या ५७२ उमेदवारांनी लोकसभा, राज्यसभा आणि विधानसभेच्या निवडणुका लढल्या, मात्र त्यांच्यापैकी कुणालाही दोषी ठरवण्यात आलेले नाही.त्यामुळे बलात्काराचे आरोप हे पेल्यातील वादळ ठरविली जातात.

✒️लेखक:-राजेंद्र पातोडे सर.
(प्रदेश प्रवक्ता तथा युवा प्रदेश महासचिव वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश.)
मो- 94221 60101

▪️संकलन:-नवनाथ पौळ
(केज तालुका प्रतिनिधी)
मो-8080942185