ग्रामीण भागातील घरकुल बांधकामांची रक्कम वाढवा – प्रमोद राऊत, ग्रा.पं. सदस्य

29

🔸शहरी व ग्रामीण अशी विभागणी न करता सरसकट घरकुल रक्कम देण्यात यावी

✒️चिमूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चिमुर(दि.19जानेवारी):-ग्रामीण भागातील घरकुल बांधकामाकरिता मिळणारी रक्कम ही तुटपुंज्या स्वरूपाची असल्याने घरकुल बांधकामाची रक्कम वाढविण्यात यावी अशी मागणी खडसंगी ग्रामपंचायत सदस्य प्रमोद राऊत यांनी ग्रामविकास मंत्रालय व राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन केली आहे.सध्यास्थितीत ग्रामीण भागात सर्वात जास्त लोकसंख्या वास्तव्यास राहत असून यांनाच घरकुल बांधकामाकरिता कमी रकमेचे घरकुल दिले जात असल्याने, शहरी भागात माणसे व ग्रामीण भागात जनावरे राहतात की काय? असा सवाल प्रमोद राऊत ग्रामपंचायत सदस्य यांनी राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदनाद्वारे केला आहे.

असा सवाल करणे गरजेचे ठरत असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येते. आजची परिस्थिती लक्षात घेता खरोखरच शहरी भागात घरकुलासाठी २.५० लाख रुपये रक्कम घरकुल बांधकामासाठी शासन स्तरावरुन दिले जाते आहे.

व ग्रामीण भागातील नागरिकांसाठी घरकुल बांधकामासाठी १.५० लाख रुपये रक्कम दिली जाते आहे. शहरी व ग्रामीण असा भेदभाव कां बरं केल्या जात आहे. असा प्रश्न ग्रामीण भागातील जनतेसमोर उभा येऊन ठाकला आहे. आजची खरी परिस्थिती लक्षात घेता विटा, रेती, लोहा, सिमेंट व इतर साहित्यांच्या रकमेत अवाढव्य वाढ झाल्याने आजच्या परिस्थितीत दिड लाखात घर बांधणे अवघड झाले आहे. एकीकडे साहित्य खरेदी करावे की मजूरी, सेन्ट्रीगचे पैसे मोजावे असाही प्रश्न ग्रामीण भागातील घरकुल मिळालेल्या व नव्याने घरकुले आलेल्या लाभार्थ्यांच्या मनात घर करून सोडत आहे.

त्यामुळे ग्रामीण व शहरी अशी दोन विभागनी करून फाडणी न करता सरसकट ग्रामीण भागातील नागरिक यांनाही २.५० लाख रकमेचे घरकुले देण्यात यावे. शहरी आणि ग्रामीण भागात घरबांधकामाचे साहित्याची किंमत सारखीच असते. उलट ग्रामीण भागातील नागरिकांना घरबांधकामाकरिता शहरातूनच बांधकाम साहित्य घेऊन आणावे लागत असते. त्यामुळं शहरी व ग्रामीण अशी विभागणी न करता. शहरी व ग्रामीण भागातील घरकुल धारक नागरिकांना सरसकट अडीच लाख रुपये देण्यात यावे. अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य प्रमोद राऊत यांनी राज्यातील ग्रामविकास मंत्रालय व राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.