थोर क्रांतिकारक नेते आझाद हिंद सेनेचे सरसेनापती नेताजी सुभाषचंद्र बोस

31

स्वातंत्र्य चळवळीतील थोर क्रांतिकारक नेते आझाद हिंद सेनेचे सरसेनापती सुभाषचंद्र बोस यांचा आज १२४ वि जयंती. २३ जानेवारी १८८७ रोजी कटक येथे नेताजींचा जन्म झाला. नेताजींना आठ भावंडे होती. नेताजी लहानपणापासूनच बंडखोर प्रवृत्तीचे होते. वयाच्या १५ वर्षीच नेताजींनी हिमालयाच्या दिशेने प्रस्थान केले. पण त्यांना गुरू दर्शन झाले नाही म्हणून त्यांनी स्वामी विवेकानंद यांचे साहित्य वाचून त्यांना गुरू बनवले. कॉलेजमध्ये असताना एका इंग्रज शिक्षकाने भारतीयांना दूषणे दिली तेंव्हा नेताजींनी उभे राहून त्या शिक्षकाला जाब विचारीत निषेध नोंदवला. इतकेच नाही तर त्या शिक्षकावर कारवाई व्हावी यासाठी कॉलेजमध्ये बंद पुकारला याचा राग मनात धरून कॉलेज प्रशासनाने त्यांना कॉलेजमधून काढून टाकले.

१९२१ साली इंग्लंडला जाऊन नेताजींनी इंडियन सिव्हिल सर्व्हिसची परीक्षा दिली त्यात ते चौथ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. नेताजींनी काहीकाळ सिव्हिल सर्व्हीसमध्ये नोकरी देखील केली. पण भारत मातेला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी त्यांनी सिव्हिल सर्व्हिसच्या नोकरीवर पाणी सोडले. तेंव्हा गांधीजींची असहकार चळवळ जोरात सुरू होती. असहकार चळवळ समजून घेण्यासाठी व स्वातंत्र्य चळवळीची पुढील दिशा ठरवण्यासाठी त्यांनी गांधीजींची भेट घेतली. महात्मा गांधींनी त्यांना चित्तरंजन दास यांच्याकडे पाठवले. चित्तरंजन दास हे त्यांचे राजकीय गुरू बनले. इंग्लंडची राणी कोलकोत्याच्या दौऱ्यावर येणार आहे हे समजल्यावर नेताजींनी या दौऱ्यावर बहिष्कार टाकण्याची योजना आखली. इंग्रजांना त्याची कुणकुण लागताच त्यांनी नेताजी आणि चित्तरंजन दास यांना अटक केली. सहा महिने त्यांना तुरुंगवास भोगावा लागला.

तुरुंगात असताना त्यांनी इतिहास, धर्मशास्त्र आणि मानसशास्त्र या विषयांचे वाचन केले. तुरुंगातून मुक्त झाल्यावर त्यांनी भारतातील राजकीय परिस्थितीचा अभ्यास केला आणि ते राजकारणात सक्रिय झाले. ते बंगाल प्रांतिक काँग्रेसचे अध्यक्ष बनले. पुढे त्यांनी इंडिया इंडिपेंडन्स युथ लीगची स्थापना करुन तरुणांना संघटित केले. १९३० च्या सविनय कायदेभंगाच्या आंदोलनात नेताजींना पुन्हा अटक झाली. गांधी आयर्विन करारानंतर त्यांची मुक्तता झाली. ते कोलकोत्याचे महापौर बनले. गांधी आयर्विन कराराला नेताजींनी विरोध केला त्यामुळे त्यांचे महात्मा गांधीशी मतभेद झाले. १९३२ साली सशस्त्र क्रांतिकारी संघटनेशी संबंध जोडून त्यांना अटक करण्यात आली. पण प्रकृतीच्या कारणावरून त्यांना तुरुंगात न ठेवता देशातून हद्दपार करण्यात आले. तीन वर्ष ते व्हिएन्ना येथे राहिले. तिथे त्यांनी युरोपातील राजकीय परिस्थितीचा अभ्यास केला.

