आज फक्त ‘एकच प्याला’ उद्या सोडतो दारुला

33

[राम गणेश गडकरी स्मृती दिन]

प्रस्तावना : परिचयाची असलेली टोपणनावे – गोविंदाग्रज, बाळकराम व नाटके सवाई आदी ज्यांची आहेत, असे राम गणेश गडकरी (जन्म २६ मे १८८५; नवसारी, गुजरात – मृत्यू २३ जानेवारी १९१९; सावनेर, महाराष्ट्र) हे मराठी कवी, नाटककार व विनोदी लेखक होते. गोविंदाग्रज या टोपणनावाने त्यांनी सुमारे १५० कविता लिहिल्या व बाळकराम या टोपणनावाने काही विनोदी लेख लिहिले. या साहित्याच्या जोडीला एकच प्याला, प्रेमसंन्यास, पुण्यप्रभाव आणि भावबंधन ही चार नाटके लिहिली. तसेच राजसंन्यास व वेड्यांचा बाजार ही त्यांची दोन अपूर्ण राहिलेली नाटके होत. राम गणेश गडकरी यांना ‘महाराष्ट्राचे शेक्सपियर’ समजले जाते. विविध नाट्यप्रयोग सादरकर्त्या संस्थांनी रा.ग.गडकरींसह पत्‍नी रमाबाई यांच्या नावाने नाटककार आणि नाट्याभिनयासाठी अनेक गडकरी पुरस्कार ठेवले आहेत. नागपूरला ’राम गणेश गडकरी’ या नावाचा एक साखर कारखानासुद्धा आहे.

जीवन : गडकरींचा जन्म २६ मे १८८५ रोजी नवसारी येथील गणदेवी या गावात झाला. वयाच्या आठव्या वर्षीच त्यांचे वडील गणेश वासुदेव गडकरी निवर्तले. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचे धाकटे भाऊ गोविंदही अकालीच मरण पावले. या कौटुंबिक धक्क्यांतून सावरताना त्यांचे कुटुंब पुण्यात स्थायिक झाले. त्यांचे शालेय शिक्षण पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये व त्यानंतरचे शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालयात झाले. तेथे शिकत असताना मित्राच्या ओळखीने ते ‘किर्लोस्कर नाटक मंडळी’त दाखल झाले. या नाटक मंडळीने चालविलेले ‘रंगभूमी’ नावाचे मासिक, शिवराम महादेव परांजपे यांचे ‘काळ’ वृत्तपत्र व हरिभाऊ आपट्यांचे ‘करमणूक’ नियतकालिक यांतून ते कविता व लेख लिहू लागले. यांसोबतच ते नाट्यलेखनही करू लागले.

विनोदी लेखन : रा.ग.गडकरींचे विनोदी लेखन त्यांच्या संपूर्ण बाळकराम या पुस्तकात एकत्रितपणे मिळते. नाट्यछटेपासून ते संवाद व विडंबनापर्यंत विविध प्रकारांतून त्यांनी विनोद हाताळला. संपूर्ण बाळकरामचे पान न्‌ पान खरोखरीच उच्च अभिरुचीच्या हास्यरसाची निर्मिती करणारे आहे. राम गणेश गडकरींनी ‘मासिक मनोरंजन’मध्ये ‘बाळकराम’ या टोपण नावाने विपुल लेखन केले. पुढे त्यांतील काही लेखांचा संग्रह ‘रिकामपणची कामगिरी’ या नावाच्या पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाला.

काव्य : वाग्वैजयंती हा गोविंदाग्रजांचा एकमेव काव्यसंग्रह आहे. यात मुक्तच्‍छंदापासून ते छंदबद्ध कवितेपर्यंत आणि चारोळींपासून ते दहा पाने भरतील एवढ्या दीर्घकवितांपर्यंत अनेक प्रकार त्यांनी त्यात हाताळले आहेत. ते कवितांची पार्श्वभूमी एखाद-दुसऱ्या परिच्छेदात सांगून नंतर कविता सादर करीत. आपले लहान बालक मृत्युशय्येवर असताना मातेची मनःस्थिती ‘राजहंस माझा निजला’ या कवितेत त्यांनी मांडलेली आहे. त्या कवितेच्या प्रस्तावनेचा तो परिच्छेद वाचला की कवितेत शिरण्याची एक विशिष्ट मनःस्थिती तयार होते. कवितालेखनासाठी गडकरींनीच गोविंदाग्रज हे टोपण नाव घेतले होते.

