राष्ट्रीय मतदार दिन

स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन हे दोन आपले राष्ट्रीय सण आहेत हे आपणा सर्वांना माहीतच आहे या दिवशी देशभक्ती ओसंडून वाहत असते पण या दिवसा इतकाच आजचा दिवसही तितकाच म्हत्वाचा आहे हे अनेक लोकांना माहीत नाही. आज २५ जानेवारी आज राष्ट्रीय मतदार दिन.आजच्याच दिवशी भारतीय लोकशाहीचा पाया रचला गेला. आजच्याच दिवशी म्हणजे २५ जानेवारी १९५० रोजी भारत निवडणूक आयोगाची स्थापना झाली म्हणून हा दिवस संपूर्ण देशात राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो. भारतीय लोकशाहीने प्रत्येक सुजाण नागरिकाला मतदानाचा मूलभूत हक्क बहाल केला आहे.

त्यामुळे मतदार यादीत नाव नोंदवून प्रत्येक नागरिकांनी निवडणुकीत आपले मतदान नोंदवून लोकशाही बळकट करावी असा उद्देश या दिवसामागे आहे. म्हणून या दिवशी भारत निवडणूक आयोग विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन मतदानासंदर्भात जनजागृती करते. या दिवशी १८ वर्ष पूर्ण झालेल्या नवीन मतदारांची नोंद करून त्यांना भारत निवडणूक आयोगाचे ओळखपत्र दिले जाते. मतदान हे प्रत्येक सुजाण नागरिकांचे राष्ट्रीय कर्तव्य आहे. १८ वर्ष पूर्ण झालेल्या प्रत्येक नागरिकांना संविधानाच्या अनुच्छेद ३२६ नुसार मतदानाचा हक्क दिला आहे. मतदान करणे ही देखील देशसेवाच आहे. त्यामुळे जास्तीतजास्त लोकांनी मतदान करुन भारतीय लोकशाहीला बळकट करायला हवे मात्र आपल्या देशात आजही मतदार मतदानाबाबत गंभीर आहेत असे दिसत नाही.

घटनाकारांनी मतदानाचा अधिकार बहाल करून देशवासियांना खूप मोठे अस्त्र दिले आहे पण दुर्दैवाने आजही लोकांना त्याचे महत्व नाही म्हणूनच आपल्या देशात कोणत्याही निवडणुकीत ६० टक्क्यांपेक्षा अधिक मतदान होत नाही याचाच अर्थ देशातील ४० टक्के मतदार मतदान करित नाहीत. भारतीय मतदारांचा मतदानाबाबतचा हा निरुत्साह लोकशाहीला मारक आहे. विशेष म्हणजे सुशिक्षित वर्गातच मतदानाविषयी निरुत्साह दिसून येतो. मतदानादिवशी राष्ट्रीय सुट्टी असते या दिवशी मतदान करण्याऐवजी सहकुटुंब सहलीला जाण्याचा ट्रेंड सुशिक्षित वर्गात दिसून येतो आपण एकट्याने मतदान केले नाही तर काय फरक पडणार असाच आविर्भाव या लोकांमध्ये दिसून येतो. जे मतदान करतात त्यातील काही लोक मतदान करण्याऐवजी आपल्या मताची विक्री करतात. रोटी, बोटी, आणि चपटीसाठी काही जण आपले मत अक्षरशः विकतात. अर्थात सर्वचजण असे करतात असे नाही.

बहुतेक जण विचार करुन आपल्या देशासाठी, समाजासाठी योग्य अशा उमेदवाराला मतदान करतात हे ही नाकारून चालणार नाही अशा लोकांची संख्या वाढली पाहिजे. लक्ष्मी दर्शन झाल्यानंतरच मतदान करणारे लोक बाबासाहेबांनी दिलेल्या या अस्त्राचा दुरुपयोग करतात. या लोकांमुळेच लोकशाही कलंकित होत आहे. बाबासाहेबांनी हे अस्त्र आपल्या हाती देण्यासाठी किती कष्ट सोसले याचीही जाणीव या लोकांना नाही. संविधानात मतदानाचा मूलभूत हक्क समाविष्ट करून बाबासाहेबांनी आपल्याला सर्वात मोठा हक्क मिळवून दिला आहे. आपलव हा मतदानाचा पवित्र हक्क बजावून प्रत्येकाने लोकशाही बळकट करायला हवी. प्रत्येकाने मतदानाचा हक्क जबाबदारीने बाजावल्यास देशाचे भविष्य बदलू शकते.

त्यामुळे प्रत्येकाने निराशावादी भूमिका सोडून जागरूकतेने व स्वयंस्फूर्तीने प्रत्येक निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क बजावून राष्ट्रीय कार्यामध्ये आपला खारीचा वाटा उचलायला हवा. लोकशाहीचे बळकटीकरण करावयाचे असेल तर जागरुक मतदारांचा एक मोठा वर्ग अस्तिवात येणे आवश्यक आहे. त्यामुळे आपला देश विकसनशीलतेकडून विकसित देश होण्याकडे निश्चितच मदत होईल. १८ वर्षांपुढील सर्व सुजाण नागरिकांनी आगामी निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क बजावला तरच राष्ट्रीय मतदार दिन साजरा केल्याचे सार्थक होईल.

✒️लेखक:-श्याम बसप्पा ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे(मो:-९२२५४६२९५)

पुणे, महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED