पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांना देण्यात आले श्री गाडगे महाराज मिशनचे सदस्यपद

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)मो:-9561905573

अमरावती(दि.21जानेवारी):- जगाच्या कल्याणासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचून समाज प्रबोधनाचे कार्य करणा-या संत गाडगेबाबा यांची संस्था असलेल्या श्री गाडगे महाराज मिशनचे सदस्यपद मिळणे हा आपल्याला मिळालेला सर्वोच्च बहुमान असल्याचे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज सांगितले.

श्री गाडगे महाराज मिशनचे सदस्यपद श्रीमती ठाकूर यांना देण्यात आले असून, तसे पत्र समितीच्या कार्यकारिणीच्या सदस्यांनी पालकमंत्र्यांना सन्मानपूर्वक सुपुर्द केले.

संत गाडगेबाबांनी यांनी ही संस्था स्वत: स्थापन केलेली असून, राज्यातील 22 जिल्ह्यांत कार्यरत आहे. संस्थेकडून आदिवासी, भटक्या, विमुक्त जातींसाठी, वंचित घटकांसाठी आश्रमशाळा, वसतिगृहे, धर्मशाळा, बालमंदिर, बालगृह, वृद्धाश्रम आदी विविध उपक्रम चालवले जातात. संस्थेच्या कार्यात पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांचे सदोदित सहकार्य लाभले. संत गाडगेबाबांची निर्वाणभूमी असलेल्या वलगाव येथील समाधीस्थळ विकसित करून तिथे शासनामार्फत मुलभूत सोयी-सुविधा उभारण्यासाठी पालकमंत्र्यांनी विशेष प्रयत्न केले. त्यामुळे संस्थेच्या कार्यकारिणी सभेने त्यांना हितचिंतक, आश्रयदाते प्रवर्गातून संस्थेचे सभासदत्व दिले आहे. संस्थेच्या पुढील विकासात्मक वाटचालीत त्यांचा प्रत्यक्ष सहभाग महत्वपूर्ण ठरणार आहे, असे मिशनचे कार्याध्यक्ष मधुसुदन मोहिते यांनी सांगितले.

संत गाडगेबाबा यांच्या संस्थेत सदस्य म्हणून समावेश होणे हा आपल्यासाठी मोठा बहुमान आहे. संत गाडगेबाबांचे कार्य पुढे नेण्यासाठी संस्था वंचित घटकांसाठी अनेक उपक्रम राबवत आहे. यापुढेही ही कामे अधिक विस्तारत जाण्यासाठी आपले नेहमी सहकार्य व सहभाग राहील, अशी ग्वाही पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिली.

अमरावती, महाराष्ट्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED