धुळे येथील कवी श्री. नरेंद्र मुरलीधर पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ‘ग्रंथमित्र’ पुरस्काराने सन्मानित

32

✒️अंगद दराडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-8668682620

बीड(दि.24जानेवारी):- शनिवार दिनांक २३/०१/२०२१ रोजी हॉटेल सुकांता, डेक्कन जिमखाना, पुणे येथे राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि काषाय प्रकाशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. नयनचंद्र सरस्वते लिखित ‘बंधुता आणि संघर्ष’ या ग्रंथाचे प्रकाशन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर ‘ग्रंथमित्र’ पुरस्कार वितरण समारंभ संपन्न झाला. अनेक मान्यवर व पुरस्कार्थी साहित्यिक या प्रसंगी उपस्थित होते. या ऐतिहासिक सोहळ्यात धुळे येथील कवी श्री. नरेंद्र मुरलीधर पाटील यांच्या साहित्य क्षेत्रातील लिखाणाची दखल घेऊन त्यांना राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि काषाय प्रकाशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर ‘ग्रंथमित्र’ पुरस्कार, ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, तथा २० वे राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक मा. डॉ. श्रीपाद सबनीस, यांचे शुभहस्ते प्रदान करण्यात आला.

कार्यक्रमाचे सुरुवातीला निमंत्रित कवींचा काव्य वाचन कार्यक्रम पार पडला. त्यात श्री. नरेंद्र पाटील यांनी खान्देश कन्या बहिणाबाईंच्या अंदाजात, आपल्या मायबोली अहिराणी भाषेत सादर केलेल्या शेतकऱ्याच्या जीवनाची व्यथा मांडणाऱ्या ‘भाकरी’ या कवितेने रसिकांची मने जिंकून घेतली.

या ऐतिहासिक कार्यक्रमाबद्दल ज्येष्ठ साहित्यिक श्री. चंद्रकांतदादा वानखेडे यांचेशी बोलताना श्री. नरेंद्र पाटील म्हणाले, “असं म्हणतात की, साहित्याने कुणाची पोटं भरत नसतात. पण ह्या दैदिप्यमान सोहळ्याने मात्र मनही भरले आणि पोटही !”या ऐतिहासिक कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा. श्री. बंधुताचार्य प्रकाश रोकडे, संस्थापक अध्यक्ष, राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद, पुणे, स्वागताध्यक्षा म्हणून मा. मधुश्री ओव्हाळ, प्रमुख अतिथी प्रा. डॉ. अशोककुमार पगारिया, मा. मंदाकिनी रोकडे तसेच ज्येष्ठ साहित्यिक व काषाय प्रकाशन, पुणे चे संचालक, श्री. चंद्रकांतदादा वानखेडे ही साहित्य क्षेत्रातील मान्यवर मंडळी या प्रसंगी उपस्थित होती.