सुरसम्राट कुंदनलाल सैगल

29

हिंदी चित्रपट सृष्टीतील जेष्ठ गायक व पहिले सुपरस्टार सुरसम्राट कुंदनलाल सैगल यांची आज पुण्यतिथी. कुंदनलाल सैगल यांचा जन्म ११ एप्रिल १९०४ रोजी जम्मू येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील अमरचंद हे जम्मू काश्मीर संस्थानात मामलेदार होते तर आई केसरबाई या गृहिणी होत्या. त्यांच्या आईला संगीताची खूप आवड होती. धार्मिक कार्यक्रमात त्या भजन, कीर्तन गात त्यामुळे बालपणातच त्यांच्यावर संगीताचे संस्कार झाले. त्यांच्या आई याच त्यांच्या संगीतातल्या पहिल्या गुरू होत्या. कुंदनलाल सैगल यांनी संगीताचे शास्त्रोक्त शिक्षण घेतले नव्हते पण युसूफ नावाच्या व्यक्तीकडून त्यांनी संगीताचे प्राथमिक धडे गिरवले. अर्थजनासाठी त्यांनी टाईपरायटर विक्रेत्याचे काम केले पण संगीतावरील प्रेमापोटी त्यांनी ते काम सोडून छोट्या मोठया मैफलीत गायला सुरवात केली. त्यांच्या गायनाने प्रभावित होऊन बी. एन. सरकार यांनी सैगल यांना न्यू थिएटर साठी करारबद्ध केले. १९३२ साली त्यांनी चित्रपटात अभिनय करायला सुरुवात केली पण त्यांचे पहिले तिनही चित्रपट चालले नाही.

१९३३ साली आलेला पुरण भगत नावाचा चित्रपट मात्र गाजला. या चित्रपटाने त्यांची गायक आणि नायक म्हणून चित्रपट सृष्टीला ओळख करून दिली. १९३५ साली आलेल्या देवदास या चित्रपटाने त्यांना सुपरस्टार बनवले. या चित्रपटात त्यांनी गायलेले सर्वच गाणी गाजली. या चित्रपटातील त्यांचा अभिनयही रसिकांच्या पसंतीस उतरला. दीदी, साथी, सूरदास, तानसेन, जीवनमृत्यू हे त्यांचे चित्रपटही खूप गाजले. १९४६ साली प्रदर्शित झालेला शारजहाँ हा चित्रपट देखील खूप गाजला. १९४७ साली आलेला परवाना हा चित्रपट त्यांच्यव मृत्यूनंतर प्रदर्शित झाला हा चित्रपट देखील यशस्वी झाला. ‘एक बंगला बने न्यारा’ ‘करू क्या आस निरास भाई’ ‘सो जा राजकुमारी सो जा’ ‘बाबूल मोरा’ ‘जब दिल ही तूट गया’ ही त्यांनी गायलेली गाणी अजरामर ठरली. आजही ही गाणी तितकीच लोकप्रिय आहेत. सैगल यांच्या गायकीचे वैशिष्ट्ये म्हणजे त्यांच्या गायकीतील उत्स्फूर्तता व सहजता, आर्त दर्दभरा आवाज आणि प्रत्येक गाणे भावपूर्णतेने गाण्याची वैशिष्ट्यपूर्ण शैली. त्यामुळे त्यांची गाणी रसिकांच्या मनाला भिडत. कुंदनलाल सैगल यांनी ठुमरी, गझल, भजन, अंगाई गीत, बालगीत, विरह गीत अशी सर्व प्रकारची गाणी गायली.

हिंदी, उर्दू, बंगाली, तामिळ या चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या. त्यांनी ३६ चित्रपटात अभिनय केला तर तर १८५ गाणी गायली. मुकेश, मोहम्मद रफी या महान गायकांवर सुरवातीच्या काळात सैगल यांच्या गायन शैलीचा प्रभाव होता. हे महान गायक सैगल यांनाच आदर्श मानत. १८ जानेवारी १९४७ रोजी कुंदनलाल सैगल यांचे निधन झाले. कुंदनलाल सैगल यांचे निधन होऊन सत्तर वर्षापेक्षाही जास्त काळ उलटला असूनही त्यांच्या गायनाची मोहिनी आजही कायम आहे. आजही त्यांची गाणी तितकीच लोकप्रिय आहेत. कुंदनलाल सैगल हे खऱ्या अर्थाने भारताचे सुरसम्राट आहेत. आज त्यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांना विनम्र अभिवादन!

✒️लेखक:-श्याम बसप्पा ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे(मो:-९२२५४६२९५)