ओशो, कधीही जन्मले वा मेलेही नाही !

32

[आचार्य रजनीश स्मृती दिन]

ज्यांनी लाखो आंतरराष्ट्रीय अनुयायी मिळवले होते. जे एक भारतीय गूढवादी, गुरू आणि आध्यात्मिक शिक्षक होते. त्यांचे चंद्र मोहन जैन असे जन्मनाव अर्थात आचार्य रजनीश म्हणजेच ओशो (दि.११ डिसेंबर १९३१ – दि.१९ जानेवारी १९९०) हे आहेत. त्यांच्या अविस्मरणीय स्मृतींना या लेखाद्वारे उजाळा देण्याचा हा अल्पसा प्रयत्न !तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक असणाऱ्या ओशोंनी सन १९६० च्या दशकात सार्वजनिक वक्ते म्हणून भारत भ्रमण केले. त्यांनी समाजवाद, महात्मा गांधी आणि संस्थात्मक धर्मांवर उघड टीका केल्याने ते वादग्रस्त ठरले होते. लैंगिकतेसंबंधी अधिक उदारवृत्ती स्वीकारण्याच्या त्यांच्या आग्रहामुळे त्यांना भारतीय व नंतर आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये ‘सेक्सगुरू’ अशी उपाधी मिळाली. त्यांनी मुंबईत शिष्य जमविण्यास, नवसंन्यासी आणि आध्यात्मिक शिक्षक म्हणून भूमिका बजाविण्यास सुरुवात केली. आपल्या व्याख्यानांमध्ये त्यांनी धार्मिक परंपरांमधील लिखाणे, गूढवाद्यांचे लेखन तथा जगभरातील तत्त्वज्ञांच्या लिखाणाचे पुनरार्थबोधन केले.

पुण्यात जाऊन त्यांनी आश्रम स्थापला. अनेक पाश्चात्त्य या आश्रमामध्ये येऊ लागले. या आश्रमात ह्युमन पोटेन्शियल मूव्हमेन्टवर आधारलेल्या उपचारपद्धती पाश्चात्त्य पाहुण्यांना दिल्या जाऊ लागल्या. मुख्यतः मुक्त वातावरण व ओशोंच्या सडेतोड व्याख्यानांमुळे देश-परदेशांत हा आश्रम गाजू लागला. सत्तरच्या दशकाच्या अखेरीस भारत सरकार, सभोवतालचा समाज आणि हा आश्रम यांच्यामध्ये ताणतणाव निर्माण झाले होते. इ.स.१९८१ मध्ये ओशो अमेरिकेत स्थलांतरित झाले. ऑरेगाॅन राज्यात त्यांच्या अनुयायांनी स्थापन केलेला सहेतुक समाज पुढे रजनीशपुरम म्हणून नावारूपाला आला. वर्षभरात या कम्यूनचा स्थानिक रहिवाशांशी जमिनीवरून कटू वाद उभा राहिला. अनुयायांनी ओशोंना वापरासाठी खरेदी करून दिलेल्या रोल्स-रॉयसही कुप्रसिद्ध ठरल्या.

नंतर कम्यूनच्या नेतृत्वाने जैव दहशतवादी हल्ल्यासारखे गंभीर गुन्हे केल्याचे त्यांनी उघड केल्यावर ऑरेगाॅन कम्यून कोसळले. लवकरच त्यांना अटक झाली आणि देश आगमनादरम्यान केलेल्या नियमभंगाचा आरोप त्यांच्यावर लागला. युक्तिवादातील तडजोडीनुसार त्यांना अमेरिका सोडावी लागली. एकवीस देशांनी त्यांना प्रवेश नाकारला होता. जग भ्रमंतीनंतर ते पुण्यात येऊन कायम स्थिरावले. ओशोंच्या शिकवणी एखाद्या शैक्षणिक संस्थेत नव्हे तर अनेकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या त्यांच्या व्याख्यानांमध्ये आहेत. या व्याख्यानांमध्ये विनोदही असत. एखाद्या गोष्टीवर त्यांनी दिलेला भर कायम तसाच राहिला असे नाही; विरोधाभास आणि विसंगत्यांमध्ये रमणाऱ्या ओशोंचा उपदेश त्यामुळेच सारांशित करण्यास अवघड आहे. बुद्धत्व पावलेल्या व्यक्तींच्या पारंपरिक वर्तनापेक्षा त्यांचे वर्तन अतिशय वेगळे होते. त्यांची सुरुवातीची व्याख्याने तर विनोदासाठी तथा काहीही गंभीरपणे न घेण्यासाठी लोकप्रिय झाली.

असे सर्व वर्तन, मग ते लहरी आणि पचण्यास अवघड असले तरी लोकांना मनापलीकडे नेऊन रूपांतरित करण्यासाठीचे एक तंत्र समजले गेले.आचार्य रजनीश यांनी अनेक बुध्द महापुरूषांवर प्रवचन दिले. तथागत गौतम बुद्ध, लाओत्से, कबीर, गुरु रामकृष्ण परमहंस, महाज्ञानी अष्टावक्र, भगवान महावीर, संत मीराबाई, भगवान श्रीकृष्ण हे प्रमुख होते. त्यांची भाषाशैली आणि तर्क करण्याची पद्धत प्रभावशाली होती. त्यांचे प्रवचन ऐकणारे त्यांच्या व्यक्तिमत्वाने प्रभावित होत होते. एका प्रमुख पत्रकाने तर भारताला प्रभावित करणाऱ्या दहा महान पुरुषांमध्ये त्यांच्या नावाचा समावेश केला होता. जैन धर्म, हिंदू धर्म, हसिदी मत, तंत्र मार्ग, ताओ मत, ख्रिश्चन धर्म, बौद्ध धर्म अशा प्रमुख आध्यात्मिक परंपरांवर, विविध पौर्वात्य-पाश्चिमात्य रहस्यवाद्यांवर आणि उपनिषदांसारख्या धार्मिक पवित्र ग्रंथांवर तसेच गुरू ग्रंथ साहिबवर ओशोंनी भाष्य केले.