१९३७ साली गांधीजींच्या विरोधाला न जुमानता त्यांनी त्रिपुरा काँग्रेस अधिवेशनात अध्यक्षपदाची निवडणूक लढवली. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांनी पट्टाभीसीतारामय्या यांचा पराभव केला. या निवडणुकीमुळे महात्मा गांधी नाराज झाले. हा आपलाच पराभव आहे असे ते मानू लागले. बहुसंख्य कॉंग्रेसजनांनी गांधीजींचेच नेतृत्व मान्य केले. त्यामुळे नेताजींनी अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केली. नागपूर अधिवेशनात अस्थायी राष्ट्रीय सरकार स्थापन करण्याची मागणी करण्यात आली. पण संकल्पित सत्यागृहापूर्वीच त्यांना अटक करण्यात आली. अटक केल्यानंतर नेताजींनी अन्नत्याग करु अशी धमकी दिली. या धमकीला घाबरून इंग्रजांनी त्यांना तुरुंगात न ठेवता त्यांच्या घरीच नजरकैदेत ठेवले. नजरकैदेत असतानाच त्यांनी वेषांतर करुन पेशावर गाठले तेथून ते जर्मनीला गेले. जर्मनीत त्यांनी भारतीयांना इंग्रजांविरुद्ध लढण्यास प्रवृत्त केले.

त्यांनी तेथील भारतीयांना संघटित केले. जर्मनीमध्ये ते एडॉल्फ हिटलरला भेटले. बर्लिनमध्ये त्यांनी आझाद हिंद रेडिओ व फ्री इंडिया सेंटरची स्थापना केली. १९४३ ला नेताजींना जपानवरून आमंत्रण आले. जर्मनीहून जपान व्हाया मादागास्कर असा सबमरीन प्रवास करीत ते जपानला पोहचले. २१ ऑक्टोबर १९४३ रोजी त्यांनी सिंगापूर येथे आझाद हिंद सरकारची स्थापना केली. नेताजी स्वतः राष्ट्रप्रमुख, पंतप्रधान, संरक्षण मंत्री व सरसेनापती बनले. या राष्ट्राला जपान, जर्मनी, ब्रह्मदेश, इटली यासह ११ देशांनी मान्यता दिली. नेताजींनी तरुणांना आझाद हिंद सेनेत सहभागी होण्याचे आव्हान करीत तुम मुझे खून दो… मै तुम्हे आझादी दुंगा…अशी घोषणा केली. त्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत हजारो तरुण आझाद हिंद सेनेत सामील झाले.

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात आझाद हिंद सेनेने जपानी लष्कराच्या साहाय्याने भारतावर आक्रमण केले. दोन्ही फौजांनी इंग्रजांकडून अंदमान निकोबार बेटे जिंकली. ब्रह्मदेशमधून आझाद हिंद सेनेच्या फौजा भारताकडे निघाल्या मात्र नैसर्गिक आपत्तीमुळे आझाद हिंद सेनेला माघार घ्यावी लागली. रंगून आकाशवाणी वरुन नेताजींनी भाषण करुन इंग्रजांशी कोणत्याही प्रकारचा समजोता न करण्याचे, फाळणी न करण्याचे लढा चालूच ठेवण्याचे आव्हान केले. महायुद्धात जर्मनी, इटली यांचा पराभव झाला. जपानने शरणागती पत्करली तेंव्हा नेताजींनी रशियाला जाण्याचा निर्णय घेतला. १८ ऑगस्ट १९४५ रोजी नेताजी विमानातून माणचुरीयाच्या दिशेने जात होते. प्रवासादरम्यान त्यांचे विमान बेपत्ता झाले. २३ ऑगस्ट १९४५ रोजी जपानच्या दोनयी वृत्तसंस्थेने जगाला कळवले की १८ ऑगस्ट रोजी नेताजींच्या विमानाला अपघात झाला त्यात नेताजींचे निधन झाले. १९९२ साली भारत सरकारने नेताजींना मरणोत्तर भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार देण्याची घोषणा केली पण मृत्यूबाबत कोणताही पुरावा उपलब्ध नसल्याने त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देणे अवैध आहे असे म्हणत त्यांच्या कुटुंबीयांनी हा पुरस्कार नाकारला. तुम मुझे खून दो… मै तुम्हे आझादी दुंगा… असा नारा देत भारतीयांमध्ये स्वातंत्र्य लढ्याची चेतना निर्माण करणाऱ्या नेताजींना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!

✒️लेखक:-श्याम बसप्पा ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे(मो:-९२२५४६२९५)