नाटके : नाटके सवाईंच्या अनेक नाटकांची नावे ही पाच अक्षरीच आहेत. त्यांची नाटके हा आजही अनेकांच्या अभ्यासाचा विषय आहे. भावबंधन, एकच प्याला यांसारख्या नाटकांची तर आजही एव्हरग्रीन म्हणून जाहिरात केली जाते. वेड्यांचा बाजार व राजसंन्यास ही त्यांची नाटके मात्र अपूर्ण राहिली. जर गडकरी दीर्घायुषी झाले असते, तर ती नाटके पूर्ण झालीच असती. परंतु आणखी काही नव्या नाटकांचीही त्यात भर पडली असती. मराठीचे शेक्सपियर असा त्यांचा सार्थ उल्लेख होतो, तो मुख्यत्वे नाटकांसाठीच! नुसती नाटकेच नाहीत. तर त्यांच्या “आज फक्त ‘एकच प्याला !’ उद्यापासून नक्कीच दारुला हातसुद्धा लावणार नाही.” यांसारख्या संवादासह सुधाकर, सिंधू, तळीराम, घनश्याम, ललिता वगैरे पात्रेही अजरामर झाली आहेत. काळ बदलला असला तरीही त्यांनी हाताळलेले दारूबंदीसारखे विषयही कालबाह्य झाले, पण गडकऱ्यांची नाटके सदाहरित राहिली याचे श्रेय त्या देवदुर्लभ अशा लेखणीलाच द्यायला हवे. त्यांची गाजलेली काही नाटके – एकच प्याला, गर्वनिर्वाण, पुण्यप्रभाव, प्रेमसंन्यास, भावबंधन, मित्रप्रीती (अप्रकाशित), राजसंन्यास, वेड्यांचा बाजार आदी आहेत.

अन्य साहित्य : नाटके, काव्य आणि विनोदी लेखन या तीन मुख्य प्रकारांच्या पलिकडे जाऊन वर्गीकरण करावे लागेल, असे लेखन अन्य साहित्य या विभागात समाविष्ट केले आहे. चिमुकली इसापनीती हे त्यांचे सर्वांत छोटे म्हणजे जेमतेम दहा पानांचे पुस्तक बालकांसाठी आहे. त्यात इसापनीतीतील छान छान गोष्टी आहेत. या पुस्तकांच्या कथालेखनाचे वैशिष्ट्य असे की त्यांनी जाणीवपूर्वक एकही जोडाक्षर येऊ दिलेला नाही. याशिवाय, त्यांनी काही स्फुट लेखही लिहिलेले आहेत. रा.ग. गडकरी यांचे अन्य साहित्य – चिमुकली इसापनीती, समाजात नटाची जागा व इतर दोन निबंध, नाट्यकलेची उत्पत्ती, गुरू श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांना पत्र इत्यादी सांगता येतील. सरस्वतीचे वरदहस्त लाभान्वित अशा या महान सारस्वताचा मृत्यू दि.२३ जानेवारी १९१९ रोजी नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथे वयाच्या ३४व्या वर्षी अल्पवयात झाला.

पुरोगामी संदेश परिवारातर्फे त्यांच्या अविस्मरणीय स्मृतींना विनम्र अभिवादन !

✒️लेेखक:-श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरुजी,
[मराठी साहित्यिक तथा संत व लोक साहित्याचे गाढे अभ्यासक]मु. श्रीगुरूदेव प्रार्थना मंदिराजवळ,
रामनगर, गडचिरोली, जि. गडचिरोली.
फक्त व्हा.नं. ९४२३७१४८८३.
इमेल – krishnadas.nirankari@gmail.com