आचार्यांच्या म्हणण्यानुसार प्रत्येक मनुष्य हा उद्बोधनाची क्षमता असणारा, बिनशर्त प्रेमाची क्षमता असणारा, आयुष्याला प्रतिक्रियेऐवजी प्रतिसाद देऊ शकणारा बुद्ध आहे. अहंकारामुळे मनुष्याची क्षमता प्रत्यक्षात उतरत नाही. सामाजिक बंधनांमुळे मनुष्य जखडलेला राहतो. अन्यथा मनुष्य त्याच्या आंतरिक सामर्थ्याने एका झटक्यात परिघातून निघून केंद्रात शिरू शकतो आणि फुलाप्रमाणे फुलू शकतो. ते आचार्य रजनीश म्हणून वावरत असताना एका संवाददात्याने त्यांना ख्रिश्चन धर्मातील ‘टेन कमांडमेंट्स’च्या धर्तीवर त्यांच्या आज्ञा विचारल्या होत्या. प्रतिसादादाखल त्यांनी आपण असल्या प्रकारच्या आज्ञेच्या विरोधात असल्याचे सांगितले. फक्त गमतीसाठी त्यांनी ज्या दहा आज्ञा सांगितल्या, त्यातील क्रमांक ३, ७, ९ व १० या आज्ञा ओशोंनी अधोरेखित केल्या आहेत.

त्या अशा – [१] तुमच्या आतूनही येत असल्याशिवाय कुणाचेही हुकूम मानू नका. [२] स्वतःच्या जीवनापलीकडे वेगळा परमेश्वर नाही. [३] सत्य तुमच्यामध्येच आहे, त्याचा इतरत्र शोध घेऊ नका. [४] प्रेम ही प्रार्थना आहे. [५] शून्यत्व हे सत्याचे द्वार आहे. [६] शून्यत्व हे स्वतःतच माध्यम, ध्येय आणि मिळकत आहे. [७] जीवन इथे आणि आता आहे, जागृततेने जगा. [८] पोहू नका – तरंगत रहा. [९] नवा प्रत्येक क्षण स्वतःच बनण्यासाठी प्रत्येक क्षणात नष्ट व्हा. [१०] शोधू नका. जे आहे ते, आहे. थांबा आणि पहा. त्यांच्या चळवळीत या आज्ञा निरंतर मार्गदर्शक ठरल्या आहेत.

जानेवारी १९८७ मध्ये ते पुण्यातील आश्रमात परतले. आजारपण सांभाळून संध्याकाळची व्याख्याने त्यांनी सुरू केली. प्रकाशन आणि उपचारपद्धती पुन्हा सुरू झाल्या. सन १९८८च्या प्रारंभापासून झेन मतावर त्यांनी लक्ष केंद्रित केले. डिसेंबरमध्ये त्यांनी आपल्याला भगवान असे संबोधू नये, अशी इच्छा व्यक्त केली आणि ‘ओशो रजनीश’ हे नाव घेतले. सप्टेंबर १९८९ मध्ये ‘ओशो’ असे ते सुटसुटीत करण्यात आले. दि.१९ जानेवारी १९९० रोजी त्यांनी नश्वर देहाचा त्याग केला. त्यांची रक्षा आश्रमातील त्यांच्या नव्याने बांधलेल्या शयनकक्षात ठेवण्यात आली. तेथील समाधिलेख असा आहे – “ओशो कधीही जन्मले नाहीत, कधीही मेले नाहीत. फक्त ११ डिसेंबर १९३१ ते १९ जानेवारी १९९० या काळात त्यांनी या पृथ्वीग्रहाला भेट दिली.”आज त्यांचा आश्रम ‘ओशो आंतरराष्ट्रीय ध्यानकेंद्र’ म्हणून ओळखला जातो.

त्यांच्या बहुमिश्र शिकवणीमध्ये ध्यान, जागृतता, प्रेम, उत्सव, धैर्य, सृजनशीलता आणि विनोद यांना महत्त्व आहे. स्थितिशील श्रद्धा, धार्मिक परंपरा व समाजीकरणामुळे या बाबी दबल्या जातात, असे त्यांचे मत होते. पाश्चात्त्य नवयुग विचारांवर ओशोंच्या विचारांचा पगडा दिसतो. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या विचारांची लोकप्रियता वाढतांना दिसत आहे.
पुरोगामी संदेश परिवारातर्फे ओशोंना व त्यांच्या चिरंतन तत्ववादी स्मृतींना विनम्र अभिवादन !

✒️लेखक:-श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरुजी.
(मराठी साहित्यिक/ संत व लोक साहित्याचे गाढे अभ्यासक)मु. रामनगर, गडचिरोली.
ता. जि. गडचिरोली.
फक्त व्हा.नं. ७४१४९८३३३९.
इमेल – nikodekrishnakumar@gmail.com