आता नोकरभरती आणि पदोन्नती होणार, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

27

✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

गेवराई(दि.21जानेवारी):-राज्यातील नोकर भरतीबाबत ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी मोठं विधान केलं आहे. नितीन राऊत यांनी आजच्या (20 जानेवारी) मंत्रिमंडळ बैठकीनंतर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी नोकर भरतीच्या मुद्द्यावर भाष्य केलं. “नोकर भरतीबाबत मी देखील मागणी केली आहे. ज्याप्रकारे गृहखात्याने नोकर भरतीचं परिपत्रक काढलं त्याचप्रमाणे सामान्य प्रशासन विभागाचं परिपत्रक काढावं आणि त्यानुसार नोकरभरती करावी, अशी मी विनंती केली आहे.

ही विनंती मान्य झाली आहे. त्याचबरोबर पदोन्नतीबाबतही मी आवाज उठवला, त्यालाही मान्यता मिळाली”, असं नितीन राऊत यांनी सांगितलं.राज्य मंत्रिमंडळाची आज सह्याद्री अतिथीगृहावर महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीनंतर मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनीदेखील प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.मंत्रिमंडळ बैठकीत नेमकं कोणत्या विषयांवर चर्चा झाली, याबाबत त्यांनी थोडक्यात माहिती दिली. राज्यातील नोकर भरतीबाबत आज मंत्रिमंडळात चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. याशिवाय मराठा आरक्षणाबाबत चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं.